नगर: भिंगारचे पाणी दिल्लीत !

नगर: भिंगारचे पाणी दिल्लीत !

खासदार डॉ. सुजय विखेंनी उठविला संसदेत आवाज

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहराला मुबलक पाणी अन् शहराचाच भाग असलेल्या भिंगारमध्ये मात्र पाण्यासाठी वणवण. पाणी पुरविण्याची जबाबदारी असलेल्या कॅन्टोंमेंट बोर्डही उडवाउडवीची उत्तरे देतात. खासदार डॉ. सुजय विखे यांना रविवारच्या बैठकीत ही बाब प्रकर्षाने जाणवली. आज त्यांनी भिंगारचा पाणी प्रश्‍न थेट दिल्लीतील संसदेत उपस्थित करत केंद्र सरकारने कॅन्टोंमेंट बोर्डाला आदेश करावेत अशी मागणी केली.

भिंगार हा नगर शहराचाच भाग. भिंगारकरांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ही कॅन्टोंन्मेंट बोर्डाची. गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने व अनियमीत पाणी पुरवठा केला जातो. कॅन्टोंन्मेंटचे अधिकारी आणि प्रशासनाकडे तक्रार केली तर ते समाधानकारक उत्तर देत नाहीत, असा तक्रारीचा पाढा त्रस्त भिंगारकरांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासमोर रविवारी मांडला.

भिंगारकरांच्या या तक्रारीमुळे खा. डॉ. विखे अस्वस्थ झाले. पाणी टंचाईने त्रस्त् नागरीकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याकडे लक्ष वेधत केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा व प्रशासनास योग्य त्या सूचना द्यावी अशी खासदार डॉ. विखे यांनी लोकसभेत शुन्य प्रहारात केली.

भिंगार येथील रहिवाशी कॅन्टोंन्मेंट बोर्डाच्या अधिपत्याखाली येतात. तेथे कॅन्टोंन्मेंट बोर्ड व एमआयडीसी यांच्यात झालेल्या कराराद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र कॅन्टोंन्मेंट बोर्ड पाणी गळती, जुनी पापईपलाईन या कारणांकडे बोट दाखवुन रहिवाशांना कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो. मुळात पाण्याची एकूण मागणी, त्याची विभागणी व पाणी रेशनिंग बाबत प्रशासनाने संधिग्ता बाळगली आहे. त्यामुळे एकीकडे नगर शहराला महापालिकेकडून मुळा धरणातून नियमित पाणी पुरवठा तर दुसरीकडे शहराचाच भाग असणार्‍या भिंगारमध्ये पाणी-बाणी अशी अभुतपुर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

स्थानिक रहिवाशांना कॅन्टोंन्मेंट प्रश्शसनाकडून कुठलीच माहिती व्यवस्थित दिली जात नसल्याची तक्रार दिवसोंदिवस वाढत आहे. नागरीकांचा रोष लक्षात घेता कॅन्टोंन्मेंट हे संरक्षण विभागाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे केंद्र सरकारने तातडीने याबाबत हस्तक्षेप करावा अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे यांनी यावेळी केली. रविवारीच खा. डॉ. सुजय विखे यांनी भिंगारच्या नागरीकांची बैठक घेऊन त्यांचा प्रश्नाबाबत आवाज उठवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार विखे यांनी थेट संसदेत आवाज उठविला.

कॅन्टोंमेंटकडून तुसडेपणा
सर्वात मोठा सुरक्षा व सैनिकी दलाचा एरिया अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भिंगार गाव आणि परिसरात आहे. अनेक वर्षांपासून तिथे असलेल्या संरक्षण विभागाद्वारे रहिवासी भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतू मागील काही महिन्यांपासून ओढवलेल्या पाणी प्रश्नामुळे संरक्षण विभागातील अधिकार्‍यांशी चर्चा करण्यासाठी जाणार्‍या रहिवाशांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने, केंद्र सरकारने मध्यस्थी करून हा प्रश्न लवकरात लवकर मिटवावा, अशी विनंती खा. विखे पाटील यांनी केली.

पाणी गळती, जुनी पापईपलाईनच्या नावाखाली कॅन्टोंमेंट बोर्ड भिंगारकरांना कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो. पाण्याची एकूण मागणी, त्याची विभागणी व पाणी रेशनिंग बाबत प्रशासनाने संधिग्ता बाळगल्याने भिंगारमध्ये पाणी प्रश्‍न निर्माण झाला आहे.
– खा. डॉ. सुजय विखे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com