संतप्त आदिवासी महिलांनी ठोकले म्हैसगाव ग्रामपंचायतीला टाळे
Featured

संतप्त आदिवासी महिलांनी ठोकले म्हैसगाव ग्रामपंचायतीला टाळे

Sarvmat Digital

कर्मचार्‍यानेच तोडले टाळे; ठाकरवाडीत पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी, पाण्यासाठी आदिवासी महिलांची रानोमाळ भटकंती

राहुरी (प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यातील पश्चिमेकडील म्हैसगाव हद्दीतील आदिवासी बहूल असलेल्या ठाकरवाडीच्या समस्या गेल्या अर्धशतकातही सुटलेल्या नाहीत. हाकेच्या अंतरावर मुळा धरण असूनही गेल्या वर्षभरापासून पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करणार्‍या संतप्त आदिवासी महिलांनी आक्रमक भूमिका घेत ग्रामपंचायतीलाच टाळे ठोकून सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर महिलांनी ठोकलेले टाळे एका कर्मचार्‍यानेच तोडल्याने आदिवासी महिलांचा संताप वाढला आहे.

संतप्त महिलांनी राहुरीचे तहसीलदार व पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांनाही निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले, ठाकरवाडी येथील ग्रामस्थ म्हैसगाव ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराला वैतागलो आहे. आदिवासी वाडीला शासनाने रोजगार हमी योजनेतून 11 लाख रुपये खर्चून विहीर बांधून दिली. विहिरीत सध्या 50 फूट इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

मात्र, त्यावरील मोटारी दुसरीकडेच बसविण्यात आल्याने पिण्याच्या पाण्यासाठी डोंगर-दर्‍यांत हंडाभर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. ठाकरवाडीतील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनाही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांचेही मोठे हाल होत आहेत. ठाकरवाडी ही आदिवासी वस्ती असून स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून अस्वच्छतेमुळे सर्वत्र डासांचा प्रादूर्भाव होऊन साथीच्या आजाराची लागण झाली आहे. कचरा कुंडीजवळ सुमारे 5 ते 10 फूट कचर्‍याचे ढीग साचलेले असल्याने दुर्गंधीही वाढली आहे.

सांडपाणी वाहून नेणार्‍या गटारी व स्वच्छता गृह तुंबलेले असल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नाल्या तुंबून आजार वाढले असून ठाकरवाडीत डेंग्यूचे दोन रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत वाडीवर डास प्रतिबंधक फवारणी केली जात नसल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. सरपंच बाहेरगावी नोकरीला असून सरपंच व ग्रामसेवकाच्या मनमानीला आदिवासी कंटाळल्याने सरपंच व ग्रामसेवकावर कठोर कारवाई करण्याची मागणी आदिवासी महिलांनी केली आहे.

निवेदनावर विजय विधाटे, सोमनाथ मुसळे, राहुल दुधाट, अर्जुन दुधाट, हिरामण बर्डे, भीमराज शेलार, वनिता जाधव, ताराबाई जाधव, अनिता जाधव, गीताबाई पारधे, सविता पारधे, मंदाबाई जाधव, मनीषा जाधव, भाऊराया जाधव, पारूबाई जाधव, येणूबाई जाधव, कारूबाई जाधव, कविता जाधव, सोनाबाई जाधव, वैशाली जाधव, झुंबरबाई जाधव, किसन जाधव, पोपट जाधव, भीमबाई जाधव, लता जाधव, किरण जाधव, अंकुश जाधव, रोहित जाधव, मंगल जाधव, मंदाबाई पारधे, मीनाबाई पारधे, रमेश जाधव, भाऊसाहेब पारधे आदींसह आदिवासी महिलांची नावे आहेत.

गेल्या 50 वर्षांपासून ठाकरवाडी येथील आदिवासी शेतकरी आणि महिला आपल्या न्यायहक्कासाठी शासन दरबारी संघर्ष करीत होते. त्यांचे काही प्रश्न पद्मभूषण स्व. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी मार्गी लावले. मात्र, आता राजकीय कोलदांड्यामुळे पुन्हा ठाकरवाडीच्या समस्या आ वासून उभ्या राहिल्या असून आदिवासी महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी मोठी हेळसांड होत आहे. वनखात्याच्या जागेत पिण्याच्या पाण्यासाठी गेलेल्या महिलांना वनखात्याचे कर्मचारी अरेरावी करून त्यांना अपमानास्पद वागणूक देत आहेत. तर ठाकरवाडीतील वीजही खंडित करण्यात आली असून ठाकरवाडी पुन्हा अंधारात सापडली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शासनाने दिलेल्या विहिरीच्या पाण्यावर धनदांडगे सायफन करून डल्ला मारीत असल्याने आदिवासी महिलांना हक्काचे पाणी मिळत नाही. अशी दुरवस्था झाली असून शासकीय अधिकारी मात्र, याकडे डोळेझाक करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com