आघाडी सरकारकडून बळीराजाला कर्जमाफीची अपेक्षा
Featured

आघाडी सरकारकडून बळीराजाला कर्जमाफीची अपेक्षा

Sarvmat Digital

सुलतानी व अस्मानी संकटात सापडलेला शेतकरी सरसकट कर्जमाफीच्या प्रतिक्षेत

टिळकनगर (वार्ताहर)- विधानसभा निवडणूक प्रचारात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी संकटातील शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्याची ग्वाही जाहीरनाम्यात दिली होती. त्यात आघाडीचे सरकार सत्तेवर आल्याने तालुक्यातील एकलहरे, उक्कलगावसह ग्रामीण भागातील शेतकर्‍यांची नजर आता सरसकट कर्जमाफीकडे लागली आहे. तसेच यासाठीचे निकष काय? आदी प्रश्‍नही ग्रामीण भागातून चर्चेत आले आहेत.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून शेतकरी कर्जमाफीबाबत हालचाली वेगाने चालू आहेत. सहकार विभागाकडून यासाठी माहिती मागविण्यात येत आहे. कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरू शकतात, थकबाकीदार शेतकर्‍यांची संख्या किती आदी माहिती एकत्रित करण्याचे काम सुरू असल्याचे समजते.

पुर्वीच्या सरकारच्या काळात अगोदर राजकीय पक्षांचे आंदोलन व नंतर स्वत: शेतकर्‍यांनीच सुरू केलेल्या आंदोलनानंतर तत्कालीन राज्य शासनाने दीड लाखांपर्यंतच्या थकबाकी असलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच विधानसभा निवडणुकीदरम्यान उध्दव ठाकरे शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी आक्रमकपणे आग्रही राहिले होते.

आता तर ठाकरे हेच मुख्यमंत्री आहेत. काही दिवसांपासून ठाकरे यांनी सरसकट कर्जमाफीसाठी मंत्रालयात अधिकार्‍यांसमवेत बैठकांचा धडाका सुरू केला आहे. मागील सरकारच्या कर्जमाफीत अनेक जाचक अटी असल्याने अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत. अद्यापही तालुक्यातील हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असल्याचे समजते. त्यात आता राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे.

ठाकरे यांनी देखील सरसकट कर्जमाफीचा आग्रह ठेवला आहे. यामुळे विधिमंडळाच्या आगामी आठवड्यात सुरू होणार्‍या हिवाळी अधिवेशनापूर्वीच सरकसकट कर्जमाफीची घोषणा शेतकर्‍यांना अपेक्षित आहे.

ऑफलाईन कर्जमाफीची मागणी
बळीराजाला कर्जमुक्त करण्याच्यादृष्टीने सरकारने पाऊल तर पुढे टाकले आहे. मात्र, किचकट ऑनलाईन प्रक्रियेऐवजी ऑफलाईन कर्जमाफी देण्याची मागणी तालुक्यातील एकलहरे, उक्कलगाव येथील शेतकर्‍यांनी केली आहे. कारण शेतकर्‍यांना कर्जमाफीचे अर्ज ऑनलाईन भरताना अनेक त्रुटी राहतात. त्यामुळे मागील कर्जमाफीच्या ऑनलाईन प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आल्या आणि अनेक शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले.

Deshdoot
www.deshdoot.com