Friday, April 26, 2024
HomeUncategorizedलॉकडाऊननंतर शाळा सुरु करताना…

लॉकडाऊननंतर शाळा सुरु करताना…

लॉकडाऊननंतरच्या काळात सर्वांत मोठे आव्हान शाळा सुरु करण्याचे आहे. शाळा सुरु करताना निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे. तसेच शाळेत मुले येण्यापूर्वी पालकांकडून पाल्य निरोगी आहे, असे प्रमाणपत्र भरुन घ्यावे लागेल. यामध्ये सध्याच्या परिस्थितीत शिक्षकांनी अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर न देता मुलांनी स्वयंअध्ययनाने कसे शिकावे, त्याची तंत्रे काय आहेत, त्याच्या पद्धती कोणत्या आहेत हे मुलांना शिकवावे. लर्निंग टू लर्न म्हणजेच शिकायचं कसं ते शिकवणे गरजेचे आहे. संकट मोठं आहे पण त्यापेक्षा माणूस मोठा आहे, त्यामुळे करोनासह शिक्षण हे यशस्वी करूया.

– डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होणार आहेत. पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, आणि विद्यार्थी सर्वांच्याच दृष्टीने अत्यंत जबाबदारीचा काळ असणार आहे; पण घाबरुन चालणार नाही. यासाठी आपल्याला पुढील पातळीवर काम करावे लागेल.
अ) समुपदेशन ब) शालेय स्वच्छता क) विद्यार्थांबाबत घ्यावयाची दक्षता. ड) अध्यापन इ) प्रशासन व्यवस्था

अ) समुपदेशन : करोनाच्या प्रसारापेक्षा त्याच्या भितीचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे. सर्व जण भेदरलेल्या अवस्थेत आहेत. अशा वेळी प्रत्येकाचे मनोबल उंचावणे, वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. हे काम समुपदेशनाचे आहे. शाळा सुरू झाल्यावर पहिल्या तासाला राष्ट्रगीताप्रमाणे ही समुपदेशनाची सीडी लावली तर त्याचा प्रभाव मुलांच्या मनावर चांगला होईल. दिवसभर मुलं आनंदाने शाळेत थांबतील. सीडी मात्र पॉवरफुल पाहिजे. प्रत्येक शाळेने उत्तम मानसशास्त्रज्ञाकडून ही सीडी तयार करून घेण्याची गरज आहे.
विद्यार्थी पालकांचे मनोबल जर स्ट्राँग असेल तर 10 करोना आले तरी काही करणार नाहीत. त्यांचा पराभव होईल.

- Advertisement -

ब) शालेय स्वच्छता : महाविद्यालयात प्रशासकीय विभाग, कँटिन, वर्गखोल्या, पॅसेज, मैदान, हॉल, प्रयोगशाळा अशा विविध जागा असतात. या प्रत्येक भागाचे रोज शिफ्ट प्रमाणे किंवा सुरुवातीला दिवसातून दोनदा तरी निर्जंतुकीकरणाचे फवारे मारावेत. सोडियम हायपोक्लोराईडने रोज शाळा भरण्यापूर्वी आणि शाळा सुटल्यानंतर बाक आणि जमीन स्वच्छ करावी. सध्या हा स्वस्त आणि सहज पर्याय उपलब्ध आहे. जसजसे दिवस जातील तसतसे हे प्रमाण दिवसातून एकदा किंवा शिफ्टप्रमाणे चालू ठेवावे. सेवकांबरोबर शिक्षकांनीही हे काम शिकून घ्यावे. खाजगी संंस्थांना हे काम देऊन संस्थांना आणि शाळांना ते आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही.
आपणच हे साहित्य खरेदी करुन हे काम करणे ही काळाची गरज आहे. स्वच्छतागृहे दिवसातून तीन-चार वेळा स्वच्छ करुन जंतुनाशके तिथे टाकली पाहिजेत. यासाठी दोन-तीन कर्मचार्यांची नेमणूक करावी लागेल. यासाठी आवश्यक तो खर्च करावाच लागेल. त्याला दुसरा पर्याय नाही. सर्व शैक्षणिक संस्थांना स्प्रे मारण्याची यंत्रणा आपल्या गरजेप्रमाणे विकत घ्यावी. शक्य असेल त्या मोकळ्या जागेवर किंवा टेरेसवर वृक्षलागवड करणे फार महत्त्वाचे आहे.
क) विर्द्यांबाबत घ्यावयाची दक्षता : शैक्षणिक प्रक्रियेतला केंद्रबिंदू म्हणचे विद्यार्थी. सर्व विद्यार्थांना करोना प्रतिबंधक सर्व गोष्टींचे प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम, समर्थ आणि सकारात्मक बनवणे ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे. 5-5 विद्यार्थांचा एक-एक याप्रमाणे गट करून त्यांच्यातील एकाला प्रमुख म्हणून नेमावे आणि सखोल प्रशिक्षण द्यावे. मास्क कसा वापरायचा, स्वच्छ कसा ठेवायचा, सोशल डिस्टन्सिंग कसे पाळायचे, शाळांमध्ये हात किती वेळा आणि कधी धुवायचे याविषयीचे हे प्रशिक्षण असावे. शाळेत मुले येण्यापूर्वी पालकांकडून पाल्य निरोगी आहे, असे प्रमाणपत्र भरुन घ्यावे. प्रत्येक संस्थेने आपापल्या परिस्थितीनुसार डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने प्रमाणपत्राचा नुमना तयार करावा. शक्यतो पालकांनी विद्यार्थांना शाळेत सोडावे.

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पायी चालतच शाळेत यावे. सद्यस्थितीत हा मार्ग सवार्र्ेत्तम आहे. रिक्षा, व्हॅन, बसमधून मुलांना पाठवणार्या पालकांनी थोडे पैसे जास्त गेले तरी चालतील पण रिक्षातून जास्तीत जास्त 3 आणि व्हॅनमधून प्रत्येक सिटवर एक याप्रमाणे वाहतूक करण्याचीच व्यवस्था निवडा. रिक्षा आणि व्हॅनला जास्त पैसे देण्याचा घासाघीस करू नका. त्यांचे हातावरचे पोट आहे.
विद्यार्थी शाळेत आल्यानंतर त्यांच्या हातावर सॅनिटायजर फवारणे आवश्यक आहे. वर्गात एका बेंचवर एक या प्रमाणे बैठक व्यवस्था करावी लागेल. त्यासाठी विद्यार्थ्याचे ऑड-इव्हन नंबरप्रमाणे गट करून किंवा मुली अन् मुले अशाप्रमाणे त्यांना एक दिवसाआड शाळेत बोलवावे. या प्रत्येकाला तीनच दिवस शाळेत यावे लागेल. ही कल्पना अवास्तव अयोग्य वाटत असली तरी काही दिवस याला पर्याय नाही. ‘घरचे दप्तर घरी आणि शाळेतले दप्तर शाळेत’ याप्रमाणे जर संस्थांना सोय करता आली तर हा सर्वोत्तम उपाय होईल.

विद्यार्थी मोकळे घरी जातील. शालेय पोषण आहार ज्यांना खरोखर गरज आहे त्यांच्यापुरताच मर्यादित स्वरुपात ठेवावा. त्यातही खिचडी न देता पपई, कलिंगड, पेरू, केळी, अशी फळे ठेवावीत. शाळेतले कँटिन शक्यतो बंद ठेवावे. शाळेत खानपान म्हणजे डबा सुद्धा मुले खाणार नाहीत अशी व्यवस्था करावी. यासाठी शाळा कमी वेळ भरवावी. शिक्षण थोडंसं कमी झालं तरी चालेल. प्रत्येक संस्थेने आपल्या विभागात एक आयसोलेशन रुम तयार करावी आणि त्यामध्ये आवश्यक ते प्रथमोपचार साहित्य ठेवावे. प्रत्येक संस्थेने डिजिटल थर्मामीटर (गरजेनुसार) विकत घ्यावेत. थोडा खर्च होईल; पण सद्य स्थितीत त्याची उपयुक्तता खूप आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळून विद्यार्थ्यांना मैदानावरचे खेळ भरपूर खेळू द्यावेत. योगासने, प्राणायाम, ध्यान आणि सूर्यनमस्कार यासाठी रोज वेळापत्रकात वेळ ठेवावा. रोगप्रतिबंधन हा सर्वोत्तम व प्रभावी उपाय आहे.

अध्यापन प्रक्रिया- नव्या आपत्तीच्या संदर्भात येणारे शैक्षणिक वर्ष अध्यापनाबाबत नवं आव्हान घेऊन येत आहे. प्रत्येक शिक्षक कल्पक, बुद्धिमान, गुणवान, कृतीशील व सर्जनशीलतेचा पुरस्कर्ता आहे; पण आता याबरोबरीने तो तंत्रज्ञानात परिपूर्ण असलाच पाहिजे. जो नसेल त्याने ऑनलाईन शिक्षण, इंटरनेट, स्मार्टफोन, लॅपटॉप, शैक्षणिक अ‍ॅप्स, आभासी शिक्षण या सर्व गोष्टी शिकून घेतल्याच पाहिजेत. ऑनलाईन शिक्षक या नव्या कल्पनेकडे आपल्याला जावेच लागेल. प्रत्येक शिक्षकाने आपल्या कामाचा ‘कृती आराखडा’ (अ‍ॅक्शन प्लॅन) तयार केला पाहिजे. अभ्यासक्रमाचा अभ्यासक्रम करावा लागेल. स्वयंअध्ययन, आभासी शिक्षण, कल्पक स्वाध्याय व प्रत्यक्ष वर्गात शिकवणे यामध्ये अभ्यासक्रमाची विभागणी करावी. खरं म्हणजे ही उत्तम संधीच आहे. यापूर्वी आपण फार विचार कधी केलाच नाही. कल्पकतेला वाव दिलाच नाही. नाविन्यपूर्ण गोष्टी करुन पाहिल्याच नाहीत. आता हेच सर्व करावे लागेल आणि आपण ते नक्की करणार. कारण आपण तेवढे सक्षम आहोत. खेळाचे नवे प्रकार शोधावे लागतील. मोठ्या परीक्षा (प्रथम, द्वितीय सत्र) घ्यायच्या की नाही हे ठरवावे लागेल. त्याऐवजी महिन्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन चाचणी घ्यावी व त्यावरुन सरासरी काढून निकाल लावावा. रॅपिड फायरप्रमाणे ऑनलाईन छोट्या छोट्या (कमी गुणांच्या) परीक्षा सातत्याने घेणे अधिक श्रेयस्कर, परिणामकारक व प्रभावी ठरेल.

सध्याच्या परिस्थितीत शिक्षकांनी अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर न देता मुलांनी स्वयंअध्ययनाने कसे शिकावे, त्याची तंत्रे काय आहेत, त्याच्या पद्धती कोणत्या आहेत हे मुलांना शिकवावे. (लर्निंग टू लर्न). फार शिकवू नका, शिकायचं कसं ते शिकवा.

प्रशासकीय व्यवस्था- शाळा कमी वेळ भरवावी. सर्व सुट्या (मोठी सुट्टी-छोटी सुट्टी) बंद कराव्यावत. त्यामुळे शाळेत खान-पान (डबा, खिचडी) बंद होईल. समूहावर बंधने येतील. डब्वा, खिचडी बंद होईल. समूद वर बंधने येतील.2) कमी वेळात सर्व विषयांचे तास बसतील याप्रमाणे वेळापत्रक करावे. 3) प्रत्येक वर्गातल्या विद्यार्थांची दोन गटात नियमावली करून त्यांना एक दिवसाआड शाळा ठेवावी म्हणजे एका बाकावर एकच विद्यार्थी हे शक्य होईल. 4. फी ऑनलाईन किंवा चेकनेच स्विकारावी. 5) मेडिकल चेकअपचा प्रयत्न करू नये. कारण त्यात करोना कळत नाही. त्याच्या स्पेशल टेस्ट आहेत. 6) प्रशिक्षणे आणि मिटींग (स्टाफ मिटींगसुद्धा) ऑनलाईन घ्याव्यात. 7) क्षेत्र -भेटी, सहली, शिबिरे, गेस्ट लेक्चर, उत्सव काही दिवसांसाठी आयोजित करू नयेत. 8) व्हर्च्युअल क्लासरूम तयार करा. 9) व्हिजिटर्स नॉट अलाऊड हे कटाक्षाने पाळावे. 10) विद्यार्थ्यांच्या चपला-बुट वर्गाबाहेर ठेवण्यासाठी व्यवस्था करावी.
संकट मोठं आहे पण त्यापेक्षा माणूस मोठा आहे, त्यामुळे करोनासह शिक्षण हे यशस्वी करूया.

- Advertisment -

ताज्या बातम्या