संत्र्याचे आरोग्यदायी फायदे
Featured

संत्र्याचे आरोग्यदायी फायदे

Sarvmat Digital

पिवळ्या – केशरी रंगाच्या संत्री दिसायला मनमोहक आणि चवीला आंबट-गोड असल्यामुळे सगळ्यांच्याच आवडीचे असे हे फळ आहे. तसेच आरोग्यासाठीही तितकेच लाभदायक आहे. संत्र्याची पाने, फुले, साली या सगळ्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्याचे दिसून येते. त्यासाठीच संत्र्याचे काही महत्त्वपूर्ण आरोग्यलाभ जाणून घेऊ…

संत्र्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह तसेच ‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्वे हे घटक असल्यामुळे निरोगी राहण्यासाठी आणि शरीराच्या वाढीसाठी संत्रे हे बहुमोल मानले जाते. संत्र्यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. तसेच ‘क’ जीवनसत्त्वाच्या भरपूर प्रमाणामुळे अन्नातील कॅल्शिअमचा वापर शरीरातील पेशींना विनाअडथळा करता येतो. याशिवाय संत्र्यामध्ये प्रथिने, तंतुमय आणि पिष्टमय पदार्थही असतात. त्याचाही आरोग्यास चांगला फायदा होतो.

1)  संत्र्याच्या आंबट- गोड चवीमुळे शरीराची पचनशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच भूक मंदावणे, अन्नपचन व्यवस्थित न होणे, गॅसची समस्या अशा वेळी संत्र्याचा रस घ्यावा. त्यामुळे अन्न चांगले पचन होते.
2)  गर्भवती स्त्रियांनी उलट्या आणि मळमळ कमी करण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही वेळी एक एक कप संत्र्याचा रस घ्यावा.
3)  मलावरोधाचा त्रास होत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी आणि पहाटे सकाळी उठल्यानंतर संत्रे आतील सालीसकट खावे. यामुळे आतड्याची हालचाल वाढते संत्र्यातील चोथ्यामुळे शौचास साफ होते.
4)  दातांचे आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी संत्रे नियमितपणे खावे. संत्र्यामध्ये असणार्‍या ‘क’ जीवनसत्त्वामुळे हिरड्यांमधून रक्त येण्याचे थांबते व दात हिरड्यांमध्ये पक्के बसण्यास मदत होते.
5)  अशक्त तसेच आजारी व्यक्तींसाठी संत्र्याचा रस अमृताप्रमाणे काम करतो.
6)  संत्र्याच्या सेवनामुळे काळवंडलेली आणि रूक्ष त्वचा मुलायम होण्यास मदत होते. तसेच आतड्यातील कृमी नष्ट होतात.
7)  संत्र्यामुळे उच्च रक्तदाब कमी होतो. तसेच शरीरातील उष्णता कमी होण्यासही संत्र्याच्या रसाचा फायदा होतो.
8)  संत्र्याची साल वाळवून ती बारीक करून त्याचा वापर केस धुण्यासाठी शिकेकाईमध्ये करावा. त्यामुळे केस मऊ आणि दाट होण्यास मदत होते. संत्र्याच्या सालीमधून निघणारे तेल उत्तम कृमीनाशक आणि पाचक असते.
9)  संत्र्याचा रस आणि एक चमचा मध नियमितपणे घेतल्यास ह्दयविकार होत नाही.
10)  संत्र्याच्या सालीचे सुक्ष्म चूर्ण चेहर्‍याला लावल्यास चेहर्‍यावरील डाग कमी होऊन पिंपल्स येत नाहीत.
11)  लहान मुलांची चांगली वाढ होण्यासाठी दिवसातून दोन वेळा एक एक कप संत्र्याचा रस द्यावा. तसेच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.
12)  लहान मुलांना दात येण्याच्या काळात नियमितपणे संत्र्याचा रस दिल्यास दात मजबूत आणि सरळ उगवतात. कारण वेडेवाकडे आणि ठिसूळ दात हे कॅल्सिअमच्या आणि ‘क’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळेच येतात. हे दोन्ही घटक संत्र्यामध्ये भरपूर असल्यामुळे दातांसाठी त्याचा चांगला फायदा होतो.
13)  तापामध्ये अनेकदा भूक मंदावते आणि जीभेवर पांढरा थर जमा होतो. अशा वेळी संत्रे आतील सालीसह चावून खावे. त्यामुळे तोंडही साफ होते आणि मंदावलेली भूक पूर्ववत होते.

Deshdoot
www.deshdoot.com