डांबर घोटाळाप्रकरणी अखेर श्रीरामपूरच्या ठेकेदारावर गुन्हा
Featured

डांबर घोटाळाप्रकरणी अखेर श्रीरामपूरच्या ठेकेदारावर गुन्हा

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

अहमदनगर (प्रतिनिधी) – रस्त्याच्या कामाच्या गुणवत्ता चाचणीचे बनावट अहवाल दस्तऐवज करून सरकारची 46 लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी जिल्हा परीषदेचे नोंदणीकृत ठेकेदारा यांच्यावर शुक्रवारी (दि. 24) नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. जुनेद कलीम शेख (रा. श्रीरामपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. याप्रकरणी अर्जुन यादव आंधळे (रा. वसंत टेकडी) कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद यांनी फिर्याद दिली होती.

शेख हा जिल्हा परिषदेचा नोंदणीकृत्र ठेकेदार आहे. शेख याने 2005 ते 2017 याकालावधीत वेळोवेळी साहित्य गुणवत्ता चाचणीचे बनावट दस्ताऐवजाचा वापर करून जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची 46 लाख एक हजार 249 रूपयांची फसवणूक केली आहे. ठेकेदार शेख याने केलेल्या फसवणूक प्रकरणी कोतवाली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भंगाळे करत आहे.

या प्रभारी कार्यकारी अभियंता डिसेंबर महिन्यांत ठेकेदार शेख यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली होती. मात्र, आंधळे यांच्या फिर्यादीसोबत कोतवाली पोलीसांना गुन्हा दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती हवी होती. त्या माहितीसाठी कोतवाली पोलीसांनी जिल्हा परिषदेला वेळोवेळी सुचित करून घोटाळा प्रकरणी आवश्यक कागदपत्र मिळाल्यानंतर शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, यापूर्वी जिल्हा परिषद पातळीवर समितीने केलेल्या तपासणीत ठेकेदार शेख यांच्यावर लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानुसार आधी जिल्हा परिषद प्रशासनाने शेख यांना नोटीस देऊन खुलासा मागविला होता. हा खुलासा अमान्य झाल्यानंतर कायदेशीरपणे कार्यकारी अभियंता आंधळे यांनी ठेकेदार शेख यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com