Thursday, April 25, 2024
Homeनगरअण्णांच्या मौनव्रताचा सहावा दिवस : जिजाऊ ब्रिगेडचा पाठिंबा

अण्णांच्या मौनव्रताचा सहावा दिवस : जिजाऊ ब्रिगेडचा पाठिंबा

पारनेर (तालुका प्रतिनिधी)- महिलांना कार्य करताना अडचणी येतील, काही लोक टीका, निंदा करतील, अपमान केला तर पचवायला शिका, नैराश्य कधी येऊ देऊ नका, नैराश्य येणे रोग आहे, सावित्रीबाई फुले यांच्यासारखी क्रांती जरी करता आली नाही तरी त्यांनी दिलेल्या विचारांच्या वाटेवरून गेलो तरी समाजासाठी मोठे काम होईल, त्यातच आपल्या देशाचे हित आहे, असा संदेश ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी दिला. हजारे यांच्या मौनव्रत आंदोलनाच्या सहाव्या दिवशी जिजाऊ बिगेडच्या महिलांनी हजारे यांची भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा दिला. त्यावेळी हजारे यांनी त्यांच्याशी लिखीत संदेशाद्वारे संवाद साधला.

हजारे यांनी दिल्लीच्या निर्भयास न्याय मिळेपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार केला असून जिजाऊ ब्रिगेडच्या महिलाही निर्भयास न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

- Advertisement -

चूल, मूल समाजासाठी महत्त्वाचे आहे. मला एक शिवबा, भगतसिंग घडवायचा आहे असा विचार करून यश, अपयशाची चिंता न करता निष्काम भावनेने काम करा. वयाच्या 62 व्या वर्षापर्यंत मी अपमान सहन केला, तेव्हा कुठे मला समाजासाठी काहीतरी करता आल्याचे हजारे यांनी आपल्या संदेशात नमूद केले.

महिलांवर होत असलेले अत्याचार पाहून महिलांच्या सुरक्षिततेविषयी काळजी वाटते. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना मानाचे स्थान दिले. चूल व मूल या चक्रातून बाहेर काढले. अत्याचार सहन करण्यासाठी सावित्रीने स्त्रिला समाजात स्थान दिले का, असा प्रश्न निर्माण होतो. छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊंच्या या महाराष्ट्रात अशा घटना घडायलाच नको यासाठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रणालीतही बदल करणे गरजेचे आहे. मुलींना स्वतःचे संरक्षण करण्याचे शिक्षण देउन आत्मनिर्भर करणे गरजेचे असून ती काळाची गरज असल्याच्या भावना विविध महिलांनी व्यक्त केल्या.

यावेळी रोहिणी वाघमारे, डॉ. रजनी मुळे, रोहिणी कासार, उषा खेडेकर, सुवर्णा गट, अर्चना औटी, कविता मगर, मनीषा मगर, गायत्री मगर, मंगल काळे, पल्लवी बांदल, संगीता गाडेकर, कमल देशमाने, राधिका तोटे, रेखा औटी, मयुरी औटी, वैशाली ठुबे, लिलाबाई बोरुडे आदी उपस्थित होत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या