स्मरण कडव्या स्वातंत्र्यवीराचं
Featured

स्मरण कडव्या स्वातंत्र्यवीराचं

Balvant Gaikwad

प्रखर बुध्दिमत्ता आणि प्रतिभा यांचा समन्वय होऊन एखादे कलावंत व्यक्तिमत्त्व जन्माला येते. परंतु पारतंत्र्याच्या काळात अंगभूत आणि कष्टसाध्य गुणांना स्वातंत्र्यासाठीच कष्टावे लागते. शिवाय देश स्वतंत्र झाला तरी या कष्टाचे चीज होतेच असे नाही. सावरकरांना याच अनुभवाला सामोरे जावे लागले. मात्र अत्यंत धीरोदात्तपणे ते या अनुभवांना सामोरं गेले. त्यांची आज जयंती. त्यानिमित्त घेतलेला हा आढावा…

– ओंकार काळे

वि ज्ञान आणि देशाची सुरक्षा या बाबी परमोच्च महत्त्वाच्या असेपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव घ्यावंच लागतं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आणि कर्तत्त्वात राष्ट्रप्रेम, आधुनिकता, धर्मनिष्ठा अशा वरकरणी विरोधी वाटणार्‍या मुल्यांचा बेजोड संगम झाला होता. या थोर क्रांतिकारकाचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या भगूर गावी इनामदार घराण्यात झाला. घरी समृध्दी होती. ज्येष्ठ बंधू बाबा त्यांच्याप्रमाणेच थोर क्रांतिकारक, देशभक्त म्हणून सर्वांना परिचित आहेत.

विनायकरावांची बुध्दी बालपणापासून तल्लख होती. ते माध्यमिक शिक्षणासाठी नाशिक येथे आले. तिथे गणेशोत्सवातून त्यांच्या देशभक्तीच्या कार्याला प्रारंभ झाला. बालवयातच त्यांचं वक्तृत्व फुललं. त्यातच ते समवयस्कांचे नेते बनले. अंगी असलेल्या देशभक्तीचा विकास नाशिकक्षेत्री हळूहळू होऊ लागला. 1897 मध्ये चाफेकर बंधूंना रँडच्या खून खटल्यात फाशीची शिक्षा झाली. विनायकरावांनी चाफेकरांच्या या बलिदानावर एक ‘फटका’ लिहिला. त्यांच्या काव्यलेखनाला अशी सुरुवात झाली. वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी कुलस्वामिनीसमोर सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने भारताला स्वतंत्र करण्याची प्रतिज्ञा घेतली. आणि तिथूनच त्यांच्या भावी जीवनाची दिशा ठरली.

सावरकरांनी 1896 मध्ये ‘राष्ट्रभक्त’ नावाच्या क्रांतिकारी गुप्त संस्थेची स्थापना केली. त्याच वेळी ते भगूर सोडून नाशिकमध्ये रहायला आले. इथल्या वास्तव्यात त्यांनी ‘मित्रमेळा’ नावाची दुसरी संस्था स्थापन केली, शिवजयंती उत्सव सुरु केला. नाशिकचं समाजजीवन भारुन टाकलं. बालवयातच त्यांचा विवाह यमुनाबाई यांच्याशी झाला. सावरकर उच्च शिक्षणासाठी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाले. त्याच वेळी त्यांचं राष्ट्रकार्य सुरू होतं. 1904 मध्ये त्यांनी नाशिक इथे मोठा मित्रमेळा भरवला. त्यासाठी उभ्या महाराष्ट्रातून शेकडो देशभक्त तरुण आले होते. त्यांनी त्यावेळी या मित्रमेळा संस्थेचे ‘अभिनव भारत’ असे नामाभिधान केले. 1904 हे वर्ष म्हणजे वंगभंग चळवळीचा काळ होता. ही चळवळ देशभर झाली. तिचा एक भाग म्हणून सावरकरांनी पुण्यात विलायती कपड्यांची होळी केली.

1905 मध्ये बी.ए. झाल्यावर बॅरिस्टर होण्यासाठी सावरकर विलायतेला रवाना झाले. लोकमान्य टिळकांनी त्यांना या कामी पाठबळ दिलं, तसंच त्यांच्या सासर्‍यांनी त्यांना आर्थिक मदत केली. इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी जाणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह ‘इंडिया हाऊस’ म्हणून प्रसिध्द आहे. तिथे त्यांनी वास्तव्य केलं. क्रांतिकारी विचारांच्या तरुण विद्यार्थ्यांचे ते नेते बनले आणि त्यांना ‘अभिनव भारत’ संस्थेचे सभासद केले गेले. सावरकरांनी ‘जोसेफ मॅझिनी’ यांचं आत्मवृत्त आणि राजकारण हा क्रांतीची प्रक्रिया सांगणारा ग्रंथ लंडनमध्ये लिहिला. तो खूपच गाजला. त्यांनी त्यावर लिहिलेली प्रस्तावना अधिक गाजली. सरकारने हा ग्रंथ जप्त केला. त्यामुळे त्याचं मोल अधिक वाढलं. या काळात त्यांना सेनापती बापट आणि पंजाबचे लाला हरदयाळ हे सहकारी म्हणून लाभले. हरदयाळ यांनी भारतात येऊन पंजाबमध्ये क्रांतिकारकांची संघटना सुरु केली.

1857 च्या ‘स्वातंत्र्य समरा’ला 1907 मध्ये पन्नास वर्षं पूर्ण झाली. ‘शिपायांची भाऊगर्दी’ या नावाने इंग्रज आणि त्यांच्या भारतीय होयबांनी या युध्दाची अवहेलना केली होती. त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी सावरकरांनी ‘1857 चे स्वातंत्र्यसमर’ या नावाचा ग्रंथ मराठीत लिहिला. त्यांनी लंडनमध्ये स्वातंत्र्यसमराचा स्मृतिमहोत्सव मोठ्या थाटाने साजरा केला. त्यावेळी ‘ओ मार्टिस’ नावाचं पत्रकही छापून प्रसिध्द केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘शिखांचा इतिहास’ हा ग्रंथही लिहिला.

1909 मध्ये सावरकरांच्या ज्येेष्ठ बंधूंना म्हणजे गणेश दामोदर उर्फ बाबारावांना अटक करण्यात आली. ‘राजाविरुध्द बंड करणे’ हा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यांना जन्मठेप आणि काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली गेली. भारतातली क्रांतीची चळवळ दडपून टाकण्यासाठी सरकारने अत्याचाराचं थैमान मांडलं. राष्ट्रद्रोहाचा आरोप ठेवून अनेक तरुणांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.

1909 मध्ये सावरकरांचे सहकारी मदनलाल धिंग्रा यांनी लंडनमध्ये जहांगीर हॉलमध्ये कर्झन वायली यास ठार केलं. त्यांच्यावर न्यायालयात खटला सुरु झाला तेव्हा सावरकरांनी त्यांचं मनोगत तयार करून दिलं. तथापि, धिंग्रांना फाशी झाली. या काळात सावरकरांनी ‘इंडिया हाऊस’ सोडलं आणि बिपिनचंद्र पाल यांच्या घरी राहू लागले. सावरकरांच्या काही मित्रांनी ‘1857 चं स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथाचं इंग्रजीत भाषांतर केलं. 1909 मध्ये महात्मा गांधी आणि वीर सावरकरांची पहिली भेट झाली. या दोन देशभक्तांचे मार्ग भिन्न असूनही महात्मा गांधी यांनी त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. धिंग्रा प्रकरण शांत झाल्यावर वीर सावरकरांनी प्रचारपत्रकं, ग्रंथ, बाँब बनवण्याची पत्रकं, पिस्तुलं भारतात पाठवण्याचा धडाका सुरु केला. यावेळी नाशिक येथे विजयानंद नाट्यगृहात नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा खून झाला. या खटल्यात श्री. कान्हेरे आणि त्यांचे सहकारी कर्वे व देशपांडे यांना फाशीची शिक्षा झाली.

जॅक्सन यांना ठार मारण्यासाठी वापरलेलं पिस्तुल सावरकरांनी भारतात पाठवलं, असा शोध लागताच सावरकर हेच या कटाचे सूत्रधार आहेत, असं समजून सरकारने त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. त्या सुमारास सावरकर पॅरिस इथे वास्तव्य करुन होते. तिथे त्यांनी ‘तळवार’ या नावाचं वृत्तपत्र चालवलं होतं. या पत्रात त्यांनी ‘मर्टार्यर ऑफ नाशिक’ म्हणून कान्हेरे यांचा गौरव केला होता. पुढे इंग्लंडला गेल्यावर त्यांना अटक झाली. प्रारंभी तीन महिने या खटल्याचं काम इंग्लंडमध्ये चाललं. पण पुढे हा खटला भारतामध्ये चालवायचा, असं ब्रिटिश सरकारने ठरवलं. त्यासाठी सावरकरांना ‘मारिया’ बोटीतून गुप्तपणे आणलं जात असता फ्रान्सच्या किनार्यावरील मार्सेलिस बंदरात बोट थांबली असताना त्यांनी शौचकूपामधून समुद्रात उडी घेतली. हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि त्यांना भारतात आणलं गेलं. त्यांच्यावर जॅक्सनच्या खुनाचे सूत्रधार म्हणून आरोप ठेवले गेले तसंच इतर अनेक आरोप ठेवून दोन जन्मठेपेच्या म्हणजे 50 वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.

50 वर्षं काळे पाणी शिक्षा म्हणजे जिवंत राहणं अवघडच होतं. काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी वीर सावरकरांना अंदमान इथल्या सेल्यूलर जेलमध्ये ठेवण्यात आलं. तिथे त्यांना कष्टाची खूप कामं करावी लागली. सावरकरांनी उणीपुरी दहा वर्षं अंदमानच्या जेलमध्ये नरकतुल्य यातना भोगून काढली. याच काळात त्यांना ‘कमला’सारखं नितांतसुंदर काव्य स्फुरलं. ते सुचेल तसं भिंतीवर लिहून ते पाठ करत. या कामी त्यांची तीव्र स्मरणशक्ती कामी आली. भारतातील लोकांनी खूप प्रयत्न केल्यावर सावरकरांची सशर्त सुटका झाली. त्यांना अंदमानातून 1921 मध्ये भारतात आणण्यात आलं. पाच वर्षं राजकीय चळवळीत भाग घ्यायचा नाही, या अटीवर त्यांना 1924 मध्ये रत्नागिरी इथे स्थानबध्द करण्यात आलं.

रत्नागिरी इथे सावरकर साडेतेरा वर्षं होते. राजकीय चळवळीत भाग घ्यायला बंदी असल्याने त्यांनी स्वत:ला सामाजिक कार्यात वाहून घेतलं. रत्नागिरीच्या सार्वजनिक जीवनातून अस्पृश्यता आणि रोटीबंदी या गोष्टींचं उच्चाटन करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. रत्नागिरीत पत्नी यमुनाबाई अर्थात माई त्यांच्यासोबत राहायला आल्या. या काळात त्यांना दोन अपत्यं झाली. मुलाचं नाव विश्वास तर मुलीचं नाव प्रभात असं होतं. 1937 मध्ये सर्व निर्बंध रद्द झाल्यावर त्यांनी हिंदू महासभेत प्रवेश केला. लवकरच ते त्या पक्षाचं नेतृत्व करु लागले. ‘हिंदुत्व हेच भारताचं राष्ट्रीयत्व’ अशी त्यांची मनोधारणा होती. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांचे राजकीय विचार अनेकदा वादग्रस्त ठरले. तरीही त्यांच्या देशप्रेमाला खरोखरच तोड नाही. धर्मप्रेम दाखवत असतानाच सावरकरांनी आधुनिकतेची आणि विज्ञानाची कास सोडली नाही. शस्त्र आणि शास्त्रसंपन्न देश हा त्यांचा आग्रह होता. त्यांनी तो अखेरपर्यंत कायम ठेवला.

Deshdoot
www.deshdoot.com