दिंडोरी : तहसिल कार्यालया समोर किसान सभेचे बिर्‍हाड आंदोलन
Featured

दिंडोरी : तहसिल कार्यालया समोर किसान सभेचे बिर्‍हाड आंदोलन

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

दिंडोरी । प्रतिनिधी

दिंडोरी तहसिल कार्यालया समोर किसान सभेने बिर्‍हाड आंदोलन सुरु केले असून त्यामुळे तहसिलच्या प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे. रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरु  असून किसान सभेच्या सभासदांनी तहसिल कार्यालयासमोरच ठाण मांडले आहे. दिंडोरी बाजार समितीच्या कार्यालयापासून किसान सभेच्या सभासदांनी मोर्चास सुरुवात केली.

यावेळी सरकारविरुध्द घोषणबाजी करण्यात आली. मोर्चेकरांनी दिंडोरी-नाशिक रस्ता पुर्णत: वापून टाकला होता. त्या नंतर मोर्चेकर्‍यांनी तहसिल कार्यालया समोर ठाण मांडले व बिर्‍हाड थाटले. मोर्चेकर्‍यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली होती. यावेळी विविध मागण्या मांडण्यात आल्या. वनधिकार कायद्यानुसार कलम 19 मध्ये सुचविलेल्या पुराव्यातील दाव्यासोबत दोन पुरावे सादर केलेल्या दावेदारांचे दावे मंजूर करा,  मंजूर दावेदाराच्या ताब्यातील 4 हेक्टर पर्यंतची वन जमिन मंजूर करुन 7/12 ला खातेदारी सदरी नोंद करावी, गायरान जमिन कसण्यार्‍यांचे नावे करावे, पात्र अपात्र देवदारांच्या गायरान जमिनी कसणार्‍या शेतकर्‍यांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा, नवीन  रेशन कार्ड, विभक्त रेशनकार्ड त्वरीत द्यावे, जीर्ण झालेले रेशनकार्ड त्वरीत नवीन करुन द्यावे,

वयोवृध्द व विधवांना दरमाहे 1000 रुपये  पेन्शन द्यावे, वयोवृध्द व विधवांना पेन्शन लागू करताना जाचक अटी रद्द करावे व त्यांना पेन्शन सुरु करावे, 2002 ची पात्रअपात्र  यादी गरजु लोकांना उपलब्ध करुन द्या, फॉरेस्टची चालेली मनमानी थांबवावी व चुकीच्या पध्दतीने कामे केलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, वणी, ननाशी, करंजाळी, फॉरेस्ट रेंजचा मनमानी कारभार थांबवा, प्रत्येक रेशनकार्ड धारकांना 35 किले धान्य द्यावे, पंतप्रधान घरकूल आवास योजनेच्या लाभधारकांना ‘ब’ या हक्काच्या घरकूलाचे हप्ते त्वरीत द्यावे व ‘ड’ घरकुलाच्या यादीला मान्यता देऊन ऑनलाईन करावे, मौलान  आझाद  स्वयंरोजगार योजनेची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करावी आदी मागण्या मोर्चेकर्‍यांनी केल्या. याप्रसंगी सुनील मालसुरे, रमेश चौधरी, अशोक उफाडे, लक्ष्मीबाई काळे, तुळसाबाई गांगोडे, अंबादास सोनवणे, आप्पा वटाणे, श्रीराम पवार, देवीदास वाघ आदींनी मार्गदर्शन  केले.

मोर्चेकर्‍यांच्या मागण्याबद्दल तहसिल कायर्ांलयात रात्री उशिरापर्यंत बैठक सुरु होती. तो पर्यंत हजार मोर्चेकरांचा तहसिल कार्यालया समोर घेराव होता. सायंकाळी 8 वाजेपर्यंत मोर्चेकरी तहसिल आवारात तळ ठोकून होते. मोर्चेकर्‍यांसाठी विद्युत रोषणाईची नंतर सुविधा करण्यात आली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. विशेष सुरक्षा दलाचे जवानही बंदोेबस्त करीत होते. प्रांत डॉ.संदिप आहेर, तहसिलदार कैलास पवार, उप विभागीय पोलिस निरीक्षक वाघमारे यांनी मोर्चेकर्‍यांशी चर्चा सुरु ठेवली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com