तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने…?
Featured

तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने…?

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

– डॉ. जयदेवी पवार

जगाने आजवर दोन महायुद्धे अनुभवली आहेत आणि कोरोना विषाणूंचा संसर्ग चीनमधून जगभरात पोहोचल्यानंतर आता काहीजणांना तिसर्या महायुद्धाची शक्यता वाटू लागली आहे. अनेक आडाखे बांधले जात आहेत. कोणतेही महायुद्ध एखाद्या विशिष्ट कारणामुळे कधीच होत नाही. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या जागतिक घडामोडींमुळे महायुद्धाची सुरुवात होते आणि हळूहळू त्यात जगातील अनेक देश सहभागी होत राहतात. अर्थात, अनेक वर्षांच्या परिस्थितीमुळे आणि घडामोडींमुळे महायुद्ध सुरू होत असले, तरी ठिणगी पडण्यासाठी एखादी घटना कारणीभूत नक्कीच ठरते. वर्षानुवर्षे साठलेल्या दारूगोळ्याची वात पेटवण्याचे काम ही घटना करते. उदाहरणार्थ, ऑस्ट्रियाचे राजकुमार आर्कड्यूक फ्रान्सिस फर्दिनंद यांची हत्या हे पहिल्या महायुद्धाची सुरुवात होण्यास निमित्त ठरले, तर जर्मनीने पोलंडवर केलेला हल्ला हे दुसर्या महायुद्धाला निमित्त ठरले. काही जाणकारांच्या मते, तिसरे महायुद्ध पेटण्याच्या दृष्टीने बराच दारूगोळा जमा झाला आहे. जागतिक परिस्थिती पाहता ते खरेही आहे. परंतु प्रत्यक्ष युद्ध पेटण्यासाठी कोणत्या घटना कारणीभूत ठरू शकतात, याकडे बारकाईने लक्ष ठेवून असायला हवे.

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याच्याकडून होणार्या काही चुकीच्या हालचाली तिसर्या महायुद्धाला तोंड फुटण्यास कारणीभूत ठरू शकतात. गेल्या महिनाभरापासून किम जोंग उन याचे एक नाटक सुरू आहे. कधी तो अचानक गायब होतो तर कधी अचानक युरेनियम प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावताना दिसतो. किम जोंग हा सुमारे 20 दिवस गायब होता. त्याच्या प्रकृतीविषयीही उलटसुलट बातम्या येत राहिल्या. नंतर तो अचानक प्रकट झाला आणि कोणीही चिथावणी दिलेली नसताना दक्षिण कोरियाविषयी शत्रुत्वभावनेने हालचाली सुरू केल्या.

हुकूमशहा किम जेव्हा बर्‍याच दिवसांनी प्रकट झाला, तेव्हा दक्षिण आणि उत्तर कोरियादरम्यानच्या सीमेवर गोळीबार सुरू झाल्याच्या बातम्या आल्या. याखेरीज आपल्याकडील अण्वस्त्रांची संख्या वाढविण्याची धडपड किम सातत्याने करीत आहे. त्याच्याकडे 20 ते 30 अणुबॉम्ब असण्याची शक्यता आहे आणि ही संख्या आणखी वाढविण्याचा त्याचा प्रयत्न आहे. ही बाब अमेरिकेसह पाश्चात्य देशांना कधीच पसंत पडणार नाही. कारण किम जोंग उन याच्याकडे दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे आधीपासूनच उपलब्ध आहेत. अशा स्थितीत किमने अणुबॉम्बचे उत्पादन सुरू करणे जगासाठी घातक ठरू शकते. किम जोंग उन हा चीनचा मोहरा मानला जातो तर दक्षिण कोरियाला पाश्चात्य जगताकडून संरक्षण प्राप्त झाले आहे. अशा स्थितीत किम जोंगकडून चूक घडल्यास जागतिक युद्धाला निमंत्रण मिळू शकते.
अमेरिका आणि चीनदरम्यान गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले व्यापारयुद्ध हेही तिसर्या महायुद्धाला कारणीभूत ठरू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. जगात युद्धे भडकण्याची बहुतांश कारणे आर्थिक असतात. अमेरिका-चीन व्यापारयुद्ध आटोक्यात आणण्यासाठी खूप मोठे प्रयत्न करावे लागले. परंतु हा तणाव संपुष्टात येता-येताच कोरोना विषाणूने जगाला ग्रासले. या विषाणूच्या प्रसाराला चीन कारणीभूत असल्याचा प्रचार अमेरिकेने चालविला आहे आणि चीनविरुद्ध कारवाई करण्याची भाषा सुरू केली आहे. ‘कोविड-19 च्या प्रसारकाळातील आक्रमक अधिग्रहणास प्रतिबंध करणारा अधिनियम’ अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेत सादर करण्यात आला आहे.

अमेरिकेत सुरू असलेल्या चीनच्या आर्थिक हालचालींना लगाम घालणे हा या अधिनियमाचा उद्देश आहे. याखेरीज चीनविरुद्ध कारवाई करण्यासाठी अमेरिका एक सूची तयार करीत असून, त्यात अमेरिकी कर्ज दायित्व रद्द करण्यापासून नवे व्यापारी धोरण तयार करण्यापर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. या उपाययोजना केल्यास चीनचे आर्थिक कंबरडे मोडू शकते. अमेरिकेत चीनची अब्जावधी डॉलरची रक्कम अडकलेली आहे. चीनची देणी देण्यास अमेरिकेने नकार दिल्यास आणि चीनविरुद्ध आर्थिक निर्बंध लादल्यास चीन बरबाद होऊ शकतो. ही कारवाई रोखण्यासाठी चीन कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशा प्रकारे खूप प्रयत्नांनी शांत केलेले आर्थिक युद्ध पुन्हा भडकल्यास तेही तिसर्या महायुद्धाला कारणीभूत ठरू शकते.

संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूशी लढा देण्यात गुंतले आहे. परंतु चीनने मात्र दक्षिण चीन समुद्रात आपली हुकूमत प्रस्थापित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे त्या क्षेत्रात तणावाला आमंत्रण मिळाले आहे. दक्षिण चीन समुद्राच्या क्षेत्रात चीनच्या हालचाली आक्रमक असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. त्याला उत्तर देताना अमेरिकेत लवकरच अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार असल्यामुळे ट्रम्प प्रशासन वातावरण गढूळ करीत असल्याचा प्रत्यारोप चीनने केला आहे.
या तणावपूर्ण वातावरणातच चीनच्या युद्धनौकांनी युद्धसराव केला. त्याच वेळी अमेरिकेचे ब्रह्मास्त्र मानली जाणारी एफ-35 लढाऊ विमाने अमेरिकेने अलास्कामध्ये ‘अलर्ट मोड’वर ठेवली आहेत. याखेरीज यूएस-आसियान व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माइक पॉम्पियो यांनी असा आरोप केला की, जग कोरोनाविरोधी युद्धात गुंतल्याचा फायदा घेऊन दक्षिण चीन समुद्र क्षेत्रात चीन आपले विस्तारवादी धोरण रेटण्याचा प्रयत्न करीत आहे. या आरोपानंतर उभय देशांमधील तणाव पुन्हा चव्हाट्यावर आला. या वादाचे मूळ म्हणजे, संपूर्ण दक्षिण चीन सागरी क्षेत्रावर चीन आपला दावा सांगतो. परंतु या सागरी क्षेत्राच्या सीमा व्हिएतनाम, फिलिपीन्स, तैवान, मलेशिया आणि ब्रुनेई या देशांना भिडतात. या देशांच्या रक्षणासाठी या क्षेत्रात अमेरिकी नौदल तैनात आहे. परंतु या क्षेत्रात अमेरिकी युद्धनौकांची तैनाती चीनला मान्य नाही. या क्षेत्रात अमेरिका-चीनदरम्यान मोठा तणाव आहे.

अस्त्र-शस्त्रांनी सज्ज असलेल्या अमेरिकी आणि चिनी युद्धनौका अनेकदा या क्षेत्रात आमनेसामने आल्या आहेत. एकाही जहाजावरून एक गोळा जरी डागला गेला, तरी युद्धाची ठिणगी पडू शकते आणि त्यात संपूर्ण जग होरपळू शकते. ही शंका अनाठायी मुळीच नाही, हे दुसर्‍या महायुद्धादरम्यान पर्ल हर्बर येथे घडलेल्या घटनेवरून स्पष्ट होते. या घटनेमुळेच जगातील पहिला अण्वस्त्रहल्ला झाला होता आणि जपानमधील हिरोशिमा, नागासाकी ही शहरे जळून भस्मसात झाली होती.

अमेरिकेकडून चीनवर आर्थिक कारवाईचे संकेत मिळत असताना आणि कोरोना विषाणूंच्या प्रसारामुळे संपूर्ण जग चीनवर संतापले असताना चिनी नेतेसुद्धा गाफिल नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. चीनच्या संरक्षण मंत्रालयाने एप्रिल महिन्याच्या प्रारंभी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासह चीनमधील वरिष्ठ नेत्यांना एक अहवाल सुपूर्द केला होता. अमेरिकेसोबत सशस्त्र संघर्षाच्या सर्वांत वाईट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी चीनने तयार राहायला हवे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. चीनच्या संरक्षण मंत्रालयाशी संबंधित ‘चायना इन्स्टिट्यूट ऑफ कन्टेम्पररी इंटरनॅशनल रिलेशन्स’ (सीआयसीआयआर) या संस्थेने हा अहवाल तयार केला असून, ती चीनची सर्वांत मोठी गुप्तचर संस्था आहे. अमेरिका हा चीनच्या उदयाला, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षिततेला तसेच पाश्चात्य देशांमधील लोकशाहीला आव्हान देणारा देश असल्याचे मत या अहवालात नोंदविले आहे.

जनतेमधील विश्वासाची भावना कमी करून कम्युनिस्ट सरकारला पदच्युत करण्याचा अमेरिकेचा डाव असल्याचेही त्यात म्हटले आहे. अमेरिकेसह पाश्चात्य देश आपल्याविरुद्ध एकवटतील आणि आपल्याला गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागेल, याचा चीनला पुरेपूर अंदाज असल्याचे या अहवालातून स्पष्ट होते. त्यामुळेच चीनचे लष्करही सजग झाले आहे, हेही उघड आहे. चीनने नुकतीच अण्वस्त्रचाचणीही घेतली आहे. परंतु चीनने सध्याच्या स्थितीत एक जरी दुःसाहस केले तरी ती एक मोठ्या युद्धाची ठिणगी ठरेल.

अमेरिका चीनविरुद्ध लष्करी कारवाई करेल आणि या युद्धात संपूर्ण जग ओढले जाईल, हे लक्षात घ्यायला हवे. अशा जागतिक परिस्थितीत भारतासारख्या देशाने दोन्ही पक्षांपासून दूर राहणे आणि स्वतःची ताकद अबाधित राखून जगाचे नेतृत्व करण्यासाठी तयार राहणे अपेक्षित आहे.

Deshdoot
www.deshdoot.com