भाजपमध्ये मिशन ‘स्वीकृत’; मनपा पदाधिकार्‍याला झापले
Featured

भाजपमध्ये मिशन ‘स्वीकृत’; मनपा पदाधिकार्‍याला झापले

Dhananjay Shinde

पक्षाकडून आलेले नाव टाळून उमेदवारी भलत्यालाच दिली : आर्थिक व्यवहाराची चर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी) – स्वीकृत सदस्य पदासाठी पक्षाकडून एक नाव आले, अन् स्वतःच्या अधिकारातच महापालिकेच्या दोन पदाधिकार्‍यांनी दुसर्‍याचाच अर्ज दाखल केल्याने भाजपमध्ये चांगलीच रणधुमाळी निर्माण झाली. रात्री उशिरापर्यंत बैठका, झापाझापी, नंतर चुकल्याचे मान्य करत झाले गेले विसरून जाण्यासाठी केलेली विनवणी असे अनेक प्रकार घडले. भाजपमध्ये आज या प्रकाराचीच दिवसभर चर्चा होती.
महापालिकेत स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी शुक्रवारी विशेष सभा घेण्यात आली. या पदावर कोणाला संधी द्यायची, याबाबत विविध पक्षांच्या त्यांच्या अंतर्गत बैठका होत्या. भाजपमध्ये मात्र अशी बैठक घडून येऊ नये, यासाठीच जोरदार प्रयत्न झाले. या पदासाठी प्रामुख्याने माजी नगरसेवक किशोर डागवाले, किशोर बोरा यांची नावे चर्चेत होती. हे दोघेही शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांचे खंदे समर्थक असल्याने त्यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. महापालिकेतील भाजपच्या संख्येनुसार एकाचीच निवड होऊ शकणार होती.

कोणाला संधी द्यायची, यावर स्थानिक तसेच प्रदेश पातळीवरही चर्चा झाल्याचे समजते. त्यानुसार डागवाले यांच्या नावाला हिरवा कंदील मिळाल्याचे सांगण्यात येते. डागवाले गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत महापालिका कार्यालयात अर्ज व त्यासोबतची आवश्यक कागदपत्रे दाखल करण्यासाठी तळ ठोकून होते. मात्र गटनेत्याची सही नसल्याने त्यांना अर्ज दाखल करता आला नाही. अखेर अर्ज न दाखल करताच त्यांना निघून जावे लागले. एकीकडे हे घडत असतानाच दुसरीकडे भाजपकडून रामदास आंधळे यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यासाठी महापालिकेतील दोन पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेतला. या पुढाकारामागे ‘वेगळी’ चर्चा होती. पक्षाने सुचविलेल्याचा अर्ज दाखल न झाल्याचे समजताच प्रदेशसह स्थानिक नेते संतापले. रात्री उशिरा नेत्याच्या बंगल्यावर बैठका सुरू झाल्या. जे झाले ते चुकीचे कसे आहे, यावर चर्चा झाली. ज्यांनी परस्पर अर्ज दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला, ते सुरुवातीला फोन स्वीकारण्यासही तयार नव्हते.

ज्यावेळी फोन घेतला, त्यावेळी प्रदेश नेत्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याचे महापालिकेतील या पदाधिकार्‍याने स्थानिक नेत्यांना सांगितले. मात्र त्याचवेळी कॉन्फरन्सवर दुसर्‍या बाजूने तो प्रदेश नेता हे सर्व ऐकत होता. त्यांनी लगेच आक्षेप घेत संबंधितास झापले. त्यामुळे सगळा खेळ उघडा पडला. मोठ्या आर्थिक व्यवहारातून हे नाव पुढे आल्याची आज दिवसभर चर्चा होती. रात्री महापालिकेतील संबंधित पदाधिकार्‍यास बोलावून घेऊन चांगलीच कानउघाडणी केली. त्यांनीही झाले ते चुकले, असे मान्य करत एका नेत्याचे पाय धरल्याचेही सांगितले जाते.

महापालिकेत स्वीकृत सदस्य पदासाठी आलेले सर्व अर्ज निकषात बसत नसल्याचे जिल्हाधिकारी तथा आयुक्त राहुल द्विवेदी यांनी जाहीर केल्यानंतरही भाजपचे काय होणार, अशीच चर्चा महापालिकेत होती. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे नगरसेवक यात आमचे नव्हे, पण भाजपच्या काही लोकांचे मोठे नुकसान झाले, असे टोमणे मारत होते. तसेच दुपारी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची निवड असल्याने तेथे जिल्हाभरातून कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते बैठकीसाठी आले होते. तेथे देखील ‘स्वीकृतचा व्यवहार’ अशीच चर्चा सुरू होती. या प्रकारामुळे भाजपच्या प्रतिमेला मात्र मोठा तडा गेला आहे.

श्रेष्ठी दखल घेणार का?
स्वीकृत सदस्य नियुक्तीबाबत भाजपमध्ये घडलेल्या गोंधळाची दखल श्रेष्ठी घेणार का, याकडेच आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. प्रदेश पदाधिकार्‍यांची नावे सांगत खोटे बोलणे, आर्थिक व्यवहाराची चर्चा होणे, नेत्यांना न जुमानणे असे प्रकार झाले आहेत. शिवाय हा प्रकार थेट प्रदेश नेत्यांच्या कानापर्यंत गेला आहे. त्यामुळे महापालिकेतील त्या संबंधित पदाधिकार्‍यांवर कारवाई होणार का, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com