टोळधाड एक नैसर्गिक आपत्ती…

टोळधाड एक नैसर्गिक आपत्ती…

अनिल पाटील
मो. 9307039648

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या सीमेकडून भारतात टोळधाड आली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश असा प्रवास करीत टोळधाड महाराष्ट्रात दाखल झाली आहे.अमरावती जिल्ह्यात या टोळधाडने मोठे नुकसान केले आहे. जळगाव जिल्ह्यात नुकसान होऊ नये, यासाठी कृषी विभागाने शेतकर्‍यांना जागृत केले असून उपाययोजना सुरू केल्या आहेत. टोळधाड संदर्भातील बातम्या वाचून त्याचा ऐतिहासिक तपशील जाणून घेतले. खान्देशात आपण ज्याला नाकतोडा म्हणतो, तोच टोळ असून त्याचे दोन प्रकार असतात.

1) वाळवंटी टोळ, 2)प्रवासी टोळ असे आहेत. टोळचे एकाकी रूप म्हणजे नाकतोडा आणि सांघिक रूप म्हणजे टोळधाड होय. इंग्रजीत त्याला लोकस्टं म्हणतात. जळून गेल्यावर जमीन जशी बनते तशीच टोळ येऊन गेल्यावर जमीन दिसू लागते. हजारो एकरातील उभी पिके हे टोळ एका दिवसात खाऊन नष्ट करतात. टोळ नाहीत, असा जगातला कोणताही उपखंड नाही. जगात आधीच कोरोनाचे संकट असताना पाकिस्तानच्या हद्दीतून राजस्थानमार्गे भारतात आलेल्या या टोळधाडीचे नवे संकट येऊ घेतले आहे; नव्हे, ते आले आहे.

मुंबई टोळने यापूर्वी 1956 मध्ये राजस्थान व 1960 मध्ये मध्य प्रदेशात खूप नुकसान केले होते. यापूर्वी जळगाव जिल्ह्यात 1869, 1873, 1882, 1890 व 1904 या वर्षात टोळधाड येऊन गेली आहे. 1828-1829 या वर्षी यावल तालुक्यातील 45 गावांत टोळधाडमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद आढळते. यामुळे सुमारे 20,275 रुपये जमीन महसूल रद्द करण्यात आला होता. 60 वर्षांपूर्वी जिल्ह्यात टोळ येऊन गेल्याची नोंद झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील शेतकरी सजग झाले असून टोळधाडचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाले असतील आणि संभाव्य नैसर्गिक आपत्तीमधून ते सही-सलामत बाहेर पडतील, अशी खात्री बाळगूया!

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com