राज्यात 559 कारखाने सुरू; 8 हजार कामगार कामावर
Featured

राज्यात 559 कारखाने सुरू; 8 हजार कामगार कामावर

Dhananjay Shinde

सार्वमत

मुंबई – राज्य सरकारने लॉकडाऊनच्या काळातील सर्व नियम आणि अटी पाळून राज्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये उद्योगधंदे सुरू करण्यास अंशत: परवानगी दिल्याने राज्यातील 559 कारखाने सुरू झाले आहेत. या कारखान्यांमध्ये 8 हजार कामगारांनी काम सुरू केलं आहे, राज्याच्या उद्योग मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने ही माहिती दिली.

राज्य सरकारने 21 एप्रिलपासून राज्यातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांना अंशत: परवानगी दिली आहे. मात्र जिल्हाबंदी कायम राहणार असल्याने कुणालाही जिल्ह्याच्या बाहेर जाता येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेल्या भागांमध्ये ग्रामीण भागांचा जास्त समावेश आहे. उद्योग विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील 7432 कारखान्यांच्या मालकांनी राज्य सरकारकडे कारखाने सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी मागणार्‍यांमध्ये पुण्यातील कारखान्यांचे मालक सर्वाधिक आहे. एकट्या पुण्यातूनच उद्योग सुरू करण्यासाठी 1418 कारखानदारांनी एमआयडीसीकडे अर्ज केले आहेत.

दरम्यान, सरकारने आतापर्यंत दीड हजार कारखानदारांना पुन्हा उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यंत यातील 559 उद्योगांनी कामही सुरू केलं आहे. या उद्योगातील कामगारांची ने-आण करण्यासाठी गाड्यांची गरज पडणार असून सरकार ही व्यवस्था करून देणार आहे. कारखाना परिसरातच कामगारांची राहण्याची, खाण्या-पिण्याची व्यवस्था करावी आणि सोशल डिस्टन्सिंगच पालन केलं जावं, या अटींवरच सरकारने या कारखानदारांना त्यांचे उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com