येथे कर माझे जुळती

येथे कर माझे जुळती

आपले सगळे पर्याय जेव्हा थिटे पडतात, तेव्हा आपण परमेश्वराची वाट धरतो. परंतु, आपण या ऐहिक जीवनात मानवी देहातील परमेश्वराला केव्हा पुजणार आहोत, केव्हा त्यांचा सन्मान करणार आणि आपण केव्हा त्यांच्यापुढे नतमस्तक होणार आहोत ?

प्रा.डॉ. रावसाहेब नेरकर,

मो. 9421611771,राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळा

जीवन क्षणभंगुर आहे, क्षणात होत्यांच नव्हतं होते.’ ही वाक्य समाजव्यवस्थेत आणि एकूणच या मानवी जीवनाच्या शाळेत शिकायलाच नव्हे तर अनुभवायला येते तेव्हा खरोखरच साक्षात्कार झाल्यासारखे वाटते. परमेश्वराच्या दरबारात गेल्यानंतर आपल्या मनातील अहंम निखळून पडतो. मंदिर असो मशिद असो की, चर्च; हा मानवी देह नतमस्तक होतोच. दगडाच्या मूर्तीत परमेश्वर आहे की नाही, हे माझ्यासह भूतलावरील कोणत्याही मानव प्राण्याला माहिती नाही.

परंतु, ही चराचर सृष्टी चालवणारी एक अगाध शक्ती अस्तित्वात आहे, अशी आपली श्रद्धा आहे. आपले सगळे पर्याय जेव्हा थिटे पडतात, तेव्हा आपण परमेश्वराची वाट धरतो. परंतु, आपण या ऐहिक जीवनात मानवी देहातील परमेश्वराला केव्हा पुजणार आहोत, केव्हा त्यांचा सन्मान करणार आणि आपण केव्हा त्यांच्यापुढे नतमस्तक होणार आहोत ?

आज अखिल जगतात कोविड-19 (कोरोना व्हायरस) ने थैमान घातले आहे. हजारो निरपराध लोक दररोज या आजाराने बळी जात आहेत. या जीवघेण्या आजाराने सारे विश्व पादाक्रांत केलंय ! सारा मानवी समाज हवालदिल झाला आहे. जागतिक महासत्तेत अग्रस्थानी असलेल्या राष्ट्रापासून छोट्या-मोठ्या राष्ट्रापर्यंत नव्हे गाव व रस्त्यापर्यंत या कोविड-19 ने मानवी जीवनात हाहाकार माजवला आहे. अशा खडतर स्थितीत मानवी देहरूपी परमेश्वराचे अवतार पुढे येत आहेत. या परमेश्वराचा शोध घेण्यासाठी कोणत्याही अगाध दृष्टीची तपश्चर्येची गरज नाही. केवळ एक जबाबदार आणि खर्‍या अर्थाने सुज्ञ मानवप्राण्यांची गरज आहे.

‘रूग्णसेवा हिच ईश्वर सेवा हे ब्रिद उराशी बाळगून वैद्यकीय सेवेत काम करणारे डॉक्टर्स, शास्त्रज्ञ, परिचारिका सहाय्यक आव्हानात्मक समस्यांचे निराकरण करणे’ हे आपले कर्तव्य मानून दिवसरात्र सेवा देत आहेत. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हा विचार मनात रूजवून वाईट वृत्तीचा, विचारांचा आणि कृतीचा विनाश करण्यासाठी पोलीस कर्मचारी प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत.

आपल्या देशाला त्यातल्या त्यात महाराष्ट्राला संतांची महान परंपरा लाभलेली आहे. संत शिरोमणी गाडगे महाराजांनी अखिल मानव जातीला स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. हा मूलमंत्र घेऊनच स्वतःच्या आरोग्याची, जीवाची तमा न बाळगता दिवस-रात्र स्वच्छतेचे महान कार्य सफाई कामगार करीत आहेत. ‘मानवसेवा हाच खरा धर्म’ हा आदर्श समोर ठेऊन हे देवदूत काम करीत आहेत. जातपात, धर्म-पंथाच्या शृंखला त्याच्यापुढे निखळून पडल्या आहेत. अशा खडतर प्रसंगी आपले राष्ट्र-राज्य कुटुंब मानून कुटुंबप्रमुख या नात्याने आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि एकूणच सारे प्रशासन योग्य ती भूमिका यशस्वीरीत्या पार पाडीत आहेत.

महाभारतातील काळात जसे उद्धवाने म्हणजे भगवान श्रीकृष्णाने वाईट वृत्तीचा विनाश करण्यासाठी विविध अस्त्रांचा आणि शस्त्रांचा वापर केला. विविध संकटांवर विजय मिळवून यश खेचून आणले. त्याप्रमाणे मा. उद्धव ठाकरेंचे सरकार या महाभयंकर संकटावर प्रयत्नांची शिकस्त करून विजय मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आपसूक शब्द ओठावर येतात, ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ कौरवांच्या प्रचंड शक्तीला रोखण्यासाठी उद्धवाला विविध अस्त्रांचा आधार घ्यावा लागला. संचारबंदीच्या काळात कायद्याचे उल्लंघन करून विनाकारण फिरणार्‍या, हिरोगिरी करणार्‍या या कलियुगातील कौरवांवर कोणत्या अस्त्राचा वापर करावा, हा उद्धवाला पडलेला मोठा यक्ष प्रश्न आहे. या प्रसंगातून जाणवतो तो सुशिक्षित आणि सुजाण नागरिकांतला फरक ! स्वतःला उच्चभ्रू आणि सुशिक्षित समजणारा वर्ग ग्रामीण भागातील लोकांचा उल्लेख सोडून, मागासलेल्या विचारांचा म्हणून करतो. आजच्या स्थितीत उघड्या डोळ्यांनी पाहिले तर दिसते आमचा ग्रामीण भागातील खर्‍या अर्थाने सुज्ञ नागरिक. कुठल्याही शाळेत न गेलेला परंतु, जीवनाचे खरे तत्त्वज्ञान समजणारा गावातील सीमा बंद करतो आहे.

माझ्या कोणत्याही निरपराध नागरिकाला त्रास होऊ नये, त्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून आपल्याच गावातील बाहेर गेलेले, आप्तस्वरीप नातेवाईक यांच्या भावनिक विश्वात न रमता स्वतंत्र व्यवस्था करताना दिसतात. परंतु, आम्ही सुशिक्षित म्हणविणारे मात्र स्वतःचा जीव तर धोक्यात घालतोच त्या सोबत परिवाराला, समाजाला संकटाकडे खेचून नेत आहोत. याबाबतीत खर्‍या अर्थाने आत्मपरिक्षणाची गरज आहे. प्रशासनासमोर केवळ आजाराचीच समस्या नाही तर संचारबंदीमुळे रोजंदारीवरील काम करणारा हवालदिल झालेला मजूर वर्ग, विस्थापित, परराज्यातील, गावाकडील चाकरमाने यांच्या निवार्‍याची, भोजनाची व्यवस्था करणे ही मोठी जबाबदारी शासन यशस्वीरीत्या पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत आपण प्रशासनाच्या कामात अधिक बोजा तर टाकत नाही ना, याचाही विचार करणे गरजेचे आहे. आपल्याकडे आरोग्याची तपासणी करायला येणार्‍यावर आपण चालून जातो.

आपल्या आरोग्यासाठी उन्हातान्हाची तमा न बाळगता आपल्या बायका-मुलांना काळजीत टाकून रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र उभ्या राहणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांवर आपण चालून जातो. आपल्या जीवासाठी प्रयत्नांची शिकस्त करणार्‍या देवदूतांचे काम करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना मारहाण करतो, उर्मट वागतो… या बाबी आपल्या सांस्कृतिक मूल्यात कुठे बसतात, मानव जातीला काळिमा फासणार्‍या आणि शरमेने मान खाली घालायला लावणार्‍या आहेत. अशा या आत्मभान विसरलेल्या वर्गाची ही कृत्य लांच्छनास्पद आहेत. त्यांचा जाहीर निषेध केला पाहिजे. आपल्यासाठी जीवाची बाजी लावणार्‍या आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार, प्रसार माध्यमे, संपादक, पत्रकार, निवेदक यांचे कार्य अनमोल आहे. अखिल मानव जातीसाठी कार्य करणार्‍या या लोकांसाठी त्यांना साथ देऊ या !

आपल्या मानव जातीच्या कल्याणासाठी झटणार्‍या लोकांसाठी एकच म्हणावेसे वाटते, येथे कर माझे जुळती !’

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com