प्राथमिक स्तरावरील बीएड पात्रता धारकांची होणार नियुक्ती

प्राथमिक स्तरावरील बीएड पात्रता धारकांची होणार नियुक्ती

संगमनेर (वार्ताहर) – राज्यातील प्राथमिक शिक्षक पदासाठी यापुढे डी.एड. पात्रताधारक उमेदवारांऐवजी बी. एड पात्रताधारक उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील डी. एड. पदविकाधारक विद्यार्थ्यांची बेकारी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

राज्यात शिक्षक या पदावर कार्यरत राहण्यासाठी बारावी नंतरच्या दोन वर्षांची पदवी धारण करणार्‍या उमेदवाराला यापूर्वी नियुत्ती देण्यात येत होती. राज्यात या अभ्यासक्रमासाठी पूर्वी डी.एड. पदवी व आता डी. टी.एड. पदवी धारण करणार्‍या उमेदवारांना नियुक्ती मिळत होती. राज्य शासनाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भाने राजपत्र प्रकाशित करण्यात आले असून, प्राथमिक स्तरावरील शिक्षक या पदासाठी डी. एड. ऐवजी बी. एड. उमेदवार उपलब्ध झाल्यास त्यांना नियुक्ती देता येणार आहे. मात्र नियुक्ती दिल्यानंतर पुढील वर्षाच्या राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेच्या प्राथमिक साठीच्या अभ्यासक्रमाचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बी.एड. पात्रताधारक उमेदवार काम करू शकणार आहे.

डी. एड. उमेदवारांचे भवितव्य अवघड
राज्य शासनाने या स्वरूपाचा निर्णय घेतल्यामुळे बी. एड. पात्रताधारक उमेदवार प्राथमिक स्तरावर व उच्च प्राथमिक स्तर अशा दोन्ही ठिकाणी काम करू शकणार आहेत. त्याचबरोबर माध्यमिक स्तरासाठी देखील त्याला संधी मिळणार आहे.त्यामुळे इयत्ता पहिली ते बारावीसाठी बी. एड. पदवी शासनाने ग्राह्य धरण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यात सध्या बारावीनंतर डी.एड. करू पाहणार्‍या विद्यार्थ्यांचा ओढा या अभ्यासक्रमाकडे कमी होणार आहे. त्यातच राज्यात सध्या सहा ते सात लाख डी. एड. पदविका प्राप्त विद्यार्थी पडून आहेत. या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र मागील वर्षात सुमारे पाच हजार शिक्षकांना किमान नोकरी मिळू शकली आहे. राज्यात मागील काही वर्ष अध्यापक विद्यालयाची प्रवेश क्षमता एक लाख विद्यार्थी होती. मात्र विद्यार्थी मिळत नसल्यामुळे अध्यापक विद्यालयाची बंद पडण्याचे प्रमाण सर्वाधिक राहिले आहे. सध्याही अध्यापक विद्यालय ही बंद करण्याकडे संस्था चालकांचा ओढा आहे. राज्य शासनाने स्वतःची असलेली शासकीय अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांअभावी यापूर्वीच बंद केली आहेत. राज्यात या वर्षी केवळ 13 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा ओढा सध्या आटलेला असताना हा निर्णय झाल्यामुळे, भविष्यात या अभ्यासक्रमाला विद्यार्थी मिळण्याची शक्यता नाही. अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे.

सात लाख बेकारांचे काय?
राज्यात 2010 नंतर शिक्षकांची भरती झालेली नाही. त्यापूर्वी आणि त्यानंतर राज्यात सुमारे सात लाख विद्यार्थ्यानी ही पदविका प्राप्त केली आहे. गेले काही वर्ष अतिरिक्त शिक्षक झाल्याने शिक्षक भरती प्रक्रिया थांबविली होती. समायोजनाचा या प्रक्रियेमुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया जवळपास बंद केली होती. माध्यमिक स्तरावरती विज्ञान, इंग्रजी आणि गणित या विषयाचे शिक्षक भरण्याची अनुमती देण्यात आली होती. मात्र प्राथमिक स्तरावर भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नसताना, मागील वर्षी राज्यात शिक्षक भरतीचे दरवाजे खुले करण्यात आले. त्यात बारा हजार जागा दाखविण्यात आलेल्या होत्या. त्यातील साडेपाच हजार विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळू शकलेली आहे. त्यामुळे सध्या या निर्णयामुळे विद्यार्थी होणार आहे. राज्यात असलेल्या सात लाख उमेदवारांचे भवितव्य अंधारात सापडणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com