अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी घेतली पतसंस्था सचिवांची झाडाझडती
Featured

अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी घेतली पतसंस्था सचिवांची झाडाझडती

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

उंबरे (वार्ताहर) – कर्जापोटी थकबाकीदार आणि जामीनदार नसतानाही नोटिसा आल्याने संतप्त झालेल्या अंगवाडी सेविका व मदतनिसांनी पतसंस्थेची बैठक बोलाविली. त्यात संबंधित सचिवाला जाब विचारून त्यांना चांगलेच धारेवर धरले. सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीत अंगणवाडी सेविका, मदतनिसांनी जोरदार वादावादी करून सचिवाशी शाब्दिक खडाजंगी केली.

दरम्यान, संबंधित कर्जदारांचे खाते उतारे आणि कर्जदार व जामिनदारांची यादी आणण्याचे आदेश राहुरी पंचायत समितीचे बालविकास प्रकल्प अधिकारी नीलेश राऊत यांनी अंगणवाडी सेविका सहकारी पतसंस्थेच्या सचिवांना दिले आहेत. तर काही अंगवाडी सेविका व मदतनिसांनी थकबाकी मान्य नसल्याने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. 3 मार्च रोजी पुन्हा बैठकीचे आदेश बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांनी दिल्यानंतर तूर्तास या वादावादीवर पडदा पडला आहे.

काल शुक्रवारी राहुरी येथील पंचायत समितीच्या सभागृहात अंगणवाडी सेविका सहकारी पतसंस्थेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जोरदार वादंग झाले. काही दिवसांपूर्वी या पतसंस्थेने कर्जदार व जामिनदार यांना कर्जाच्या थकबाकीच्या नोटिसा जारी केल्या. त्यात बर्‍याचशा महिलांनी कर्जच घेतले नसून तर काही महिला जामिनही राहिल्या नसल्याचे आढळून आल्यानंतर या नोटिसा पाहून अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या रागाचा पारा चढला. बोगस नावे टाकून बोगस कर्जप्रकरणे केली असल्याचा आरोप करीत महिलांनी संबंधित सचिवांची चांग़लीच कानउघाडणी केली.

पतसंस्थेत आर्थिक सावळा गोंधळ झाल्याचा आरोप करीत मनीषा संतोष दुशिंग, शकुंतला मोहन क्षीरसागर, मुक्ता अर्जुन ढोकणे, अश्‍विनी गोरक्षनाथ ढोकणे, वर्षा संदीप ढोकणे, मनीषा विठ्ठल तोडमल, सुमन लहानू ढोकणे, शकुंतला अशोक गायकवाड आदी महिलांनी कर्जाची पूर्णफेड करूनही त्यांना बाकी नसल्याचा दाखला नाकारण्यात आल्याने त्यांनी सहायक निबंधक कार्यालयात तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीस माजी उपसभापती रवींद्र आढाव, सुरेश निमसे, आदींसह अधिकारी उपस्थित होते.

मी 30 हजार रुपये भरणा सचिवांकडे केला होता. मला प्रत्यक्षात 20 हजार रुपयांची पावती देण्यात आली. 10 हजार रुपयांची पावती नंतर देणार असल्याचे सचिवांनी सांगितले. मात्र, माझ्या कर्जातून केवळ 20 हजार रुपये जमा करण्यात आले. उर्वरित 10 हजार रुपयांचे काय झाले?
– सुरेखा वाकचौरे, मदतनीस चांदेगाव

आम्ही कोणालाही जामीन नसताना आमच्या पतसंस्था चालकांनी आम्हाला जामीनदार असल्याच्या नोटिसा पाठविल्याने आम्हाला धक्का बसला आहे. जामीनदार राहण्यासाठी आम्ही कोठेही सह्या केल्या नाहीत.
– लीला मच्छिंद्र शिरडकर, विजया मधुकर घोगरे (कोल्हार खुर्द)

पतसंस्थेने दिलेले कर्ज व त्यावर आकारलेले व्याज हे आम्हाला मान्य नाही. यावर आम्ही अनेकदा सचिवांशी संवाद साधला. मात्र, ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने आम्ही थकबाकी व व्याज भरणार नसून याविरूद्ध आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती श्रीमती खरात, चेडगाव या महिलेने दिली.

एकूण 96 कर्जदार थकीत आहेत. त्यांच्याकडे 31 लाख 48 हजार 620 रुपये थकीत आहेत. ती रक्कम पूर्ण भरल्याशिवाय कोणत्याही कर्जदाराला नील दाखला दिला जाणार नाही, अशी माहिती सचिव रंगनाथ चोप्रे यांनी दिली.

या सर्व प्रकरणाची माहिती घेतली आहे. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, सचिवांचा प्रतिसाद मिळाला नाही. यावर पुन्हा निर्णय घेण्यासाठी दि. 3 मार्च रोजी बैठक बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-नीलेश राऊत, बालविकास प्रकल्प अधिकारी, राहुरी. 

Deshdoot
www.deshdoot.com