अण्णा हजारे यांच्या मौन आंदोलनात वारकर्‍यांचे भजन
Featured

अण्णा हजारे यांच्या मौन आंदोलनात वारकर्‍यांचे भजन

Dhananjay Shinde

पारनेर (तालुका प्रतिनिधी) – महिलांच्या सुरक्षिततेसाठी व दिल्लीतील निर्भयाच्या आरोपींना फाशी, यासह महिलांच्या विविध प्रश्नांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या मौन आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी राळेगणसिद्धी, पिंपळनेर येथील वारकर्‍यांनी रविवारी रात्री भजन आंदोलन केले.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी देशभरात हेल्पलाईन सुरू करावी, महिला अत्याचारप्रकरणी न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांत लवकर सुनावणी होऊन दोषींना शिक्षा द्यावी यासह काही प्रश्नांबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारपासून राळेगणसिद्धीत मौन आंदोलन सुरू केले आहे.

रविवारी चाळीसगाव, जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी राळेगणसिद्धीत येऊन अण्णा हजारे यांच्याबरोबर चर्चा केली. मौन असल्याने अण्णांनी त्यांना लेखी माहिती दिली. रात्री राळेगणसिद्धीचे अरुण भालेकर यांच्यासह राळेगणसिद्धी, पिंपळनेर येथील वारकर्‍यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून भजन आंदोलन केले. यामध्ये महात्मा गांधी यांची भजने म्हणण्यात आली.दरम्यान पारनेर तालुका जिजाऊ ब्रिगेड महिला बुधवारी राळेगणसिद्धीत मौन आंदोलन करणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष रोहिणी वाघमारे, डॉ. रजनी मुळे व महिलांनी दिली.

त्या कायद्याबाबत जनजागृती आवश्यक
सध्या देशभरात नागरित्व कायद्यावरून चाललेल्या हिंसाचाराबद्दल अण्णांनी दुःख व्यक्त केले. आंदोलने ही अहिंसा मार्गाने होणे आवश्यक आहे. हिंसेतून समाजाचेच नुकसान होत आहे. याची जाणीव आंदोलकांना झाली पाहिजे असे मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. तर केंद्र सरकारने नागरिकत्व व इतर कायद्याबाबत जनजागृती करणे आवश्यक होते असेही अण्णा म्हणाले.

Deshdoot
www.deshdoot.com