भिंगारला शिवसेना-भाजपचे सूर जुळले
Featured

भिंगारला शिवसेना-भाजपचे सूर जुळले

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

अहमदनगर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे शिवसेनेला अहमदनगर कँटोन्मेंट बोर्डावर सत्तास्थापन करण्याची संधी मिळाली. स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजपचे सूर जुळल्याने कँटोन्मेंट बोर्डात शिवसेनेला 30 वर्षात पहिल्यांदाच उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. शिवसेनेचे निष्ठावंत प्रकाश फुलारी यांची कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली.

शिवसेनेने भाजपशी केलेली छुपी युती राष्ट्रवादीला शह देणारी ठरली. याचबरोबर शिवसेना-भाजपचे गेल्या काही दिवसांपासून असलेला विसंवाद दूर होण्यास अहमदनगर कँटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे मदत होणार असल्याची चर्चा रंगली आहे. उपाध्यक्षपदाच्या निवडीमध्ये राष्ट्रवादी अलिप्त राहिल्याने या जागेसाठी शिवसेनेचे प्रकाश फुलारी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज राहिला.

त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून रवींद्र लाला बोंद्रे तर अनुमोदक म्हणुन संजय छजलानी यांच्या सह्या आहेत. मुसदिक सय्यद, कलीम शेख, विना मेहतांनी आदी उपस्थित होते. नगर कॅन्टोन्मेंटच्या उपाध्यक्षपदी प्रकाश फुलारी यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर शिवसेनेचे उपनेते माजी आ. अनिल राठोड, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. अभय आगरकर, शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी त्यांचा सत्कार केला. सुनील लालबोद्रे, सदस्य रवी लालबोद्रे, संजय छजलाणी, शुभांगी साठे, वसंत राठोड, महेश नामदे आदी यावेळी उपस्थित होते.

उपाध्यक्ष निवडीसाठी ब्रिगेडर विजयसिंग राणा, मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी काम पाहिले. निवडीनंतर उपनेते अनिल राठोड, अ‍ॅड. अभय आगरकर यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, शिवसेनेचे तीन आणि भारतीय जनता पक्ष पुरस्कृत एक असे सात सदस्य अहमदनगर कँटोन्मेंट बोर्डात आहेत. भारतीय जनता पक्ष पुरस्कृत सदस्या माजी खासदार दिलीप गांधी यांच्या गटाचा ओळखल्या जातात. गेल्यावेळी याच सदस्याच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर कँटोन्मेंट बोर्डात उपाध्यक्षपद पटकावले होते.

यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीसाठी उमेदवारच दिला नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली असल्याची चर्चा होती. त्यातूनच उमेदवार देता आला नसल्याचे सांगण्यात येते. त्यातच राष्ट्रवादीच्या अहमदनगर शहरातील वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी याकडे पाठ फिरवली. याचा फायदा शिवसेनेने घेतला आणि भाजप पुसस्कृत सदस्याला जवळ केले. हे सूर स्थानिक पातळीवरच्या सदस्यांमध्ये जुळले. परिणामी शिवसेनेचे प्रकाश फुलारी यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. भिंगार शहरात कँटोन्मेंट बोर्डाची सत्ता काबीज करताना शिवसेना-भाजपची एकी राष्ट्रवादी काँग्रेसला सूचक इशारा मानली जाते.

दरम्यान, महाविकास आघाडीची राज्यात सत्ता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांनी ही सत्ता स्थापन केली आहे. हाच अजेंडा पुढे स्थानिक पातळीवर असेल, असे सांगितले जात होते. पंरतु राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नगर शहरात असलेला राजकीय द्वेष पराकोटीचा आहे. त्याचा पहिला फटका राष्ट्रवादीला शिवसेनेने कँटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com