तुरीच्या डाळीचे आरोग्यलाभ !

jalgaon-digital
2 Min Read

तुरीच्या डाळीमध्ये फोलेट असते त्यामुळे अ‍ॅनिमिया किंवा रक्तपांढरी असणार्‍या व्यक्तीला फायदा होतो. अ‍ॅनिमिया दूर करण्यासाठी रोज 100 ग्रॅम तुरीची डाळ सेवन केल्यास त्यातून 100 टक्के फोलेट मिळते. गर्भवती महिलांनी तुरीच्या डाळीचे सेवन अवश्य केले पाहिजे. प्रसुती संदर्भातील विकार दूर करण्यास तुरीची डाळ मदत करते. गर्भावस्थेत तुरीच्या डाळीचे सेवन केल्याने 76 टक्के फोलेटची पूर्तता होते.

पचनात सुधारणा : पचन संस्था चांगली असल्यास आरोग्याच्या अनेक समस्यांचा धोका कमी होऊ शकतो. त्यासाठी आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे. पचनासाठी सुलभ असणारे तंतुमय पदार्थ आहारात अधिक प्रमाणात असतील तर पोटात वायू होणे, पोटदुखी, बद्धकोष्ठता आदी समस्या दूर करता येतात. डाएटरी फायबर म्हणजे पचनयोग्य तंतुमय पदार्थांसाठी तुरीची डाळ एकदम चांगली असते.

स्थूलतेवर नियंत्रण : तुरीची डाळ सेवन करणे वजन नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे. तुरीच्या डाळीत पोषक घटकांचे प्रमाण अधिक असतेच शिवाय उष्मांकांचे प्रमाणही कमी असत. त्याव्यतिरिक्त कोलेस्ट्रॉल, सोडियम आणि सॅच्युरेटेड फॅट चे प्रमाण देखील कमी असते. या डाळीचे सेवन केल्याने उर्जा मिळते आणि व्यक्ती दिवसभर उत्साही राहातो.

अँटीइन्फ्लमेटरी गुणधर्म : जळजळ होण्याच्या काही समस्या असतील तर या डाळीच्या सेवनाने अँटी इन्फ्लमेटरी समस्या कमी होतात. तुरीच्या डाळीमध्ये ऑर्गेनिक कपाऊंड असतात, त्यामुळेच डाळीचे सेवन केल्यास शरीराच्या सूज यणे आणि जळजळ होणे हे त्रास कमी होतात. एवढेच नव्हे तर पाईल्सची समस्या असल्यास त्यावरही तुरीच्या डाळीचे सेवन करणे हा लोकप्रिय पारंपरिक औषध म्हणून मानले जाते.

हृदयाचे आरोग्य : हृदयाच्या आरोग्यासाठी तुरीच्या डाळीचे सेवन करणे नक्कीच फायदेशीर असते. त्यात पोटॅशिअम असते त्यामुळे रक्तदाब नियमित राहाण्यास मदत होते. पोटॅशिअम रक्तवाहिन्या चांगल्या ठेवण्याबरोबरच पेशींचा शरीरभर पसरण्यासही मदत होते. शरीराचा रक्तदाब योग्य राहातो आणि हृदयविकाराशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.

इम्युनिटी बुस्टर : तुरीच्या डाळीमुळे सी जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढते. कच्चे तुरीचे दाणे चावून खाल्ल्यास सी जीवनसत्त्वाची पूर्तता केली जाते. तुरीची डाळ शिजवल्यानंतर त्यात सी जीवनसत्त्व केवळ 25 टक्केच राहाते. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढवायची असेल तर तुरीची कच्ची डाळ खाणे अधिक उत्तम. त्याचबरोबर सी जीवनसत्त्व अँटीऑक्सिडंट म्हणूनही काम करते.आपल्या बहुतेकांच्या आहारात तुरीच्या डाळीचा समावेश असतो. कदाचित रोजच खातो म्हणून तिच्या इतक्या सर्व फायद्यांविषयी माहिती करून घेतली नसावी. त्यामुळे भारतीय आहारातील वरण, आमटी चे महत्त्व आपल्याला अधिक पटेल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *