Thursday, April 25, 2024
Homeनगरमुंबईतून बाहेर पडलेल्या स्थलांतरितांमुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांत वाढ !

मुंबईतून बाहेर पडलेल्या स्थलांतरितांमुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांत वाढ !

जिल्हाभरात तब्बल 20 पॉझिटिव्ह

नगर – 07, अकोले- 07, संगमनेर- 04, लोणी- 01, श्रीगोंदा- 01

- Advertisement -

अहमदनगर (प्रतिनिधी) – करोना संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक असल्याचे सांगणार्‍या सरकारने राज्यांतर्गत प्रवासाला परवानगी देताना पुरेशी खबरदारी घेतली नाही. परिणामी कालपर्यंत प्रामुख्याने मुंबई- पुण्यापुरता सीमीत असलेल्या करोनाचा प्रादुर्भाव आता नगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये दिसू लागला आहे. या रूग्णांच्या संपर्कातील लोकांनाही करोना विषाणू हल्ला करू लागलेत ही नवी डोकेदुखी तयार झाली आहे. एकट्या अकोलेत तब्बल 19 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. नगर, संगमनेर, वांबोरी, नेवासा, श्रीगोंदा, राहाता तालुक्यातही पॉझिटिव्ह आढळले आहेत.

नगर जिल्ह्यातील ज्या तालुक्यात करोनाचा एकही रुग्ण नव्हता अथवा तुरळक रुग्ण होते तेथे स्थलांतरितांमुळे रुग्णसंख्या वाढू लागली आहे. राज्यातील स्थलांतरितांच्या प्रवासाला परवानगी देताना मुंबई पुण्यात यादी करून तपासणी करण्यास तसेच संबंधित जिल्ह्यात 14 दिवस क्वारंटाईन करण्याचा सल्ला आपण दिला होता. मुळातच करोनाच्या चाचणीवरून वेळोवेळी मार्गदर्शक तत्व बदलून तथाकथित तज्ज्ञ उघडे पडले आहेत.

जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात करोनाचे 20 रुग्ण समोर आले आहेत. जिल्ह्यात करोना संसर्ग सुरू झाल्यापासून कालचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचा हा विक्रमी दिवस आहे. काल सकाळच्या सत्रातील तपासणी अहवालात 11 तर सायंकाळच्या सत्रातील अहवालात 9 जण करोना बाधित आढळले आहेत. हे सर्व करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील, सहवासातील आहेत. बाधित आढळलेल्यामध्ये अकोले तालुक्यातील सात, नगर शहरातील सात, संगमनेरमधील 4, लोणी (राहाता) आणि श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या करोना चाचणी प्रयोग शाळेत केलेल्या तपासणीत मंगळवारी सकाळच्या सत्रात नव्याने 11 बाधित रुग्ण आढळले. यात अकोले तालुक्यातील सहा जणांना करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले. तालुक्यातील जवळे येथील 48 आणि 24 वर्षीय महिला आणि 28 वर्षीय पुरुष यांचा बाधितामध्ये समावेश आहे. तर वाघापूर येथील 32 आणि 40 वर्षीय महिला आणि 45 वर्षीय पुरुष हे बाधित आढळले. हे सर्व यापूर्वीच्या बाधित व्यक्तींच्या संपर्कातील आहेत.

संगमनेर तालुक्यात देखील दोघे बाधित आढळले असून यात डिग्रज, मालुंजा येथील 21 आणि 45 वर्षीय महिला यांचा सामवेश आहे. हे देखील यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील कांडेगाव येथील 75 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह असून लोणी (ता. राहाता) येथील एका 56 वर्षीय व्यक्तीला करोनाची बाधा झाली आहे. यासह नगर शहरातील स्टेशन रोडवरील 33 वर्षीय महिलेला देखील करोना झाला आहे.

त्यानंतर काल रात्री आठच्या सुमारास आलेल्या अहवालानूसार जिल्ह्यात आणखी 9 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात नगर शहरातील सहा जणांचा समावेश आहे. सोमवारी बाधित आलेल्या मार्केट यार्ड जवळील व्यक्तीच्या कुटुंबातील त्याची आई, पत्नी आणि मुलीचा समावेश आहे. याशिवाय मार्केट यार्ड येथील 28 वर्षीय युवकही बाधित आढळून आला आहे. माळीवाडा येथील 42 वर्षीय पुरुष आणि केडगाव येथील 29 वर्षीय युवक यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यासह संगमनेर शहरातील जुने पोस्ट ऑफिस येथील 36 वर्षाची महिला आणि अडीच वर्षे वयाचा मुलगाही करोना बाधित आढळला आहे. तर अकोले तालुक्यातील बोरी येथील साठ वर्षीय महिला करोना बाधित झाली आहे.

बाधितांचा आकडा 175
जिल्हा रुग्णालयाच्या आकडेवारीनूसार जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या 172 सांगण्यात आली. मात्र, यात खासगी प्रयोग शाळेचा संगमनेरच्या तिघा करोना पॉझिटिव्हा रुग्णाची संख्या टाकली असता जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या 175 वर पोहचली आहे. यात महानगरपालिका क्षेत्रातील 32 उर्वरित जिल्हा 90, इतर जिल्हा 40 आणि इतर राज्य 2 तर इतर देश 8 अशी रुग्ण संख्या आहे.

84 अ‍ॅक्टिव्ह केसेस
गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह केसेसमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. अकोले, संगमनेर आणि नगर शहरात मोठ्या संख्याने रुग्ण सापडत असल्याने करोनाचा आकडा वाढत आहे. सध्या जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह केसेस 82 असून यासह 2 संगमनेरमध्ये असून त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दिवभरात 89 अहवाल निगेटिव्ह
जिल्ह्यातील करोना संशयीतांचे 2 हजार 697 स्त्राव तपासणी करण्यात आले आहेत. यातील 2 हजार 397 निगेटिव्ह आले असून 25 रिजेक्टेड आहेत. तर 17 अहवालांचा निष्कर्ष निघालेला नाही. यासह 3 अहवाली येणे बाकी आहे. दिवसभरात 89 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आणखी 7 रुग्ण करोनामुक्त
मंगळवारी जिल्ह्यातील आणखी 7 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यात सकाळी पाच तर सायंकाळी दोघांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यात श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील एक, संगमनेर येथील एक, पारनेर तालुक्यातील मसने फाटा पारनेर येथील एक, नगर तालुक्यातील दोन, कर्जत आणि नेवासा तालुक्यातील प्रत्येकी एक अशा 7 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशा एकूण पाच रुग्णांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज. करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 80 झाली आहे. मात्र, कर्जत आणि नेवासा येथील रुग्णांना काही दिवस हॉस्पिटल देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.

नगरमध्ये नव्याने रूग्ण
भवानीनगरमधील एका युवकाचा अहवाल सोमवारी पॉझिटीव्ह आला होता. काल त्याच्याच कुटुंबातील पत्नी, आई आणि मुलीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तसेच मार्केट यार्ड, माळवाडा आणि केडगाव भागातही प्रत्येकी एक रूग्ण बाधित आढळला. भवानीनगर भागातील रूग्ण एका राजकीय नेत्याचा कार्यकर्ता आहे. त्याचा संबंधित नेत्याच्या कार्यालयात आणि लोकांमध्ये सतत संपर्क होता. मार्केट यार्ड आणि केडगाव येथे काल बाधित असलेले रूग्ण त्याचेच मित्र असल्याचे सांगितले जाते. मात्र, हे रूग्ण भवानीनगरमधील रूग्णाच्या संपर्कातील नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या