मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी केंद्राकडे मागणी करावी : छगन भुजबळ
Featured

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी केंद्राकडे मागणी करावी : छगन भुजबळ

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

मुंबई :

आज विधान भवन येथे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी ठराव सभागृहात ठेवण्यात आला. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांनी मराठी भाषेला ताबडतोब अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी केंद्राकडे मागणी करावी असे आवाहन केले.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी मागील १० वर्ष केंद्राकडे प्रयत्न सुरू आहे. मात्र अजूनही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. उलट १६ वर्षांपूर्वी तमीळ भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे. मराठी भाषा अभिजात आहे, हे सिद्ध करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. त्याचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली ५०० पानी अहवाल केंद्राकडे सादर केला. त्यानंतर केंद्राच्या समितीकडून ५ फेब्रुवारी २०१५ ला हा अहवाल मान्य करून पुढे पाठवण्यात आला. मात्र अजूनही त्यावर निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

ते म्हणाले की, कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी ४ अटी आहेत. त्यामध्ये सदर भाषा १०००-१५०० वर्ष जुनी हवी, सदर भाषेचे साहित्य श्रेष्टत्व असावे, सदर भाषा इतर भाषेची नकल नसावी, सदर भाषा आणि पाठपुरवठा करण्यात येणारी भाषा मूळ हवी. या चारही अटींची पूर्तता मराठी भाषेत आहे. एवढच नाही तर मराठी ही ७ वाणांची भाषा राहिलेली आहे. मात्र तरीही मराठी भाषेला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. यासाठी देशाच्या पंतप्रधानांना विनंती केली पाहिजे. यासाठी राज्यातील सर्व पक्षीय खासदारांनी एकत्र यायला हवे असे आवाहन त्यांनी केले.

ते म्हणाले की, २ हजार वर्षांपूर्वीचे मराठी भाषेचे पुरावे असतांनाही हे सिद्ध करून देखील आजवर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला नाही. संत ज्ञानेश्वरांनी अमृताहूनही गोड अशी उपमा मराठी भाषेला दिली. मात्र अजूनही या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत नसल्याच शल्य मराठी माणसाच्या मनात आहे. त्यामुळे सरकारने ताबडतोब मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यायला हवा अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सभागृहात केली.

Deshdoot
www.deshdoot.com