Friday, April 26, 2024
Homeशैक्षणिकरबर उद्योगात करिअर करायचंय ?

रबर उद्योगात करिअर करायचंय ?

दैनंदिन जीवनात रबराचा वापर दिवसेंदिवस वाढतच आहे. घरगुती उपकरणांपासून मोठमोठ्या यंत्रांपर्यंत रबर उपयोगाचे ठरू लागले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणी देखील तुलनेने खूप वाढली आहे. बी.टेक., एम.टेक. पीएचडी यासारखे अभ्यासक्रम पूर्ण करून या क्षेत्रात उत्तम संधी आणि उत्तम वेतन मिळवता येऊ शकते.

आपल्या दैनंदिन उपयोगात येणाऱ्या जवळपास सर्वच उपकरणांमध्ये रबराचा वापर होऊ लागला आहे. अलिकडच्या काळात तर रबराची उपयोगिता खूप वाढली आहे. त्यामुळे रबर इंडस्ट्रिमध्ये रोजगाराच्या संधी देखील वेगाने वाढल्या आहेत. या क्षेत्राचा वाढता विस्तार बघता यातील तज्ज्ञ व्यक्तींची मागणी देखील पहिल्यापेक्षा अधिक वाढली आहे. रबर म्हटले म्हणजे सर्वप्रथम टायर-ट्युबचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. मात्र आता प्रत्येक वस्तू म्हणजे फ्रिज, टेलिव्हीजन आणि इतर यंत्र या सर्वांमध्येच रबराचा उपयोग होत असल्याचे दिसते. म्हणूनच या क्षेत्राशी निगडीत व्यावसायिकांची मागणी देखील वाढली आहे.

- Advertisement -

योग्यता : रबर इंडस्ट्रीमध्ये वेगाने मागणी वाढत असल्याने यासंबंधित अभ्यासक्रम निरनिराळ्या संस्थांमध्ये राबविले जाऊ लागले आहेत. यामध्ये प्रामुख्याने रबर टेक्नॉलॉजीमध्ये बी.टेक. आणि एम.टेक. हे अभ्यासक्रम सामील आहेत. यामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांमध्ये प्रवेश परीक्षेचे आयोजन केले जाते आणि ती परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. ज्या विद्यार्थ्यांनी बारावी किंवा तत्सम विज्ञान आणि गणित विषयातील परीक्षा उत्तीर्ण केली आहे तेच विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. बी.टेक या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर नैसर्गिक आणि कृत्रिम रबराची निर्मिती, उत्पादन आणि त्याच्या देखभालीबाबत विस्तृत रूपात अभ्यास करणे गरजेचे असते. त्याचबरोबर कृत्रिम रबराच्या चांगल्या गुणवत्तेचे उत्पादन होणे गरजेचे असते. पदव्युत्तर पदवीनंतर पी.एचडीचा पर्याय देखील या क्षेत्रात उपलब्ध आहे.

नोकरीच्या संधी : या क्षेत्रात सर्वात जास्त संधी टायर इंडस्ट्रीमध्ये मिळते. होम अप्लायन्सेस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये देखील रोजगाराचा शोध घेता येऊ शकतो.
या व्यतिरिक्त अन्य उपयोगी वस्तूंमध्ये वापरण्यात येणाऱ्या रबराचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये देखील रोजगाराचे चांगले पर्याय उपलब्ध होऊ शकतात. अलिकडे जवळपास सर्वच उपयुक्त वस्तूंमध्ये रबराचा वापर आणि उपयोग वाढत आहे. परदेशात देखील या क्षेत्रात खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

व्यक्तिगत गुणवत्ता : या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांकडे शैक्षणिक गुणवत्तेसोबतच इतर व्यक्तिगत गुणवत्ताही असणे गरजेची असते. त्यामध्ये प्रामुख्याने संवाद कौशल्य उत्तम असावे. तसेच सांघीक कौशल्य उत्तम असणे गरजेचे असते. अशा व्यक्तींकडे रबराची गुणवत्ता काय आहे याचे सखोल ज्ञान असणे आवश्यक असते. रबराची निर्मिती आणि उपयोगाच्या तांत्रिक बाबी माहित असणे अत्यंत गरजेचे असते. कारण हा उद्योग जोखीमेचा असतो. त्यामुळे धैर्य असणे अत्यंत गरजेचे असते. या विषयातील बी.टेक.ची पदवी घेतल्यानंतर सुरुवातीलला १५ ते २० हजार रुपये महिना एवढे वेतन मिळू शकते. एम. टेक केल्यानंतर त्यामध्ये अधिक वाढ होते. रबराची देखभाल आणि निर्माण प्रक्रियेशी निगडीत इतर गोष्टी सखोल माहित असेल तर काळानुसार वेतनात वाढ होत जाते. पी.एचडीनंतर एखाद्या रिसर्च सेंटरमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. या ठिकाणी एक लाख रुपयांपर्यंतही वेतन मिळू शकते. तसेच विद्यापिठ अथवा अन्य शिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून देखील काम करता येऊ शकेल. काही लोक स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतात. थोडक्यात या क्षेत्रात पदवी घेतल्यानंतर गुणवत्ते नुसार रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध आहेत.

या विषयाशी संबंधित अभ्यासक्रम राबवणाऱ्या प्रमुख संस्था : ज्या संस्थांमध्ये अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम राबविला जातो तसेच रबर टेक्नॉलॉजीमध्ये बी.टेक आणि एम.टेकचे अभ्यासक्रम राबविले जातात अशा संस्थांपैकी प्रमुख संस्था म्हणजे, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, खडकपूर पश्चिम बंगाल; गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद; अन्ना विद्यापीठ चेन्नई या होय.

- Advertisment -

ताज्या बातम्या