Friday, April 26, 2024
HomeUncategorizedउलाढाल 182 कोटी…!

उलाढाल 182 कोटी…!

चांगला सहकारी मिळाला आणि निष्ठेनं जर एखादे काम सुरु केले तर कमी गुंतवणुकीतूनही चांगले यश मिळवता येते.

माझा जन्म केरळमधील वायनाड जिल्ह्यातील एका दुर्गम गावामध्ये झाला. या गावात ना रस्ता होता ना वीज. आई-वडील मजुरी करायचे. त्यामुळे आई-वडिलांकडून पॉकेटमनी घेतला जातो ही कल्पनाही माझ्या गावी नव्हती. तशात अभ्यासातही मी बेतााचाच होतो. पण माझं गणित उत्तम होतं. हिंदी आणि इंग्रजीमध्ये नापास झाल्यामुळे सहाव्या इयत्तेत मी अनुत्तीर्ण झालो आणि वडिलांनी मला शिक्षण सोडून मजुरी करण्यास सांगितले. परंतु त्यावेळी माझ्या गणिताच्या शिक्षकांनी वडिलांना समजावून सांगितले आणि तेव्हापासून ते वैयक्तिक पातळीवर माझ्या अभ्यासाकडे आणि प्रगतीकडे लक्ष देऊ लागले. शाळा सुटल्यानंतरही ते मला जवळ बसवून अभ्यासक्रम शिकवत असत. याचा परिणाम असा झाला की सातवी इयत्तेत मी पहिला आलो. पुढे महाविद्यालयीन जीवनात माझ्या वडिलांच्या एका मित्राने मला मदत केली.

- Advertisement -

इंजिनिअरींगच्या प्रवेश परीक्षांमध्ये माझा 63 वा नंबर आला. मी कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरींग पूर्ण केले. शिक्षणानंतर मी एका स्थानिक स्टार्टअप कंपनीमध्ये कामाला जाऊ लागलो. पगार 6000 रुपये महिना. पुढे मी मोटोरोला, सिटी बँक, दुबईमध्ये काम करु लागलो. माझा पगार 1 लाखांवर गेला. माझ्या वडिलांना एकदा मी माझा महिन्याचा पूर्ण पगार म्हणजे 1.3 लाख रुपये त्यांचे कर्ज फेडण्यासाठी पाठवले तेव्हा त्यांना अपार आनंद झाला. रात्री उशिरापर्यंत ते आनंदाने रडत राहिले.

आर्थिक गाडी सुव्यवस्थित झाल्यानंतर मी माझ्या आई- वडिलांसाठी घर बांधले आणि तीनही बहिणींची लग्नंही लावून दिली. सात वर्षांनी मी बंगळुरुला परतलो. त्यावेळी माझ्याकडे 15 लाख रुपये बचतीचे होते. मग मी एमबीए करण्याचा निर्णय घेतला. एमबीएचे प्रशिक्षण घेत असताना मी नियमितरित्या माझ्या मामेभावाच्या किराणा मालाच्या दुकानामध्ये बसायचो. त्यानेच मला इडली-डोशाचे पीठ प्लास्टिक पिशव्यांमधून विकले जाते हे सांगितले आणि त्याचा व्यवसाय करायचा असल्याची इच्छाही बोलून दाखवली.

मला ती आयडिया आवडली. मग आम्ही डिसेंबर 2005 मध्ये 25 हजार रुपयांची गुंतवणूक करुन आयडी फ्रेश फूड कंपनी स्थापन केली आणि इडली-डोशाचे तयार पीठ विकण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यावेळी आमच्याकडे दोन ग्राइंडर आणि एक मिक्सर आणि काही प्लास्टिकचे पॅकेटस् होते. नोकरदार महिलांना रोजच्या जेवणाला एक चांगला पर्याय मिळाल्यामुळे अनेक लोकांनी या पीठांना पसंती दर्शवली. पहिल्या दिवसापासून आम्हाला फायदा होऊ लागला. त्यानंतर मी गुंतवणूक वाढवली. आज दररोज आमच्या कंपनीतर्फे 50 हजार किलो इडली- डोशाचे तयार पीठ विकले जाते. भारतातील अनेक मोठ्या शहरात आणि परदेशांतही आमचा व्यवसाय विस्तारलेला आहे. आमची वार्षिक उलाढाल 182 कोटींची आहे.

– पी. सी. मुस्तफा

- Advertisment -

ताज्या बातम्या