‘ही’ सवय जिवावर बेतणारी…
Featured

‘ही’ सवय जिवावर बेतणारी…

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

आजकाल केवळ महानगरे आणि शहरांमध्येच नव्हे तर खेडोपाडीही हेडफोन किंवा इअरफोन लावून फोनवर बोलणारी किंवा गाणी ऐकणारी माणसे भेटतात. अशा माणसांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परंतु हे व्यसन लोकांच्या केवळ आरोग्यावरच नव्हे तर जगण्यावरही कसे घातक परिणाम करत आहे, याची कल्पना फारच कमी लोकांना आहे. हे व्यसन टाळण्यातच आपले हित आहे. जिवाची किंमत मोजूनही ते लोकांच्या लक्षात का येत नाही?

प्रा. शुभांगी कुलकर्णी

छोटे शहर असो वा महानगर, बस किंवा रेल्वेने प्रवास करणारा प्रवासी असो वा पायी चालणारा वाटसरू असो, युवक असो वा मध्यमवयीन व्यक्ती, आजकाल बहुसंख्य लोक कानात इअरफोन किंवा हेडफोन लावून स्वतःच्याच धुंदीत असल्याचे दिसून येते. शहरांच्या ज्या उद्यानांमध्ये पाय मोकळे करण्यासाठी, मित्रांसोबत किंवा आप्तांसोबत गप्पा मारण्यासाठी, मनोरंजनासाठी किंवा मनाला उभारी देण्यासाठी लोक जातात तिथेही हेच दृश्य पाहायला मिळेल. याच उद्यानांना पूर्वी मोठ्या शहरांची चावडी म्हणून ओळखले जात असे. गल्ल्या आणि कॉलनीतील लोक या बागांमध्ये गप्पा छाटताना, मस्करी करताना, हास्यविनोद करताना दिसत. सकाळी व संध्याकाळी फिरायला जाणे हे समाजाशी जोडले जाण्याचे एक माध्यम होते. आता या दुनियेवरही हेडफोनने कब्जा केला आहे. लोकांना या हेडफोनने एकलकोंडे आणि आत्मकेंद्री करून टाकले आहे. सन 2013 मध्ये संपूर्ण जगभरात 23 कोटी 60 लाख हेडफोन किंवा इअरफोनची विक्री झाली होती. 2016 मध्ये 33 कोटी 40 लाख इअरफोन विकले गेले.

एका अंदाजानुसार, सध्या जगभरात दरवर्षी सुमारे 40 कोटी हेडफोन किंवा इअरफोन विकले जात आहेत. त्याचप्रमाणे ब्लूटूथ हेडफोननेही संपूर्ण जगभरात धमाल उडवून दिली आहे. या डिव्हाईसचे व्यसन लागण्याचे गंभीर परिणाम जगभरात समोर येत असून त्यामुळे होणार्‍या नुकसानीने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. इअरफोनमुळे दरवर्षी रस्त्यांवर आणि रेल्वेच्या ट्रॅकवर शेकडो लहान-मोठ्या दुर्घटना होत आहेत. इअरफोन अथवा हेडफोनमुळे होणार्‍या दुर्घटनांचा समावेश स्वतंत्र संवर्गात केला गेला नसल्यामुळे केवळ याच माध्यमामुळे होणार्‍या नुकसानीचा अचूक अंदाज लावणे शक्य होत नाही. एरवी
मुंबईच्या उपनगरी सेवेअंतर्गत दरवर्षी होणारे सुमारे दोन हजार मृत्यू आणि त्याहून कितीतरी अधिक संख्येने गंभीर जखमी होणारे लोक यापैकी मोठा वाटा हेडफोन किंवा इअरफोनमुळे होणार्‍या दुर्घटनांचाच असतो.सन 2002 ते 2012 या दहा वर्षांच्या कालावधीत मुंबई उपनगरी रेल्वे वाहतूक
नेटवर्कमध्ये 36152 लोकांचा बळी गेला तर 36688 लोक गंभीररीत्या जखमी वा
कायमस्वरुपी अपंग झाले. दर आठवड्याच्या अखेरीस मुंबईत सरासरी 17 लोकांचा मृत्यू होतो आणि यात 80 टक्के युवकांचा समावेश असतो. मृत्यू पावणारे युवक 15 ते 35 या वयोगटातील असतात, असे निदर्शनास आले आहे. कानात इअरफोन किंवा हेडफोन असल्यामुळे एखाद्या व्यक्तीला येणार्‍या रेल्वेगाडीचा आवाज ऐकू आला नाही आणि रेल्वेखाली सापडून ती व्यक्ती मृत्युमुखी पडली, अशा बातम्या आपल्याला नेहमी ऐकायला मिळतात. वस्तूतः या दुर्घटनेला इअरफोनच जबाबदार आहे.

इअरफोनच्या माध्यमातून संगीत ऐकणे किंवा लोकांशी बातचीत करणे ही अत्यंत व्यक्तिगत बाब आहे. परंतु सार्वजनिकरीत्या वावरतानाही आपण तसे करून स्वतःला आणि इतरांनाही संकटात टाकतो, हे लक्षात घेतले पाहिजे. 26 एप्रिल 2018 रोजी उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे दुदही रेल्वेस्थानकाजवळ मानवविरहित बहपुरवा रेल्वे क्रॉसिंगवर मुलांना घेऊन चाललेली स्कूल व्हॅन वेगात येणार्‍या रेल्वेमुळे दुर्घटनाग्रस्त झाली होती. या अपघातात 13 मुलांचा जागीच मृत्यू झाला होता तर 7 मुले गंभीररीत्या जखमी झाली होती. ज्यावेळी ही दुःखद घटना घडली तेव्हा स्कूल व्हॅनचा चालक कानात हेडफोन लावून गाणी ऐकत होता, असे समोर आले. जर त्याच्या कानात हेडफोन नसता तर त्याला रेल्वेचा आवाज ऐकू आला असता आणि कोवळ्या मुलांना अकाली मृत्यूला सामोरे जावे लागले नसते. इअरफोन हा आपल्या आसपासच्या अन्य ध्वनींपासून आपल्याला तोडणारा डिव्हाईस आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. इअरफोनमुळे मृत्यूच्या पावलांचा आवाजही आपल्याला ऐकू येत नाही. त्यामुळेच कुशीनगरसारखे अपघात घडतात. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात इअरफोनमुळे होणार्‍या अपघातांची स्वतंत्र नोंद ठेवली जाते. अशा देशांमध्ये आता इअरफोन हा अत्यंत धोकादायक डिव्हाईस मानला जाऊ लागला आहे. अमेरिकेतील नोंदींनुसार, 2004-2005 मध्ये इअरफोनमुळे 16 दुर्घटना घडल्या होत्या, तर 2010-2011 मध्ये अशा दुर्घटनांची संख्या वाढून 47 झाली होती. या दुर्घटनेत बळी पडणार्‍यांमध्ये 67 टक्के युवकांचा समावेश होता. हे सर्व युवक 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. अशा दुर्घटनांमध्ये बळी पडणार्‍या लोकांमध्ये 55 टक्के लोकांना इअरफोनमुळे रेल्वेचा आवाज ऐकू आला नव्हता म्हणून अपघात घडला होता. या दुर्घटनांपैकी बहुतांश दुर्घटना शहरी भागात घडल्या होत्या.

संयुक्त राष्ट्रांतर्फे करण्यात आलेल्या एका विस्तृत सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार, स्मार्टफोनच्या माध्यमातून सातत्याने संगीत, गाणी ऐकण्याने तसेच जास्त काळ हेडफोनच्या माध्यमातून
स्मार्टफोनच्या संपर्कात राहण्याने जगभरातील सुमारे एक अब्ज लोक अंशत: बहिरेपणाला बळी पडले आहेत. वस्तूतः आपल्या कानांची ऐकण्याची क्षमता जास्तीत जास्त केवळ 90 डेसिबल एवढी असते. इअरफोनच्या सततच्या वापरामुळे ही क्षमता 40 ते 50 डेसिबल इतकी कमी होऊ शकते. त्यामुळे संबंधित व्यक्तीला दूरचा आवाज ऐकू येत नाही. हेडफोनमुळे उत्पन्न होणारी बहिरेपण ही एकमेव समस्या नाही. इतरही अनेक समस्या सातत्याने हेडफोनचा वापर
केल्यामुळे उद्भवू शकतात. या समस्यांमध्ये सततची डोकेदुखी, थकवा, हाता-पायात होणार्‍या वेदना आदी समस्यांचा समावेश आहे. तासन् तास हेडफोन आणि इअरफोनचा वापर करत राहण्याने मेंदूवरही नकारात्मक परिणाम होतो. इअरफोनमधून निघणार्‍या चुंबकीय लहरी मेंदूच्या पेशींवरच दुष्परिणाम करतात. जास्त वेळ इअरफोनचा वापर केल्यास डोकेदुखी, झोप कमी होणे, कानांमध्ये वेदना, मानेच्या एखाद्या भागात होणार्‍या वेदना असे दुष्परिणाम जाणवू लागतात. हळूहळू या समस्या कायमस्वरुपी बनतात. त्यामुळे आरोग्याविषयी जागरुक असणार्‍यांनी इअरफोन किंवा हेडफोनपासून दूर
राहणेच चांगले.

नाक-कान-घसातज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपल्याला आवश्यक नसलेले आवाज पडद्यावर आदळल्यानंतर तेथून परत पाठवण्यास आपला कान सक्षम असतो. परंतु जेव्हा आपण इअरफोन लावलेला असतो तेव्हा मल्टिपल फ्रिक्वेन्सीचा आवाज कानाच्या पडद्यावर आदळत राहतो. तेथे आदळून हा ध्वनी परत येऊ शकत नाही. त्यामुळे अशा तर्‍हेने इअरफोनमुळे कानात शिरणारे सर्व आवाज कानातच फिरत राहतात. हे आवाज कानाच्या रक्तवाहिन्यांना क्षीण करतात. जास्त वेळ इअरफोनचा वापर केल्यास ‘नर्व्ह फटिक’चा धोका वाढतो. इअरफोन, हेडफोनचा अत्यधिक वापर करणार्‍यांनी वेळीच सतर्क होणे कधीही चांगले. अन्यथा ही वाढती सवय आपल्याला समस्यांच्या चक्रव्यूहात अशा प्रकारे गुरफटून टाकेल, जिथून परतीचा रस्ता असणार नाही.

Deshdoot
www.deshdoot.com