Wednesday, April 24, 2024
Homeनगरनवीन दशक हे महाविकास आघाडीचेच असणार – आदित्य ठाकरे

नवीन दशक हे महाविकास आघाडीचेच असणार – आदित्य ठाकरे

संगमनेर (प्रतिनिधी) – आम्ही या घराण्यातून आलेलो आहोत ते सर्व घराने अनेक वर्ष राज्यातील समाजकारणात कार्यरत आहे लोकशाही पद्धतीने आम्ही राजकारणात आलो असून महाराष्ट्रातील तरुणांच्या व जनतेच्या अपेक्षापूर्तीसह नव महाराष्ट्र निर्मितीत सक्रिय काम करू असे तरुण आमदारांनी दिलखुलास मुलाखतीत म्हटले असून नवीन दशक हे महविकास आघाडीचे असणार असल्याचा विश्वास पर्यावरण मंत्री नामदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील मेधा महोत्सवात ‘संवाद तरूणाईशी’ या कार्यक्रमात पर्यावरण व पर्यटन मंत्री नामदार आदित्य ठाकरे, पर्यावरण पर्यटन रायमंत्री ना. अदिती तटकरे, आ. रोहित पवार, आ. धिरज विलासराव देशमुख, आ. ऋतुराज पाटील, आ. झिशान सिद्धीकी यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक व संगीतकार अवधूत गुप्ते यांनी खुमासदार शैलीत या नवतरुण आमदारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, युवक काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, सौ. कांचनताई थोरात, राजवर्धन थोरात, रणजितसिंह देशमुख, इंद्रजितभाऊ थोरात, विश्वस्त शरयुताई देशमुख, बाजीराव पाटील खेमनर, लक्ष्मणराव कुटे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. या मुलाखतीची सुरुवात ‘इस बंदे मे है कुछ बात, ये बंदा लय जोरात, बाळासाहेब थोरात’ या गीताने टाळ्यांच्या कडकडात झाली.

- Advertisement -

या खुमासदार मैफिलीत नामदार आदित्य ठाकरे म्हणाले की, नवीन दशक हे महा विकास आघाडी सरकारचे आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी 3 पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी ही मैत्री करण्यासाठी खूप चांगले पक्ष आहेत. महाराष्ट्रातील अनेक घराण्यातील युवक राजकारणातील वसा घेऊन काम करत आहेत मी ही लोकशाही पद्धतीने राजकारणात आलो आहे. वडिलांची नम्रता ही मला प्रेरणा देते. सर्वांना सोबत घेऊन ते काम करत आहेत. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. राजकारणात कधी गर्व करू नये ही सर्वांनी शिकलं पाहिजे मला तरुणांच्या अपेक्षापूर्ती शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी काम करायचे आहे. मंत्री म्हणून घेतलेली शपथ आपल्या जीवनातला सर्वात अनमोल ठेवा आहे असे ते म्हणाले.

नामदार अदिती तटकरे म्हणाल्या, लहानपणापासूनच घरात राजकीय वातावरण होते वडिलांची दिवस-रात्र काम करण्याची पद्धत यामुळे मी राजकारणात आले. शरद पवार हे अतिशय आदर्श व्यक्तिमत्व असून तीन पिढ्यांची समरस होणारे ते एकमेव नेते आहेत.

रोहित पवार म्हणाले, शरद पवार हे या वयातही समाजकारणात सक्रिय आहेत. राज्यातील अनेकांना वाटले ते निवृत्त होतील परंतु गर्व करणार्‍यांचे त्यांनी गर्वहरण करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. गोरगरीब आणि शेतकर्‍यांसाठी काम करण्याचा मंत्र त्यांनी तरुणांना दिला आहे. आज त्यांचा काम करण्याचा उत्साह, ऊर्जा पाहून सर्वांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळते आहे. कर्जत-जामखेड वर आपले खूप प्रेम असून या जनतेने केलेल्या प्रेमामुळे मी येथील प्रतिनिधित्व करत आहे. अहमदनगर जिल्हा नावात सोपा आहे मात्र राजकारणात खूप अवघड असल्याचे ते म्हणाले.

धीरज देशमुख म्हणाले, नामदार बाळासाहेब थोरात व विलासरावजी देशमुख यांचे प्रेम सर्वश्रुत आहे. माझे वडील हे माझे खरे हिरो आहेत. आता इतर तरुणही म्हणतात की राजकारणात विलासरावजी देशमुख हे आपले हिरो आहेत. त्यावेळी वडिलांचा खूप अभिमान वाटतो. त्यांनी समाजकारणात किती झोकून देऊन काम केले याची प्रचिती येते. मराठवाड्यासह महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणे हे विलासराव देशमुख साहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण काम करणार असल्याचे ते म्हणाले.

ऋतुराज पाटील म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्याचे नेते नामदार बाळासाहेब थोरात यांनी या जिल्ह्याला एक वैभव प्राप्त करून दिले आहे. ग्राम पातळीवर जाऊन विकास कामे करण्याची त्यांची पद्धत असल्याने सलग 8 वेळा ते निवडून येऊन नम्रतेने काम करत आहेत आणि हे आम्हाला तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

झिशान सिद्धीकी म्हणाले, मी जरी शहरातून आलो असलो तरी सर्वसामान्यांच्या विकासाची कामे घेऊन आपण काम करणार आहोत वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री व एक कॅबिनेट मंत्री आल्याने काम अधिक आनंद होईल असेही ते म्हणाले.

नामदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले आहे की, अमृतवाहिनी संस्थेने शिक्षणातून मोठा लौकिक निर्माण केले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची ही मोठी सोय झाली आहे. मेधा या उत्सवाअंतर्गत वैचारिक प्रबोधन, संस्कृती, कला, क्रीडा या सर्व जपल्या जात असून यामुळे तरुणांना मोठे व्यासपीठ मिळत आहे. महाराष्ट्रातील राजकारणातील तरुणांचा आपल्या विद्यार्थ्यांची संवाद घडावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून अमृतवाहिनी च्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी सांगितली.

- Advertisment -

ताज्या बातम्या