स्वागतार्ह पुढाकार
Featured

स्वागतार्ह पुढाकार

Sarvmat Digital

करोना संकटाशी लढण्यासाठी आर्थिक पाठबळ आवश्यक आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या पीएम केअर फंडिंगला, सहस्र हातांनी दान दिले जात आहे. टाटा, बजाज, महिंद्रा, मित्तल, प्रेमजी अंबानी आदी कॉर्पोरेट घराण्यांनी देणगीव्यतिरिक्त आणखीही अनेक कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे.

केवळ कॉर्पोरेट घराणीच नव्हे तर चित्रपटसृष्टीतील नामवंतांनी, वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यावसायिकांनी, खेळाडूंनी आणि अन्य ‘आयकॉन’ मंडळींनी क्षमतेनुसार, अनेकांनी तर क्षमतेपेक्षाही अधिक देणग्या देऊ केल्या आहेत. भारतीयांचा उत्साह वाढविणारी ही मानसिकता आहे.

संपन्न आणि नामवंत मंडळींव्यतिरिक्त सर्वसामान्य नागरिकही मोठ्या संख्येने मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. कुणी आपली संपूर्ण वर्षाची पेन्शन देऊ केली आहे, तर कुणी तीर्थयात्रेसाठी जमविलेली रक्कम दिली आहे. वस्तुतः दान ही गोष्ट आपल्या संस्कारांमध्येच आहे. दानाची परंपरा जपल्याची आपल्या इतिहासात जितकी उदाहरणे सापडतात, तितकी अन्य देशांच्या इतिहासात क्वचितच सापडतील. या संकटाच्या घडीला संपूर्ण देश सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, हेही यातून स्पष्ट होत आहे.

भविष्यातही संकटाच्या प्रत्येक घडीला आपला देश सरकारला एकटे सोडणार नाही, असा विश्वास यातून निर्माण झाला आहे. ज्या-ज्यावेळी देशावर संकटे आली, त्या-त्यावेळी देशवासीयांनी हीच मानसिकता दाखवून दिली आहे. १९६५ च्या युद्धाच्या वेळी या देशातील आयाबहिणींनी आपले दागिनेसुद्धा दान केले होते. ही मानसिकता आजही कायम आहे. या लढाईसाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असून, आर्थिक अडचणींच्या काळातच हा भस्मासुर समोर उभा ठाकल्यामुळे आता लोकांच्या मनात मोठे स्थान मिळविणाऱ्या सेलिब्रिटींकडून मदत मिळणे अपेक्षित आहे.

औद्योगिक घराण्यांपैकी महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी महिंद्रा रिसॉर्टच्या इमारती रुग्णांसाठी देऊ केल्या आणि आपला संपूर्ण पगार देण्याचे मान्य केले. वेदांता समूहाचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी शंभर कोटी देण्याचे मान्य केले. टाटा उद्योगसमूहानेही मोठी रक्कम दिली आहे. याखेरीज मुकेश अंबानी, मित्तल, अजीज प्रेमजी आदींनीही मोठ्या प्रमाणावर आर्थिक व अन्य स्वरुपाची मदत देऊ केली आहे. ज्यांनी भक्कम कमाई केली आहे, अशा अन्य लोकांकडून सहकार्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरत नाही. त्यामुळे मदतीचा हा ओघ वाढत राहणे गरजेचे आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com