बारागाव नांदूरला 18 पैकी 10 मास्तरांची शाळेला दररोज दांडी

बारागाव नांदूरला 18 पैकी 10 मास्तरांची शाळेला दररोज दांडी

संत तुकाराम विद्यालयात ‘राम भरोसे’ भरते शाळा || प्रार्थना, राष्ट्रगीत बंद; मुख्याध्यापकांची ‘लेटएन्ट्री’; नागरिक संतप्त

बारागाव नांदूर (वार्ताहर)- राहुरी तालुक्यातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या अग्रेसर असलेले बारागाव नांदूर गाव मात्र, शैक्षणिकदृष्ट्या पिछाडीवर पडले आहे. येथील श्रीशिवाजी प्रसारक मंडळाच्या संत तुकाराम विद्यालयातील 18 शिक्षकांपैकी 10 शिक्षकच शाळेत गैरहजर राहत असल्याने शाळेचा बोजवारा उडाला आहे.

ज्यांच्या खांद्यावर शाळेची जबाबदारी दिली, ते मुख्याध्यापकही शाळेमध्ये 12 वाजता येऊन ‘लेटएन्ट्री’ करीत असल्याने शाळेत प्रार्थना, राष्ट्रगीत वाचन होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, काही शिक्षकांना राजकीय नेते बोलावून घेतात, त्यामुळे त्यांना जावे लागते, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली आहे. शिक्षकांकडे राजकारण्यांचे काय काम अडते? असा सवाल नागरिकांनी विचारला आहे.

बारागाव नांदूर येथील संत तुकाराम विद्यालयामध्ये मंगळवारी सकाळी 11.30 वाजता ग्रामपंचायत सदस्यांसह काही ग्रामस्थांनी अचानकपणे भेट दिली. शाळेमध्ये केवळ 4 ते 5 महिला शिक्षिका वगळता 2 शिक्षक हजर होते. तत्पूर्वी शाळा प्रार्थना व राष्ट्रगीत वाचन न होताच मुले वर्गामध्ये जाऊन बसली असल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी 11.30 वाजता वर्गात जाणे पसंत केले. त्यानंतर काही शिक्षकांनी शाळेमध्ये हजेरी दिली.

जि.प.सदस्य धनराज गाडे, उपसरपंच युवराज गाडे, निवृत्ती देशमुख, डॉ.ज्ञानेश्वर आघाव, गोविंद जाधव, संतोष शिंदे, शिवा गाडे, रोहिदास बर्डे, विनोद पवार, आदींनी शाळेत दाखल होऊन सत्य परिस्थिती जाणून घेतली. बहुतेक शिक्षक अनुपस्थित असल्याने अनेक वर्गांमध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरूच होता.

मुख्याध्यापक हरिश्चंद्रे हे दुपारी 12 वाजता शाळेत हजर झाले. त्यांनी शिक्षकांच्या अनुपस्थितीबाबत ग्रामस्थांना माहिती देण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतापलेल्या ग्रामस्थांनी श्रीशिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी व अधिकार्‍यांवर आपला रोष व्यक्त केला. मुख्याध्याक हरिश्चंद्रे यांनी यापुढे शाळेबद्दल कोणतीही तक्रार येणार नाही असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com