१३ कोटी नोकऱ्यांवर संकट

jalgaon-digital
2 Min Read

कोरोना व्हायरसमुळे देशावरच नाही तर जगावरच आर्थिक अरिष्ट कोसळले आहे. मोठ्या महानगरातील लहानमोठे व्यवसाय बंद पडल्याने लाखो मजूर गावाकडे निघाले आहेत. सध्या लॉकडाऊन असल्याने रोजंदारीवर काम करणारे मजूर, कामगार, नोकरदारांना दोन वेळेचे अन्नही मुश्किल झाले आहे. म्हणूनच ज्यांना नियमित रोजगार नाही, त्यांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन जाहीर होताच कोणत्याही पद्धतीचा करार नसलेल्या नोकऱ्या नागरिकांनी गमावल्या आहेत.

नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार देशभरात १३.६ कोटी नागरिकांच्या नोकऱ्या अडचणीत आल्या आहेत. यात बिगर कृषी क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या ही ५० टक्के आहे. एका आकडेवारीनुसार २.८ कोटी नागरिक हे उत्पादन क्षेत्रात कोणत्याही कराराविना काम करत होते. या नोकऱ्या त्यांना कोणत्याही क्षणी सोडाव्या लागतील, अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत अनेकांनी अशा प्रकारच्या नोकऱ्या गमावल्या देखील आहेत. याप्रमाणे ४.८ कोटी कामगार हे बिगर उत्पादन क्षेत्रात आणि ५.८ कोटी नागरिक हे सेवा क्षेत्रात असून त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे लेखी करार नाहीत. जर एखाद्या कंपनीच्या उत्पन्नावर परिणाम होत असेल तर संबंधित कंपन्या या कंत्राटी तत्त्वावर नसलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून हटवतात. एवढेच नाही तर परिस्थिती गंभीर बनल्यास करारनामा मोडून कंपन्या कर्मचाऱ्यांना राजीनामे देण्यास सांगू शकतात, अशी स्थिती आहे.

कोरोना व्हायरसमुळे चीन, युरोपिय देश, अमेरिकासारखे सक्षम देश संकटात आले आहेत. भारतातही कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून लॉकडाऊनच्या माध्यमातून त्याला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका अंदाजानुसार येत्या तीन चार महिन्यात स्थितीत सुधारणा झाली तरी ऑक्टोबरपर्यंत दोन कोटी नागरिकांना रोजगार सोडावा लागेल. बेरोजगारीचा सर्वात जास्त फटका हा पर्यटन आणि हॉटेल क्षेत्रावर झाला आहे. या क्षेत्रात किमान पाच कोटी नागरिक काम करत आहेत. टूर ऑपरेटर आणि त्याशी निगडीत कर्मचारी, हॉटेल कर्मचारी तसेच हॉटेलशी निगडीत दूध, फळे भाजीपाला यासह अन्य पदार्थाचा पुरवठा करणारी मंडळी अडचणीत सापडले आहेत. कोरोनामुळे हॉटेल आणि पर्यटन व्यवसायाला निर्बंध घातले आहेत. असे असले तरी काही काही कंपन्या नुकसान सहन करत कर्मचाऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यास सक्षम असल्याचेही काही तज्ञ सांगत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *