दिलासा पावसाच्या अंदाजाचा !

jalgaon-digital
7 Min Read

यंदा सरासरीच्या 100 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन नायर राजीवन यांनी व्यक्त केला आहे. भारतासारख्या उष्ण कटीबंधिय प्रदेशात पावसाचा अचूक अंदाज वर्तवणं कठीण असतं. अशा परिस्थितीत प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पावसाच्या अंदाजात आलेली 98 टक्के अचूकता महत्त्वाची मानायला हवी.

डॉ. मुकुंद गायकवाड

कोरोनाच्या संकटाने अवघ्या देशवासियांच्या तोंडचं पाणी पळालं असताना एव्हाना देशातल्या अनेक भागांमध्ये जनतेला कडाक्याच्या उन्हाळ्याबरोबरच तीव्र पाणीटंचाईच्या झळाही सहन कराव्या लागत आहेत. बहतांश ठिकाणी तापमान 38 ते 41 डिग्री सेेल्सीयसच्या दरम्यान पोहोचलं आहे. एप्रिल- मे महिन्याचा कडाक्याच्या उन्हाळ्याचा बराच काळ जायचा आहे. तोपर्यंत असह्य उष्म्याला तोंड द्यावं लागण्याची शक्यता जास्त आहे.

या पार्श्वभूमीवर या वेळचा पावसाळा वेळेवर सुरू होईल का, पर्जन्यमान पुरेसं असणार का असे प्रश्न अनेकांच्या मनात उभे राहत आहेत. सततच्या दोन-तीन वर्षांच्या दुष्काळानंतर गेल्या वर्षी अवघ्या देशात चांगला पाऊस पडला. याच धर्तीवर यावेळीही पाऊस समाधानकारक व्हावा, अशी सार्या जनतेची इच्छा आहे. त्या दृष्टीने दिलासादायक वृत्त तर आलं आहे. यंदा सरासरीच्या 100 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन नायर राजीवन यांनी व्यक्त केला आहे. अवघ्या पावसाळ्यात पाऊस 96 ते 104 टक्क्यांच्या दरम्यान राहिल्यास सामान्य मानला जातो. त्यामुळे यावेळी पावसाळ्यानंतर देशातल्या अनेक भागांमध्ये दुष्काळाचं सावट राहणार नाही, याबद्दल आशा पल्लवीत झाल्या आहेत.

अलीकडे प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञानाबरोबर हवामानाचा अंदाज वर्तवणार्या यंत्रणेतही सुधारणा होत आहेत. त्यात अत्याधुनिक उपकरणांचा समावेश केला जात आहे. शिवाय अंतराळात विशेष उपग्रहही सोडण्यात आले आहेत. त्याचबरोबर 2007 पासून ङ्गईएसएसओ-आयएमडीफ या मॉडेलचाही वापर करण्यात येत आहे. ही सांख्यिकी पूर्वानुमान पध्दती असून त्या अंतर्गत पाच पूर्वसुचकांचा वापर करण्यात येत आहे. एवढंच नव्हे तर, देश-परदेशातल्या प्रसिध्द हवामान संस्थांच्या अंदाजाचीही मदत घेतली जात आहे. या प्रयत्नांमागे हवामान अंदाजात अधिक अचुकता यावी हाच उद्देश आहे. भारतात साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनचा पाऊस पडतो. परंतु सर्वत्र त्याचं प्रमाण सारखंच नसतं. त्यामुळे एका भागात पूरपरिस्थिती तर दुसर्या भागात दुष्काळ असं विपरित चित्र पहायला मिळतं. सुरूवातीला मान्सून केरळच्या किनारपट्टीवर येऊन थडकतो. साधारणपणे एक जूनच्या सुमारास मान्सून केरळमध्ये येणं अपेक्षित असतं. तसं झाल्यास त्याचा पुढील प्रवास वेळेत होण्याबाबत खात्री बाळगता येते.

केरळनंतर तो सात जूनपर्यंत गोव्यात पोहोचू शकतो. त्यानंतर तो कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान असा फेरफटका मारत दिल्लीत धडक मारतो. सप्टेंबरमध्ये मान्सून परतीच्या प्रवासाला लागतो आणि ऑक्टोबरअखेर पूर्णपणे गायबही होतो. असं असलं तरी गेल्या काही वर्षांमध्ये जूनमध्ये सरासरीच्या मानाने पावसाचं प्रमाण कमी होत असल्याचं पहायला मिळतं. जुलैमध्ये मात्र तो चांगलाच पडतो असंही चित्र आहे. मान्सूनच्या काळात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार होतात. हे पट्टे जितके मोठे तितका पाऊस जास्त असं साधारण समीकरण असतं.

काही वेळा मात्र कमी दाबाचे पट्टे आवश्यक त्या प्रमाणात तयार होताना दिसत नाहीत. याचाही परिणाम एकूण पर्जन्यमानावर होतो. या पार्श्वभूमीवर अलिकडेच वर्तवण्यात आलेला अंदाज प्राथमिक स्वरूपाचा आहे. यानंतर आणखी काही अंदाज वर्तवले जातील. प्रादेशिक स्तरावरही हवामानाचे अंदाज व्यक्त केले जातात. अलीकडे हे अंदाज 98 टक्क्यांपर्यंत अचूक ठरत असल्याचं पहायला मिळतं. त्यामुळे हवामानाचे अंदाज अचूक ठरत नाहीत, असं म्हणताना मान्सूनवर परिणाम करणारे विविध घटक विचारात घ्यायला हवेत. पाऊस कसा येणार या संदर्भात काही समजही प्रचलित आहेत.

उन्हाळा अधिक असतो त्या वर्षी पाऊस चांगला पडतो हा ही असाच एक समज. पण त्यात अगदीच तथ्य नाही असं म्हणता येणार नाही. कारण मान्सूनवर हिंदी महासागर तसंच पॅसिफीक महासागरातल्या तापमानाच्या स्थितीचाही परिणाम होत असतो. आपल्या देशाच्या तिन्ही बाजुंना समुद्र आहे. जमीन आणि समुद्र असा हा चिंचोळा प्रदेश आहे. साहजिक उन्हाळा सुरू झाल्यावर समुद्राचं पाणी आणि जमीन हे शेजारी असणारे दोन्ही घटक तापू लागतात. अर्थात समुद्राच्या पाण्याच्या मानाने जमीन लवकर तापते. जमीन आणि पाणी यांच्या तापमानातला फरक म्हणजे हवेच्या दाबातला फरक होय. या हवेच्या दाबामुळे मान्सूनचे वारे निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर उन्हाळा जास्त असेल तर पाणी आणि जमीन या दोन्हीच्या तापमानातला फरकही वाढतो. त्याचा परिणाम मान्सूनवर होतो. साहजिक त्या वर्षी पाऊस समाधानकारक होतो. त्यामुळे उन्हाळा जास्त असतो त्या वर्षी पाऊस चांगला पडतो हा समज चुकीचा नाही. पण चांगल्या पावसासाठी तो एकच घटक कारणीभूत ठरतो असं म्हणता येत नाही. त्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात.

भारत हा उष्ण कटीबंधिय प्रदेश आहे. अशा प्रदेशात पावसाचा अचूक अंदाज वर्तवणं कठीण असतं. अशा परिस्थितीत पावसाच्या अंदाजातली 98 टक्के अचूकता महत्त्वाची मानायला हवी. त्यात हवामानाची निरिक्षणं नोंदवणं, उपग्रहांकडून वेळोवेळी माहिती मागवून घेणं यांचा समावेश असतो. अलीकडे उंच, पहाडी आणि विरळ मानवी वस्ती असणार्या किंवा ती नसणार्या प्रदेशात स्वयंचलित प्रयोगशाळा उभारल्या जात आहेत.

त्याद्वारेही त्या त्या भागातल्या हवामानबदलाचा अभ्यास करण्यात येत आहे. उपग्रहांकडून केवळ ढगांची छायाचित्रं न मागवता आणखी तपशील मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. या सार्यांमध्ये इतर संस्थांचं मार्गदर्शन, सहाय्य मोलाचं ठरतं. त्यात आयआयएस, बंगळुरू, आयआयटी दिल्ली, आयआयटी खरगपूर या संस्थांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. या शिवाय जागतिक स्तरावर अमेरिका, लंडन, जपान आदी देशातल्या प्रगत तंत्रज्ञानाने युक्त संस्थांचं सहकार्यही महत्त्वाचं ठरतं. अशा सार्या प्रयत्नांनंतर हवामानाचा अंदाज समोर येत असतो. यावरून हवामानाच्या अंदाजामागे किती गोष्टींचा अभ्यास असतो हे लक्षात येईल. इतकं होऊनही हवामानाचे अंदाज तंतोतंत खरं ठरणं कठीण असतं. कारण त्यालाही काही मर्यादा आहेत.

खरं तर प्रत्येक वर्षीचा मान्सून वेगळा असतो. कधी तो वेळेवर येतो आणि नंतर काही दिवस गायब होतो. कधी तो उशीरा येऊनही सरासरीइतका होतो. मागील वर्षाचंच उदाहरण घ्यायचं तर जून महिना कोरडा गेला होता. परंतु नंतर चांगला पाऊस पडला. चांगला काय, वर्षअखेरीपर्यंत धो धो कोसळत राहिला. पावसाच्या अशा लहरीपणामागे अनेक कारणं आहेत. त्याचबरोबर मान्सूनमध्ये वेगाने आणि सतत बदल होत असतात. त्यामुळे त्याबद्दल काही दिवस आधी अचूक अंदाज वर्तवणं कठीण असतं. उदाहरण द्यायचं तर जुलै-ऑगस्टमधल्या हवामानाचा अंदाज आताच वर्तवणं कठीण आहे.

तरिही या अंदाजात अधिक नेमकेपणा आणण्याचे प्रयत्न होत आहेत. अलीकडे दहापैकी आठ अंदाज बरोबर येत आहेत. असं असलं तरी अंदाज बरोबर ठरत नसल्याबद्दल हवामान खात्याला दोष दिला जातो. पण तो देणार्यांनी हवामान खात्यात केला जाणारा अभ्यास, त्यासाठी घेतले जाणारे श्रम आणि एवढं होऊनही हवामान अंदाज वर्तवण्याबाबत असणारी बंधनं या सार्यांचा विचार करायला हवा. अर्थात, अलीकडे असा विचार करणार्यांचं प्रमाण वाढत आहे. लोकांच्या मनोवृत्तीतील हा बदल निश्चित स्वागतार्ह म्हणायला हवा. पण त्याच वेळी अत्याधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून हवामानाच्या अंदाजात अधिकाधिक अचूकता आणण्याबाबत हवामान खातं कटीबध्द आहे, हे ही लक्षात घ्यायला हवं.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *