आपण शहाणे कधी होणार ?

jalgaon-digital
7 Min Read

राजेंद्र पाटील,

9822753219

जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. 162 देशांमध्ये या जीवघेण्या विषाणूने सात हजारांपेक्षा जास्त जीव घेतले आहेत. दिवसेंदिवस भारतातही परिस्थिती गंभीर होत चालली आहे. करोना व्हायरसची निर्मिती भारतात झालेली नाही. अनेक देशांचा प्रवास करून तो भारतात आला आहे. त्यामुळे त्याचे धोके, तीव्रता, त्यातून होणारे नुकसान हे सर्व माहिती असतानाही आपल्याकडे सामाजिक स्तरावर त्याबाबत गांभीर्य अथवा सजगता दिसून येत नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल.

अहमदनगर जिल्ह्यातील आठ जण दुबईला गेले होते. दुबईतून भारतात परतल्यानंतर हे आठही जण ताप, सर्दी आणि खोकल्यामुळे त्रस्त असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे नगर जिल्हा रुग्णालयातील करोना विलगीकरण कक्षामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु हे आठही रुग्ण पसार झाले होते. त्यापैकी पाच रुग्ण परत आले. पुण्यामध्येही भोसरी येथे अशीच घटना घडली होती. तिथेही एका रुग्णाने पलायन केले होते. या घटना बघता आपण शहाणे कधी होणार? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. दिवसेंदिवस महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. काही बळी गेले आहेत. राज्य सरकार स्वत: केंद्र सरकारच्या मदतीने खबरदारी घेत आहे व उपाययोजना करीत आहेत. महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्णांची संख्या पुण्यामध्ये आहे. 1 मार्चला दुबईच्या सहलीहून आलेल्या विमान प्रवाशांना करोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये पुणे, अहमदनगर, यवतमाळ, सातारा, मुंबई, ठाणे, रायगड या भागातीलही प्रवासी होते. तेव्हापासून राज्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सध्या उपचार सुरू असलेल्यांपैकी बाहेर देशातून प्रवास करून आलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. स्थानिक स्तरावर संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या बोटावर
मोजण्याजोगी आहे.

असे असले तरी हा संसर्ग आटोक्यात आला आहे, असे समजणे चुकीचे आहे. हे सरकार प्रशासन दररोज सांगत आहे. त्यासाठी शासन पातळीवर अनेक निर्णय घेतले जात आहेत; परंतु त्याचे गांभीर्य अजून आपल्याला आलेले दिसत नाही. यामध्ये दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. विमानतळावर बाहेरून आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. सर्दी, खोकला, ताप असलेल्या रुग्णांना सरकारी पातळीवर व्यवस्था करण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये त्वरित दाखल करून घेतले जात आहे. करोनाचा संसर्ग झाला की नाही याचा अहवाल आल्यानंतर एकतर विलगीकरण कक्षात उपचारासाठी ठेवले जात आहे. तर ज्यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे अशांना सोडून देण्यात येत आहे. ज्यांना कुणाला करोना विषाणूचा संसर्ग झाला आहे ते सर्व शक्यतो बाहेर देशातून आलेले आहेत. ते सुशिक्षित असणार असे म्हणायला हरकत नाही. त्यांना करोनाचे गंभीर परिणाम, एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीला होणारा संसर्ग, त्यातून निर्माण होणारे सामाजिक संकट याची कल्पना नसेल का? कारण उपचार करून घेऊन बरे होऊन घरी जाण्याऐवजी उपचार सुरू असताना रुग्णालयातून पलायन करण्यामागची त्यांची मानसिकता काय आहे? टीव्ही, वर्तमानपत्रे, सोशल मीडिया याद्वारे करोना व्हायरसचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीला कसा होतो, त्याबाबत संसर्ग झालेल्या व्यक्तीने कुठली खबरदारी घेतली पाहिजे याबाबतच्या माहितीचा प्रसार सुरू आहे.

पुण्यामध्ये सुरुवातीला करोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे जे रुग्ण आढळले त्यांच्याही बाबतीत काही गोष्टी समोर आल्या. बाहेरच्या देशातून भारतात आल्यावर काही लक्षणे असल्यावर त्या प्रवाशांची विमानतळावर चाचणी करून त्यांना विलगीकरण कक्षात ठेऊन त्यांच्या करोना संसर्ग चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडले जाते. ‘होम क्वारंटाईन’ करण्याच्या सूचना केल्या जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे परदेश दौरा करून आलेले आहेत पण ज्यांना कुठलीही लक्षणे नाहीत अशा प्रवाशांनासुद्धा 14 दिवस कोणाच्याही संपर्कात न राहण्याच्या म्हणजेच 14 दिवस ‘होम क्वारंटाईन’ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असे असताना केवळ इगो आड येऊन या सूचना झुगारून अशा व्यक्ती समाजात वावरल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची करोना संसर्ग चाचणी करण्याचे वाढीव काम शासन व प्रशासकीय यंत्रणेवर पडते आहे. याचा विचारच आपण करत नाही. जेव्हा चीनमध्ये करोनाचा उद्रेक झाला तेव्हा युरोपातील देश गाफिल राहिले. ही महामारी फक्त चीनपुरती मर्यदित राहील अशा भाबड्या कल्पनेत राहिल्याने त्यांच्यावर संकट कोसळल्याचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. दुसर्‍या टप्प्यात असतानाही इटली, जर्मनी आदी युरोपियन देशांनी शाळा, महाविद्यालये सुरू ठेवली. नंतर लोकांना सुटी दिल्यानंतर ते लोक रस्त्यावर फिरत राहिले. पर्यायाने युरोपातील पाच हजार जणांना प्राण गमवावे लागले.

भारतात किंवा महाराष्ट्रात अजूनही परिस्थिती नियंत्रणात आहे. ती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि करोनापासून वाचवण्यासाठी ‘होम क्वारंटाईन’ (घरात एकटेच राहणे) महत्त्वाचे आहे हे समजून घेतले पाहिजे. त्याचा मुख्य उद्देशच मुळी स्वत:चे आणि कुटुंबाचे रक्षण करणे हा आहे. तो उद्देश डोळ्यासमोर ठेऊन जर स्वत:ला किंवा कुटुंबातील कोणाला लागण झाल्याचा संशय असेल तर मार्गदर्शक सूचनांच्या तत्त्वानुसार आपले वर्तन आवश्यक आहे, हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. तसे केल्यानंतर त्याचा त्रास समाजातील इतरांना होणार नाही व 130 कोटीच्या देशाला संकटाच्या खाईत लोटण्यापासून आपण वाचवू शकतो याचा गांभीर्याने विचार संबंधित व्यक्तींनी करण्याची आवश्यकता आहे.

युरोपातील देशांच्या आणि तेथील नागरिकांच्या निष्काळजीपणाचे परिणाम डोळ्यासमोर असताना सिंगापूरसारख्या देशाचे उदाहरण डोळ्यासमोर आपण ठेवणे आवश्यक आहे. त्यांनी राबवलेली धोरणे आणि त्यामध्ये असलेला जनतेचा सकारात्मक सहभाग यामुळे सिंगापूरसारखा देश करोनाच्या संसर्गाला रोखू शकला. त्यांनी करोनाची बाधा झालेल्यांची ओळख पटवून त्यांच्यावर उपचार केले आणि त्या उपचारासाठी रुग्णांनीही त्यांच्याकडून योग्य ती खबरदारी घेऊन सहकार्य केले. संसर्ग झालेल्यांना वेगळे ठेवले, परकीय पर्यटकांची वेगळी नोंद ठेवली, लोकांचे व्हॉटस्अ‍ॅपचे ग्रुप तयार करून जागरुकता निर्माण केली. आपल्याकडे जागरुकतेपेक्षा याविषयी सोशल मीडियावर ‘मिम्स’चा संसर्ग जास्त दिसतो.

भारतात करोना काही करू शकत नाही याबद्दलचे मेसेज फिरल्याने जे काही गांभीर्य निर्माण झालेले असते त्यालाही समाजाकडून हरताळ फासला जातो. त्याचा परिणाम पुढे गंभीर होणार याची जाणीव आपल्याला नसते. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून आपण शहाणे होण्याची गरज आहे. शासनस्तरावर जे निर्णय घेतले जात आहेत आणि त्याची अंमलबजावणी करणारे प्रशासन यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन आणि त्यांना पूर्ण सहकार्य आपण सर्वांनी केले तर हे महासंकट आपणही लिलया परतवून लावू शकू याबाबत तीळमात्र शंका नाही. सिंगापूर छोटा देश आहे. परंतु 130 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाने या जीवघेण्या संकटातून स्वत:ला कसे वाचवले याचा साक्षीदार होण्याची संधी आपल्याला आहे, असा विचार करूनच करोना संशयित, बाधित, परदेशातून आलेले नागरिक आणि आपण सर्वांनी आपले सामाजिक वर्तन नियंत्रणात ठेवल्यास या महासंकटाचा सामना करण्यात नक्की
यशस्वी होऊ.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *