Friday, April 26, 2024
Homeनगरजिल्ह्यात अवघ्या पंधरा दिवसांत सरासरी 25 टक्के पाऊस

जिल्ह्यात अवघ्या पंधरा दिवसांत सरासरी 25 टक्के पाऊस

सार्वमत

सर्वाधिक श्रीरामपूरमध्ये 45 टक्के तर पाथर्डीत अवघा 8 टक्के

- Advertisement -

अहमदनगर (प्रतिनिधी) – करोना संसर्गामुळे धास्तावलेल्या शेतकर्‍यांना यंदा पावसाने चांगलाच आधार दिला आहे. जिल्ह्यात रविवारी मान्सून दाखल झाला असून तत्पूर्वी 1 ते 14 जून या कालावधीत जिल्ह्याच्या एकूण सरासरीच्या 1 हजार 797 मिलीमिटर म्हणजे 24.92 टक्के पावसाची नोंद झाली आहे.

यात सर्वाधिक पाऊस हा श्रीरामपूर तालुक्यात 246 मिली मीटर म्हणजेच 45 टक्के तर सर्वात कमी पाथर्डी तालुक्यात अवघा 41 मिली मीटर म्हणजेच 8 टक्के पावसाची नोंद झाल्याची आकडेवारी जिल्हा प्रशासनकडून देण्यात आली. जिल्ह्यात 97 महसूल मंडले असून यातील 46 मंडलांत आतापर्यंत 100 मिलीमिटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. गतवर्षी या तारखेपर्यंत जिल्ह्यात अवघा सरासरीच्या 5.45 टक्के म्हणजेच 393.2 मि.मी पाऊस झाला होता.  यंदा सुरूवातीपासून हवामान विभागाने चांगला पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तविला होता.

त्यानुसार 31 मे रोजी मध्यरात्री ते 1 जून सकाळपर्यंत जिल्ह्यात दमदार मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. त्यात निसर्ग चक्रीवादळामुळे देखील जिल्ह्यात अनेक भागात पावसाने चांगली हजेरी लावली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात पाऊस कोसळत आहे. यामुळे खरीप हंगामासाठी मशागतीसह अनेक ठिकाणी पेरणीला सुरूवात झाली आहे. विशेष करून जिल्ह्यात पाथर्डी तालुका वगळता अन्य तालुक्यांत पावसाचे प्रमाण चांगले आहे.

यामुळे गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून करोना संसर्गामुळे धास्तावलेल्या शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून ग्रामीण भागातील जनतेला शेती कामातून रोजगार उपलब्ध झाला आहे. विशेष करून कडधान्य पिकविणार्‍या पारनेर, कर्जत-जामखेड, नगर तालुका, संगमनेरचा काही भाग याठिकाणी चांगला पाउस झालेला असल्याने यंदा कडधान्य पीक जोमात राहणार असल्याचा कृषी विभागाचा होरा आहे.

यासह धरणाचे कॅचमेंट असणार्‍या भागात पाऊस सक्रिय होत असल्याने धरणात देखील पाणी साचण्यास सुरूवात होणार आहे. जिल्ह्यात 97 महसूल मंडले असून यातील 46 महसूल मंडलांत 100 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यामुळे यंदा खरीप हंगामाला चांगले दिन येणार असल्याची आशा आहे. जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत 515 टक्क्यांच्या सरासरीने 7 हजार 213 मि.मी पडतो. त्या तुलनेत जूनच्या पहिल्या 14 दिवसांत 1 हजार 797 मिलीमिटर झाला आहे. तसेच जिल्ह्यात मान्सूचा पाऊस झाला असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या