थोरातांविरोधात चव्हाणांची ‘हायकमांड‘कडे तक्रार?
Featured

थोरातांविरोधात चव्हाणांची ‘हायकमांड‘कडे तक्रार?

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

सोनियांना पत्र दिल्याची चर्चा , घसरणीसाठी ठरवले जबाबदार

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणूकीतील ‘शून्युगिरी’मुळे अचडणीत आलेल्या काँग्रेसवर घरातूनच नाराजीचे बॉम्ब बरसू लागले आहेत. ते लोण राज्यातही पसरल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत पक्षाला चांगली कामगीरी करता आली नाही. यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात जबाबदार आहेत. यामुळे मला पुन्हा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात यावी, असे पत्र ना. अशोक चव्हाण यांनी सोनिया गांधी यांना दिल्याचे वृत्त एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीने दिले आहे.

दरम्यान, अशा कोणत्याही पत्राचा ना.चव्हाण यांनी इन्कार केला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून ना.चव्हाण यांची राजकीय विधाने चर्चेत आहेत. त्यावरून महाविकास आघाडीच्या घटकपक्षांतही धुसफूस झाली. आता थेट पत्र लिहून त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे सर्वोच्च नेते ना.थोरात यांची तक्रार केल्याने पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्याचे वृत्तात म्हटले आहे.

लोकसभा निवडणूकीतील दारूण पराभवानंतर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी थोरात यांच्याकडे सोपविण्यात आली. विधानसभा निवडणूकीत पक्षाला 44 जागा मिळाल्या. राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे पक्षाला सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळाली. महाविकास आघाडीच्या चर्चेत काँग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पुढाकार होता. सध्या प्रदेशाध्यक्षपदासाठी चव्हाण यांचे पक्षातील प्रतिद्वंदी राजीव सातव यांचे नाव आघाडीवर आहे.

बदनामीचे षड्यंत्र
सोनिया गांधी यांना लिहीलेल्या पत्राबाबतचे वृत्त खोटे आहे. जाणीवपूर्वक माझी बदनामी केली जात आहे. असे कोणतेही पत्र दिलेले नाही. या बातम्यांवर विश्‍वास ठेवू नये, असा खुलासा ना.अशोक चव्हाण यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com