के.के.रेंजचा विषय पुन्हा पेटणार
Featured

के.के.रेंजचा विषय पुन्हा पेटणार

Dhananjay Shinde

अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत मंगळवारी बाधीत गावांच्या सरपंचांची बैठक

आ. नीलेश लंके : मी आमदार असेपर्यंत एक इंचही जमीन लष्कारला मिळू देणार नाही

अहमदनगर (प्रतिनिधी) – राहुरी, नगर आणि पारनेर तालुक्यांच्या हद्दीत असणार्‍या लष्कराच्या के. के. रेंज या युद्ध प्रशिक्षण क्षेत्राच्या विस्तारीकरणाच्या हालचाली सुरूच आहेत. यासाठी वेगवेगळ्या चाचपणी सुरू असून पूर्वी सुरक्षाक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या जागेचे महसूल विभागाकडून मूल्यांकन करून घेण्यात आले आहे. यावर संरक्षण विभागाकडून अद्याप पुढील निर्णय झालेला नसला तरी के.के. रेंज 2 चा विचार वरिष्ठ पातळीवरून सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामुळे आता पुन्हा के.के. रेंजच्या विस्तारीकरणाचा विषय पेटणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी पारनेरचे आ. नीलेश लंके यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेऊन केे.के. रेंजच्या विस्तारीकरण आणि फेज टू ला तीव्र विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. के. के. रेंजच्या विस्तारीकरणासाठी नव्याने एक इंच देखील जमीन मिळून देणार नाही. यासाठी येत्या 21 तारखेला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थित राळेगणसिध्दीला के.के. रेंजमुळे बाधीत होणार्‍या सर्व गावांच्या सरपंचांची बैठक बोलाविण्यात आली आहे. त्या ठिकाणी के. के. रेंज विस्तारीकरणाच्या विरोधात ग्रामपंचायतींचे ठराव घेण्यात येणार असल्याची माहिती आ. लंके यांनी दिली.

गेल्या काही वर्षांपासून के.के. रेंजच्या विस्तारीकरणाचा विषय प्रलंबित आहे. वर्षभरापूर्वी लष्करी आणि जिल्हा प्रशासनाच्या यासंदर्भात बैठक झाल्या होत्या. मात्र, त्यावेळी बाधीत होणार्‍या गावांतील जनतेने विरोध केल्यामुळे हे प्रकरण थांबविण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा लष्कर आणि जिल्हा प्रशासन या विषयावर सक्रिय झाले आहे. के. के. रेंजमधील राहुरी, नगर व पारनेर तालुक्यातील 23 गावांतील काही क्षेत्र हे सुरक्षा क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये सरकारी, वन व खासगी जागेचा समावेश आहे. या जागेचे मागील वर्षीच मुद्रांक विभागाच्या मार्फत मुल्यांकन करण्यात आले असून ते 791 कोटी रुपये झाले आहे. ही माहितीही जिल्हा प्रशासनाने लष्कराला फेब्रुवारी 2019 मध्ये पाठवली आहे.

जिल्हा प्रशासन आणि लष्काराचे के.के. रेंज फेज टू वर काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. यात पारनेर तालुक्यातील पाच गावांतील 14 हजार 178 हेक्टर, राहुरी तालुक्यातील बारा गावातील 13 हजार 518 हेक्टर आणि नगर तालुक्यातील सहा गावांतील 1 हजार 121 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. हे क्षेत्र ताब्यात मिळावे, यासाठी 2017 पासून प्रयत्न सुरू आहेत. हा विषय पुढे आल्यानंतर स्थानिक नेते आणि नागरिकांनी त्याला विरोध केला होता. यामुळे हे प्रकरण वर्षभर थंड होते. मात्र, पुन्हा हालचाली सुरू झाल्याने आता पारनेरचे आ. लंके यांनी या प्रकरणात उडी घेत काहीही झाले तरी के.के. रेंजच्या विस्ताराला शेतकर्‍यांच्या जमीन जावू देणार नाही असे स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात आ. लंके यांनी स्पष्ट केले की, के. के. रेंज विस्तार धोरणामुळे राहुरी, नगर आणि पारनेर तालुक्यातील 23 गावांमधील जनजीवन विस्कळीत होणार आहे. या गावांमध्ये राहणारे बहुसंख्य लोक हे आदिवासी, मागासवर्गीय, शेतकरी,कष्टकरी आहेत. या गावातील शेतकर्‍यांना वित्तसंस्था व बँका या लष्काराच्या विस्तारकारणाच्या मुद्यावर कर्जपुरवठा देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. तास गावातील आदिवासी बांधवांना सरकारी नियमानुसार वनजमीन वाटप होत असताना लष्काराच्या विस्तारीकरणाचे कारण देऊन महसूल खात्याने जमीन वाटप थांबवले आहे. गावातील जमिनी एन.ए.(नॉन एग्रीकल्चर) होण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे. के.के.रेंज विस्तार धोरणामुळे या हद्दीत राहणार्‍या लोकांच्या जीवनावर याचा थेट परिणाम होत असल्याचे आ. लंके यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले.

पारनेर, नगर विधानसभा मतदार संघातील संबंधित गावामधील अनेक लोकांनी याप्रश्‍नी मला भेटून तक्रारी केल्या असल्याचे जिल्हाधिकारी यांना सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत वनकुटे गावचे सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे, हरिदास जाधव, सुनील कोकरे, हरीष शेळके, विनोद ठुबे, बाबा भोर, रामनाथ पुंड, पळशी गावचे सरपंच गणेश मधे, गणेश हाके, मुन्ना सांगळे, सुखदेव चितळकर, दत्ता खताळ, गोविंद कुटे, बाळासाहेब बनसोडे, श्याम पवार यांच्यासह पारनेर, नगर, राहुरी तालुक्यातील अनेक गावांतील पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लष्कारामुळे मुळा धरण धोक्यात?
दोन दिवसांपूर्वी के.के. रेंजच्या हद्दीजवळ असणार्‍या वावथर जांभळी गावाच्या शिवारात लष्कराच्या रणगाड्याच्या तोफातील गोळा पडून मोठा खड्डा पडला होता. याच परिसरात काही अंतरावर मुळा धरण आहे. यामुळे भविष्यात लष्कराच्या फायरिंगचा धोका मुळा धरणाला बसण्याची शक्यता नाकारात येत नाही. लष्काराच्या विस्तारीकरणात मुळा धरणाला के.के. रेंजचा विळखा पडण्याची शक्यता असून ही राहुरी तालुक्यासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com