भिंगार छावणी मंडळ निवडणूक सेनेविरोधात राष्ट्रवादीचा शड्डू
Featured

भिंगार छावणी मंडळ निवडणूक सेनेविरोधात राष्ट्रवादीचा शड्डू

Sarvmat Digital

महाविकास आघाडीच्या प्रयोगाला सुरूंगाची शक्यता

अहमदनगर (प्रतिनिधी) – नव्या वर्षात भिंगार छावणी मंडळ सदस्य निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. आजपर्यंत शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी किंवा काँग्रेस असा सामना झालेल्या भिंगारच्या या निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीचा कित्ता गिरणार की पुन्हा सेना विरुध्द राष्ट्रवादी असा सामना रंगणार, याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे. दरम्यान राष्ट्रवादीने आतापासूनच शिवसेनेविरोधात लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून समजली.

भिंगार छावणी मंडळाच्या विद्यमान सदस्यांची मुदत 10 फेबु्रवारी 2020 मध्ये संपणार आहे. त्यामुळे सात सदस्य निवडीसाठी जानेवारी महिन्यात निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी तीन तर एक भाजप असे बलाबल आजमितीला आहे. भाजप सदस्याच्या पाठबळावर छावणी मंडळाचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादीने पटकाविले होते. राष्ट्रवादीचे मुस्सा सय्यद हे छावणी मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत.

भिंगार हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पारड्यात पडलेली मते पाहता शिवसेनेला निवडणूक अवघड जाईल असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शिवाय अनिल राठोड हे दुसर्‍यांदा विधानसभा निवडणूक पराभूत झाल्याने त्यांनाही फारसा इंटरेस नसेल असा दावा करत राष्ट्रवादी मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे.

राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी सत्तेत आली आहे. राज्यातील भाजप सत्तेला सुरूंग लावत भाजपचा सफाया करण्याचे या महाविकास आघाडीचे मनसुबे असल्याचे बोलले जाते.

भिंगारमध्ये मात्र भाजपचा अवघा एक सदस्य असल्याने अन् भाजपचे प्राबल्य नसल्याने येथे भाजप नगण्य आहे. आजपर्यंतच्या निवडणुकीत आघाडी विरुध्द शिवसेना अशीच लढत झाल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काय होणार? याची उत्सुकता नगरकरांना आहे. राज्यात महाविकास आघाडी असली तरी भिंगारमध्ये तो प्रयोेग होणार नाही असा दावा करत राष्ट्रवादीने तयारी सुरू केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

गुरूवारी आरक्षणावर चर्चा
सात सदस्य संख्या असलेल्या छावणी मंडळात दोन महिलांसाठी तर एक वार्ड अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. एससीसाठी राखीव असलेला वार्ड नंबर सातमधील लोकसंख्या पाहता यंदाही या वार्डातील आरक्षण कायम राहिल असे सूत्रांकडनू सांगण्यात आले. तर 1 आणि 5 नंबर वार्डातील महिला आरक्षण इतर वार्डात पडून हे वार्ड खुले होतील असे सूत्रांकडून सांगण्यात आले. 5 डिसेंबरला छावणी मंडळ सदस्यांची बैठक होत असून त्यात आरक्षणाचा विषय काढला जाणार आहे.

उपाध्यक्षांवर टांगती तलवार
छावणी मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष मुस्सा सय्यद हे तीन नंबर वार्डाचे प्रतिनिधीत्व करतात. 2,3,4,6 या खुल्या वार्डात महिला आरक्षण टाकले जाणार आहे. त्यामुळे उपाध्यक्ष सय्यद यांचा 3 नंबर वार्ड महिलासाठी आरक्षित झाला तर त्यांची पंचायत होणार आहे. त्यांच्यासोबतच शिवसेनेचे रवींद्र लालबोंद्रे, प्रकाश फुलारी आणि राष्ट्रवादीचे कलीम शेख यांच्यावरही आरक्षणाची टागंती तलवार आहे.

विद्यमान सदस्य
शिवसेना 3 – संजय छजलानी, प्रकाश फुलारी, रवींद्र लालबोंद्रे
राष्ट्रवादी 3 – मीना मेहतानी, मुस्सा सय्यद, कलीम शेख
भाजप 1 – शुभांगी साठे

वार्डनिहाय मतदार

वार्ड 1- 953
वार्ड 2- 3036
वार्ड 3- 1905
वार्ड 4- 2535

वार्ड 5- 2093
वार्ड 6- 1707
वार्ड 7- 2182

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com