सोयाबीन पळविणार्‍या दोघांना अटक
Featured

सोयाबीन पळविणार्‍या दोघांना अटक

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – मार्केटयार्ड येथून धुळे येथे नेण्यासाठी ट्रकमध्ये भरलेला नऊ लाख 51 हजारांचा सोयाबीन ट्रक चालकाने मालकाच्या साथीने गायब केल्याचे समोर आले आहे. यामध्ये नगरच्या व्यापाराची मोठी फसवणूक करणार्‍या परराज्यातील दोघांना कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले. काशिद रशिद शेख व रियाज रज्जाक लोहार (रा. सैंधवा, मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

व्यापारी भगवानदास गुलचंद गांधी यांनी मार्केटयार्ड येथून 230 क्विंटल सोयाबीन ट्रक (क्र. एमपी- 09 एचएच- 9919) मध्ये भरून दिले होते. ट्रक चालक मुकेश कुमार (रा. सैंधवा, मध्यप्रदेश) याला सोयाबीन धुळे येथील अ‍ॅक्ट्रक्शन कंपनीत पोहोच करण्यास सांगितले होते. त्याने ते गायब केले. याप्रकरणी गांधी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. कोतवाली पोलिसांनी ट्रक चालकाचा मध्यप्रदेश येथे शोध घेतला, पण तो मिळून आला नाही.

ट्रकचा मालक बबलू ऊर्फ काशिद रशिद शेख असल्याचे समजताच त्याला सैंधवा (जि. बडवणी, मध्यप्रदेश) येथून ताब्यात घेतले. त्याने ट्रक चालक मुकेश कुमार याच्या साथीने गुन्हा केल्याची कबुली दिली. मध्यस्थी करून सोयाबीन विकणारा रियाज रज्जाक लाहोर यालाही कोतवाली पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून सहा लाखांचे 15 टन सोयबीन व 12 लाखांचा ट्रक असा 18 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास वाघ, पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ, पोलीस नाईक अण्णा बर्डे, राहुल शेळके, राजू शेख यांनी केली.

Deshdoot
www.deshdoot.com