कृषी पंपांना कॅपॅसिटर बसवा, ऑटो स्विचचा वापर टाळा
Featured

कृषी पंपांना कॅपॅसिटर बसवा, ऑटो स्विचचा वापर टाळा

Sarvmat Digital

महावितरणचे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषीपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहकांनी कृषीपंपांना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषीपंप एकाचवेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. यातून होणारी गैरसोय व नुकसान टळावे तसेच सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळावा, यासाठी शेतकर्‍यांनी कृषिपंपांना ऑटोस्विचऐवजी कॅपॅसिटर बसवून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रत्येक कृषीपंपास क्षमतेनुसार कॅपॅसिटर बसविणे हा रोहित्र जळणे वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी एक सोपा उपाय आहे. कॅपॅसिटरमुळे कमी दाबाचा वीजपुरवठा, रोहित्र जळाल्यास वा नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती कालावधीतील खंडित वीजपुरवठा या समस्या सुटण्यास मदत होणार आहे. मात्र बहुतांश ग्राहकांनी कृषीपंपास कॅपॅसिटर बसविलेले नाहीत. बसविलेल्यांपैकी काहींचे बंद तर काहींनी थेट जोडणी केली असल्याने ज्यांनी कॅपॅसिटर बसविले नाहीत त्यांनी ते बसवून घ्यावेत आणि कॅपॅसिटर बंद किंवा थेट जोडणी असल्यास ते दुरुस्त करून घ्यावेत, असे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे. कृषी क्षेत्रातील कार्यक्षम ऊर्जा वापरात कॅपॅसिटर हे उपकरण महत्त्वाचे आहे. कृषीपंपास कॅपॅसिटर बसविल्यामुळे विद्युत केबल जळण्याचे प्रमाण कमी होते. योग्य विद्युतदाब, केव्हीए मागणी, वीज वापरात बचत आदी फायदे होतात.

राज्यात सुमारे 42 लाख कृषीपंपधारक शेतकरी आहेत. महावितरणकडून या शेतकर्‍यांना दिवसा व रात्री अशा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येतो. हा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन कृषीपंप चालू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी कृषीपंपांना ऑटोस्विच लावले आहेत. त्यामुळे वीज येताच कृषीपंप आपोआप चालू होतो. परिणामी रोहित्रांवरील भार एकाचवेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. ऐन हंगामात रोहित्र जळाल्यास त्याची झळ शेतकर्‍यांनाही सोसावी लागते. त्यामुळे कृषीपंपांना कॅपॅसिटर बसवून ऑटो स्विचचा वापर टाळावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com