आवर्तन काळात पूर्वीच्या सवयी बदलाव्या लागतील – आ. पवार

आवर्तन काळात पूर्वीच्या सवयी बदलाव्या लागतील – आ. पवार

कुकडीचे आवर्तन 20 डिंसेबर रोजी सुटणार

कर्जत (वार्ताहर)- कुकडीचे यावर्षी आवर्तन 20 डिसेंबरपर्यंत सुटणार आहे. मात्र आवर्तन काळात आता पूर्वीच्या सवयी सर्वांना बदलाव्या लागणार आहेत, असे आवाहन आ. रोहित पवार यांनी कुकडी आवर्तन नियोजन बैठकीत केले. यावेळी कुकडीचे अधीक्षक अभियंता एच. टी. धुमाळ, कार्यकारी अभियंता रामदास जगताप व श्रीगोंद्याचे कार्यकारी अभियंता स्वप्नील शिंदे, उपअभियंता संभाजी दरेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सांळुके, राजेंद्र गुंड, तालुका अध्यक्ष किरण पाटील, कैलास शेवाळे, प्रविण घुले, शंकर देशमुख, अशोक जायभाय, नानासाहेब निकत, विजय मोढळे, सरपंच काका शेळके, वसंत कांबळे, माउली सायकर, स्वप्नील तनपुरे, संग्राम पाटील, सुधीर जगताप यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

कर्जत येथे कुकडीच्या अगामी आवर्तनासाठी प्रथमच शेतकर्‍यांच्या उपस्थितीमध्ये नियोजनाची बैठक झाली. यावेळी आ. रोहित पवार म्हणाले, कुकडीच्या धरणातील पाणी साठा पाहता आपल्याला तीन आवर्तने मिळणार आहेत आणि पुढील 6 महिन्यांत मिळणार्‍या पाण्याचे नियोजन शेतकर्‍यांनी करावे. यानुसार पिकांचे नियोजन करणे सोपे जाणार आहे, असे सागूंन आ. पवार म्हणाले, कुकडीचे हक्काचे पाणी हे केवळ कर्जत तालुक्यास नव्हे तर या योजनेमध्ये समावेश असलेल्या प्रत्येक गावाला आणि तालुक्याला मिळाले पाहिजे ही माझी भावना आहे.कारण पाण्यावर सर्वच शेतकर्‍यांचा हक्क आहे. मात्र पाणी घेताना शेतकर्‍यांनी पण इतर बांधवांचा विचार करण्याची गरज आहे आणि आता पाण्याबाबत असलेल्या वाईट सवयी देखील बदलण्याची गरज आहे. एखादा ताकदवान शेतकरी खाली इतरांना पाणीच जाऊ देत नाही हे बरोबर नाही आणि योग्य नाही, असे होण्याचे कारणही सोपे आहे. पाणी येणार याची हमी नसल्यामुळे असे घडत होते. मात्र आत तसे होणार नाही.

यावेळी अधीक्षक अभियंता एच. टी. धुमाळ म्हणाले, कुकडीचे आवर्तन व्यवस्थित पूर्ण होण्यासाठी यामध्ये शेतकरी, राजकीय पदाधिकारी, अधिकारी आणि पत्रकार यांची मोठी जबाबदारी आहे. शेतकरी हा कालव्याचा मालक आहे आणि मालकाने त्याच्या कालव्याची तोडफोड करू नये.आवर्तन सुरळीत होण्यासाठी मदत करावी. लोकप्रतिनीधींनी श्रेय घेण्यासाठी स्टंट बाजी करू नये. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली पाणी देण्याचा आग्रह धरू नये. अधिकार्‍यांनी त्यांचे फोन सुरू ठेवतानाच पाण्याची माहिती शेतकर्‍यांना द्यावी. तसेच पत्रकारांनी देखील भावना भडकणार नाहीत तसेच खळबळ जनक बातम्या देऊ नयेत, पुरेशी माहिती घेऊन बातमी द्यावी आणि तोडफोड करणारांना तसे करण्यापासून परावृत्त करावे, अशा बातम्या द्याव्यात. यावेळी रामदास जगताप यांनी आभार मानले.

पाण्यात राजकारण नको
आमदार पवार म्हणाले, कुकडी लाभक्षेत्रामध्ये प्रत्येक गावात पाणी वाटप संस्था पुढील काळात तयार केली जाणार आहे. या समितीला आम्ही प्रशिक्षण देणार आहोत आणि पाण्याचे नियोजन या समितीने आणि अधिकार्‍यांनी करावयाचे आहे.. माझे सर्वांना आवाहन आहे की, पाण्याच्या संदर्भात कोणीही राजकारण करू नये आणि मी राजकारण करू देणार नाही. कारण पाण्याचा हक्क हा पक्षापेक्षा मोठा आहे, असे मी मानतो.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com