अकोलेत सभापती पदासाठी भाजप-सेनेत लढत?
Featured

अकोलेत सभापती पदासाठी भाजप-सेनेत लढत?

Sarvmat Digital

अकोले (प्रतिनिधी) – अकोले तालुका पंचायत समितीच्या सभापती पदासाठी भाजप आणि सेनेत लढत होण्याची शक्यता आहे. भाजपकडून उर्मिला राऊत, अलका अवसरकर व दत्तात्रय बोर्‍हाडे या तीन जणांपैकी एकाला उमेदवारी मिळेल तर शिवसेनेचे नामदेव आंबरे हे उमेदवार असू शकतील. सभापतिपद ओबीसीसाठी राखीव झाल्याने या पदासाठीचे प्रमुख दावेदार विद्यमान उपसभापती मारुती मेंगाळ व भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता देशमुख सभापतिपदाच्या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

अकोले पंचायत समितीचे बारा सदस्य आहेत. यात सभापती रंजना मेंगाळ, उपसभापती मारुती मेंगाळ, देवराम सामेरे व नामदेव आंबरे (सर्व शिवसेना), दत्तात्रय बोर्‍हाडे, दत्ता देशमुख, उर्मिला राऊत व अलका अवसरकर (सर्व भाजप) तसेच गोरख पथवे, माधवी जगधने, सारिका कडाळे, सीताबाई गोंदके (सर्व राष्ट्रवादी) यांचा समावेश आहे.

मागील वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेच्या रंजना मेंगाळ या सभापती तर शिवसेनेचेच मारुती मेंगाळ हे उपसभापती झाले होते. त्यावेळी सभापतिपद सर्वसाधारण जागेसाठी खुले होते. शिवसेनेचे नामदेव आंबरे यांची त्या पदावर वर्णी लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र शिवसेनेमधील अंतर्गत गटबाजीमुळे त्यांची संधी हुकली व सर्वसाधारण जागेवर राखीव मतदारसंघातून निवडून आलेल्या रंजना मेंगाळ यांची वर्णी लागली.

विधानसभा निवडणुकीत अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली. माजी आमदार वैभवराव पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला तर भाजपचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे व सुनीता भांगरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली. विधानसभा निवडणुकीत डॉ. लहामटे विजयी झाले. त्या निवडणुकीत उपसभापती मारुती मेंगाळ यांचा अपवाद वगळता उर्वरित 11 सदस्य पिचड यांच्या सोबत होते. मात्र आता राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यामुळे तालुक्यातील राजकीय समिकरणे ही बदलू लागली आहेत.

दरम्यान भाजपचे चार आणि राष्ट्रवादीचे चार पैकी तीन अशा सात सदस्यांची अलीकडेच गटनोंदणी झाली असल्याचे समजते. राष्ट्रवादीचे मावळते गटनेते गोरख पथवे मात्र या गटनोंदणीत सहभागी झाले नव्हते. या गटनोंदणीमुळे आता पंचायत समितीमध्ये भाजप सात, शिवसेना चार आणि राष्ट्रवादी काँग्रेस एक असे संख्या बळ झाले असल्याचे दिसते. शिवसेनेचे नामदेव आंबरे हे खुल्या जागेवर जरी निवडून आले असले तरी त्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे.

त्यामुळे ते सभापती पदासाठी पात्र आहेत. मात्र शिवसेनेमध्ये मागील वेळेस गटबाजी उफाळली होती व नामदेव आंबरे एकटे पडले होते. आताही उर्वरीत तीन सदस्यांची त्यांना कितपत साथ मिळते, याबद्दल शंकाच आहे. कारण या तीन जणांपैकी दोन जण विधानसभा निवडणुकीत वैभवराव पिचड यांच्या बरोबर होते. त्यामुळे शिवसेनेची गटबाजी संपणार की नाही, हाही या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. शिवसेनेचे चार सदस्य एकत्रित आले आणि त्यांना राष्ट्रवादीच्या सदस्याची साथ मिळाली तर आंबरे यांच्याबरोबर पाच सदस्य असू शकतील. अर्थात भाजपची सांगितले जाते त्याप्रमाणे गट नोंदणी झालेली असेल तर त्यांच्याकडे सात सदस्य होतात. ही गटनोंदणी होऊ नये म्हणून उपसभापती मारुती मेंगाळ यांनी प्रयत्न केले होते.

त्यांच्याच प्रयत्नामुळे गट नोंदणीसाठी गेलेले गोरख पथवे गट नोंदणीत सहभागी झाले नव्हते, अशी कोणतीही गट नोंदणी झालेली नाही, असा मारुती मेंगाळ यांचा दावा आहे. भाजपचे तीन पंचायत समिती सदस्य ओबीसी प्रवर्गातील आहेत. मात्र त्यापैकी दोन महिला आहेत. त्यामुळे भाजपतर्फे सातेवाडी गणातून निवडून आलेले दत्तात्रय बोर्‍हाडे यांना सभापतिपदाची उमेदवारी मिळेल, अशी चिन्हे दिसत आहेत.

उपसभापती पदासाठी भाजपकडून राजूर गणाचे पंचायत समिती सदस्य दत्ता देशमुख यांचे नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेकडून मारुती मेंगाळ पुन्हा या पदासाठी मोचबांधणी करून आहेत. भाजपच्या सभापती आणि उपसभापती पदाबाबत माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड हेच अंतिम निर्णय घेतील. सध्याचे संख्याबळ लक्षात घेता सभापती पदी भाजपची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com