भिंगारप्रश्नी खासदारांपाठोपाठ आमदार जगताप देखील आक्रमक
Featured

भिंगारप्रश्नी खासदारांपाठोपाठ आमदार जगताप देखील आक्रमक

Sarvmat Digital

पाणीसह विविध प्रश्नांसंदर्भात ब्रिगेडिअर राणा यांच्यासमवेतत शिष्टमंडळासह चर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी) – खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठोपाठ आता आ. संग्राम जगताप देखील भिंगा येथील विविध समस्यांबाबत आक्रमक झाले असून, त्यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर विजयसिंग राणा यांची भेट घेऊन विविध अडचणींवर चर्चा केली.

प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, गॅरिसन इंजिनियर नॉर्थपारस मायशेरी यांच्याशी देखील चर्चा करुन निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, कलीम शेख, मीना मेहतानी, सुरेश मेहतानी, संभाजीराव भिंगारदिवे, नाथाजी राऊत, रमेश वराडे, अभिजीत सपकाळ, मच्छिंद्र बेरड, विलास तोडमल, केशव रासकर, मतीन सय्यद, विशाल बेलपवार, राधेलाल नकवाल, सुदाम गोंधळे, मतीन ठाकरे, दीपक लिपाने, संजय खताडे, सिद्धार्थ आढाव, मुसद्दीक सय्यद, शिवम भंडारी, नवनाथ मोरे, सिद्धूतात्या बेरड, अजिंक्य भिंगारदिवे, पापा सारसर, अक्षय भिंगारदिवे आदी उपस्थित होते.

भिंगार छावणी परिषद हद्दीतील विकास कामांचा मोठा अनुशेष शिल्लक आहे. या ठिकाणी काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. केंद्र शासनाने यापूर्वीच देशातील सर्व छावणी मंडळांना क वर्ग नगरपालिकेचा दर्जा बहाल केला आहे. जेणेकरून छावणी क्षेत्रात त्या राज्यातील राज्य शासनाच्या अंतर्गत विविध योजना राबविणे श्रेयस्कर होईल. पण अद्यापर्यंत छावणी मंडळाकडून मान्यता व केंद्रीय संरक्षण खात्याची परवानगी घेण्यात आलेली नाही. याबाबत पाठपुरावा करण्यात आलेला नाही. त्यामुळे या भागातील नागरिक राज्य व केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित असल्याचा आरोप करण्यात आला.

छावणी परिषद हद्दीतील नागरिकांना सदर योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पाठपुरावा होणे आवश्यक आहे. तसेच या माध्यमातून छावणी परिषद परिसरात मूलभूत सोयीसुविधा राबवणे सोयीस्कर होईल. भिंगार छावणी मंडळ परिसरात पाणी प्रश्न अत्यंत अडचणीचा ठरत असल्याने स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याची गरज आहे. छावणी मंडळाच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व कर्मचार्‍यांची संख्या अपुरी असल्याने रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागते. योग्य पद्धतीने उपचार होत नसल्याचेही उघडकीस आले आहे. हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचार्‍यांची संख्या वाढविणे, भगवान गौतम बुद्ध जॉगिंग ट्रॅक येथे योगासाठी ओटा व ट्रॅक सुधारणा करावी, अंडर एमईएस छावणी परिषदेचे ब्रिगेडियर यांच्या माध्यमातून डीएसपी चौक ते बेलेश्वर चौक, कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल ते पंचशील चौक, कॅन्टोन्मेंट ऑफिस ते भिंगार नाला इराणी रोड या रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com