…गूंगा मरीज और हकीम बहरा है !
Featured

…गूंगा मरीज और हकीम बहरा है !

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव ।

औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या दुरुस्तीच्या बंद असलेल्या आणि रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आपणांस लाज वाटत असल्याची खंत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. म्हणजे सरकारचा, महामार्ग प्राधिकारणाचा आणि ठेकेदारांचा पायपोस नसल्याचे समोर येत आहे. ठेकेदाराला आमदार, खासदारांचा त्रास वाढला असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केला आहे.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी जळगाव-औरंगाबाद रस्त्याबाबत केलेल्या गौप्यस्फोटात फारसे नवल नसले तरी शेकडो कोटींच्या कामात काहीतरी मिशन कमिशन असल्याशिवाय मंत्र्यांनी जाहीर कार्यक्रमात जाहीर कबुली देणे अशक्य आहे. गडकरींच्या वक्तव्याने एकूणच त्यांच्या सरकारची आणि खात्याची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या खराब रस्त्यामुळे अजिंठा लेणीकडे येणारे परदेशी पर्यटक घटले असल्याचे दस्तुरखुद्द मंत्रीच सांगू लागले आहे.  म्हणजे रस्ते दुरुस्तीबाबत सरकरची इच्छा असली तरी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या त्रासला कंटाळून ठेकेदार अर्धवट काम सोडून पळून जातात हे गडकरींचे विधान खूप काही सांगून जाते. या रस्त्याची एकूण अवस्था म्हणजे ‘… गूंगा मरीज और हकीम बहरा है!’ अशीच म्हणावी लागेल.

एका शायराचा अशा बिकट परीस्थितीवर भाष्य करणारा एक शेर खूप लोकप्रिय आहे. तो शायर असं म्हणतो की,

‘जख्म गहरा है, सक्त पहरा है,

 गूंगा मरीज और हकीम बहरा है !’ 

मग इलाज कुणी असा कसा करायचा हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. दस्तुरखुद्द केंद्रीय मंत्र्यांना लाज वाटावी अशी परिस्थिती का निर्माण झाली.? या रस्त्याच्या कामात अडसर ठरणारे ‘झारीतले शुक्राचार्य’ आहेत तरी कोण? ना.गडकरी आमदार-खासदारांचा फक्त उल्लेख करतात पण नावे सांगत नाही. कोण कोणत्या लोकप्रतिनिधीने ठेकेदाराला बंगल्यावर बोलवून त्रास दिला आहे. हे त्यांना माहित असेल तर त्यांनी ते जाहीर का केले नाही. असा प्रश्न येथे उपस्थित होतो. ते लोकप्रतिनिधी फक्त मराठवाड्यातीलच आहेत की, इतर भागातील आहेत हे कळायला हवे. जगाच्या विविध देशातून अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणार्‍या लाखो पर्यटकांनी गेल्या काही वर्षात या खराब रस्त्यावरुन त्यांच्या देशात काय वर्णन केले असेेल? त्यामुळे देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न दाखविणार्‍या केंद्र सरकारमधील एक जबाबदार केंद्रीयमंत्री खंत व्यक्त करतो, यासारखे दुसरे दुर्दैव काय असू शकते.

जळगाव-औरंगाबाद, तसेच चिखली ते पिंपळनेर या महामार्गाच्या चौपदीकरणाबाबत 2014 च्या निवडणूकीपूर्वी फारमोठे स्वप्न दाखविले गेले. 2019 च्या निवडणूकीतही त्याच मुद्यावर निवडणूका जिंकल्या गेल्या. स्वतः गडकरी यांनी भूमीपूजन करतांना तीन वर्षात या मार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईल अशी घोषणा केली होती. सहा वर्षात मात्र या रस्त्यांची जी वाट लागली आहे ती वर्णन करायला शब्द अपुरे  पडावेत अशी आहे. जळगाव-औरंगाबाद महामार्ग चौपदरी व्हायला अजून दीड वर्ष तरी लागेल की आणखी रेंगाळेल हे फक्त ठेकेदारच सांगू शकेल.

शेकडो कोटींचे टेंडर घेवून काम करणारे ठेकेदार परवडत नाही म्हणून पळून गेले असून त्यांचा छळ होत असल्याने ते गेल्याचे सांगितले जाते असे विधान कुणी ऐर्‍या गैर्‍याने केले नसून केंद्रात भूपृष्ठ वाहतूक मंत्री असलेल्या नितीन गडकरी यांनी केले आहे. ठेकेदाराकडून मलिदा लाटून त्याला पळून जाण्यास भाग पाडणारे ‘झारीतील शुक्राचार्य’ सरकारनेच शोधून त्यांचा पर्दाफाश करायला हवा तरच हा महामार्ग होईल असे आजतरी वाटायला लागले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com