ऐतिहासिक भिंगारमध्ये सुगंधी तंबाखूची ‘दरवळ’

jalgaon-digital
4 Min Read

खाकीचा आशीर्वाद तर, अन्न व औषध प्रशासनाचा कानाडोळा

अहमदनगर – ऐतिहासिक वारसा असलेले भिंगार शहर आणि त्यालगत झपाट्याने विस्तारत असलेला भाग सध्या सुगंधी तंबाखूच्या (मावा) दरवळीने चर्चेत आला आहे. अन्न व औषध प्रशासनच्या दुर्लक्षाने आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील ‘खाकी’च्या आशीर्वादाने भिंगार शहर आणि विस्तारत असलेला हा भाग, छुप्या मिनी कारखान्यांमुळे सुगंधी तंबाखूच्या निर्मितीचे आगर बनला आहे.

नगर शहरापासून भिंगार शहर हे अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे. लष्करी तळ लाभलेल्या भिंगार आणि विस्तारलेल्या ग्रामीण भागातील गुन्हेगारीच्या नियंत्रणासाठी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे आहे. कल्याण-विशाखापट्टण राष्ट्रीय महामार्ग या शहरातून जातो. भिंगार शहराला लष्करी तळामुळे चटई क्षेत्राची मर्यादा आहे. परिणामी भिंगारलगतचा ग्रामीण भाग झपाट्याने वाढत आहे. नागरदेवळे, बुर्‍हाणनगर, ब्रह्मतळे, कापूरवाडी, शहापूर-केकती, दरेवाडी, सैनिकनगर डेअरी फार्म आदी नागरी भाग विस्तारत आहेत. लष्करी सेवेत असलेले आणि त्यानंतर निवृत्तीनंतर अनेकजण याच परिसरामध्ये स्थायिक होत आहे. परिणामी नागरीकरण वाढत आहे.

वाढत्या नागरीकरणामुळे भिंगार परिसराच्या गरजा देखील वाढल्या आहेत. त्यातून गुन्हेगारी वाढली आहे. सध्या भिंगार परिसर सुगंधी तंबाखूमुळे चर्चेत आहे. सुगंधी तंबाखूच्या अवैध धंद्यांच्या निर्मितीत अनेक तरुण आणि युवक उतरले आहेत. विशेष करून त्यांना खाकीचा देखील सपोर्ट मिळत आहे. परिणामी सुगंधी तंबाखूच्या निर्मितीसाठी भिंगार परिसर एकप्रकारे आगर बनले आहे. दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या या अवैध व्यवसायातून छुप्या गुन्हेगारीला देखील बळ मिळत आहे. कमी श्रमात अधिक पैसा येत असल्याने त्यातून वेगवेगळे अवैध धंदे जन्माला येत आहेत.

या अवैध व्यवसायाचे आणि गुन्हेगारीला बळ देणारे अर्थकारण अभ्यासल्यास लाखो रुपयांची उलाढाल समोर येते. सुगंधी तंबाखू निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल हा परराज्यांतून छुप्या पद्धतीने आणला जातो. सुपारीचा चुरा, तंबाखू, सुगंधी पावडर, चुना, इतर रासायनिक द्रव्ये आदींचा यात समावेश असतो. या सर्व साहित्याची वाहतूक छोट्या बंद कंटनेरमधून होते. सुगंधी तंबाखू तयार करण्यासाठी लागणारी यंत्रणा ही मनुष्यबळाऐवजी विद्युत यंत्रणेवर असते. त्यामुळे कमी मनुष्यबळ लागते आणि बोभाटा देखील होत नाही.

सुगंधी तंबाखूच्या निर्मितीसाठी विद्युत यंत्र (मिक्सर) वापरले जातात. या मिक्सरची किंमत सुमारे 75 ते 80 हजार रुपयांपर्यंत आहे. या मिक्सरमधून दिवसभरातून लाखो रुपयांचा माल तयार केला जातो. यावरून अंदाज येतो की, सुगंधी तंबाखूच्या निर्मितीसाठी किती कच्चा माल आणला जातो. तयार झालेली ही सुगंधी तंबाखू त्यानंतर पुन्हा छोट्याछोट्या पांढर्‍या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरली जाते. काही वेळेस हीची तिथेच पॅकिंग केली जाते किंवा ती विक्रीसाठी किलोवर थेट पानटपरींवर पोच केली जाते. या वितरणासाठी स्वतंत्र यंत्रणा असते. विशेष करून दुचाकीचा वापर यासाठी केला जातो.

ऑर्डरप्रमाणे शहरातील पान टपर्‍यांवर ही सुगंधी तंबाखू (मावा) पोहोचविली जाते. हा माल पोहोचविण्याची वेळ देखील ठरलेली असते. विशेष करून, सकाळी नऊच्या आत हा माल वितरित केला जातो. ही सर्वत्र यंत्रणा सुगंधी निर्मिती करणार्‍यांना एकट्याने चालविता येणे शक्य नाही. त्यामुळे या अवैध धंद्यात सहकार महत्त्वाचा ठरतो. हा सहकार ‘अर्थपूर्ण’असतो. यावरून हा सुगंधी तंबाखूचा अवैध धंदा मंदीत देखील तेजीतच आहे.

अडोसा ठरतो महत्त्वाचा
सुगंधी तंबाखूच्या उत्पादनाला आणि विक्रीला राज्य सरकारने बंदी घातली आहे. अन्न व औषध प्रशासनालाच या अवैध सुगंधी तंबाखूवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. त्यासाठी अन्न व औषध प्रशासन पोलिसांची मदत घेते. कायद्यामुळे हा धंदा सहाजिक उघडपणे करता येत नाही. अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्षामुळे या धंद्याला खाकीचा सहकार लाभला आहे. परिणामी खाकीच्या सहकार तत्त्वावर हा धंदा भिंगारमध्ये फोफावत आहे. या अवैध धंद्यासाठी छुपा अडोसा महत्त्वाचा असतो. त्यासाठी नामी शक्कल लढविल्या जातात. पत्र्याच्या शेड उभारल्या गेल्या आहेत. ही शेड गोदामे भासवली जातात. त्याच्या आड सुगंधी तंबाखुची निर्मिती होते. या गोदामांना रात्र-दिवस बाहेरून कुलूप असते. त्यामुळे कोणालाही संशय येत नाही. परंतु आतमध्ये सुगंधी तंबाखुची निर्मिती जोरात सुरू असते. काही गोदामांना सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे संरक्षण आहे. अनोळखी व्यक्ती गोदामाभोवती येताच आतमध्ये बसलेले सीसीटीव्हीद्वारे पाहून हालचाली मंद करतात. काहींनी नागरी वसाहतीमध्ये घर घेऊन हा धंदा थाटला आहे. या अवैध धंद्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला, भिंगार कॅम्प पोलिसांना आणि शहर उपअधीक्षकांना नसली, तरच नवलच म्हणावे लागेल!. (क्रमश:)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *