नगर: राजीनाम्यानंतरही रामदासींची ‘हिंद सेवा’त ढवळाढवळ
Featured

नगर: राजीनाम्यानंतरही रामदासींची ‘हिंद सेवा’त ढवळाढवळ

Sarvmat Digital

अनिल गट्टाणी यांचा आरोप । इतरांच्या अधिकारांवर करताहेत अतिक्रमण

अहमदनगर (प्रतिनिधी) – सारडा कॉलेजमध्ये डुकरांच्या हल्ल्यात दोन कर्मचारी जखमी झाल्यानंतर आजीव सभासद अनिल गट्टाणी यांनी संस्थेत अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप केला आहे. मानद सचिव पदाचा राजीनामा दिल्यानंतरही सुनील रामदासी हे संस्थेच्या कामात ढवळाढवळ करत असल्याचा दावा गट्टाणी यांनी केला आहे.

सुनील रामदासी हे हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव होते. परंतू त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ते एक सामान्य सभासद आहेत. कार्यकारीणीचे सदस्य नसतानाही ते संस्थेच्या दैनंदिन कामात हस्तक्षेप करत असून इतरांच्या अधिकारावर ते अतिक्रमण करत असल्याचा आरोप गट्टाणी यांनी केला आहे. कार्यकारीणी सभेला तसेच शाखांच्या शालेय समिती, कॉलेज व्यवस्थापन समितीच्या सभांना हजर राहून ते कामात ढवळाढवळ करत असल्याचा दावा गट्टाणी यांनी केला आहे.

कॉलेजलगतच वसतीगृह असून ते 25 ते 30 वर्षापासून बंद आहे. इमारतीची पडझड झाली असून त्या जागेला संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. भिंत बांधल्यानंतरही त्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. वसतीगृहाच्या शेजारी असलेल्या नाल्यात हॉटेलचे खरकटे, कचरा फेकला जात असल्याने तेथे डुकरांचा संचार आहे. डुकरांच्या मालकावर कधीही कारवाई झालेली नाही. कारवाईसाठी पत्रही दिले, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानेच कर्मचार्‍यांवर हल्ला झाल्याचे गट्टाणी यांनी म्हटले आहे. संस्थेने डुकरांच्या मालकावर कारवाई करावी तसेच कार्यकारीणी सदस्य नसलेल्यांना कारभारात हस्तक्षेप करू देवू नये असे गट्टाणी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com