दिलासादायी : गाळेमालकाने केले ५५ हजारांचे भाडे माफ; सटाण्यातील युवकाच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक
Featured

दिलासादायी : गाळेमालकाने केले ५५ हजारांचे भाडे माफ; सटाण्यातील युवकाच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक

Dinesh Sonawane

सटाणा | ता. प्रतिनिधी

करोनाच्या शिरकावानंतर देशभरात टाळेबंदी करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनास प्रतिसाद देत सटाणा शहरातील गाळेमालकाने भाडेकरूंचे एका महिन्याचे भाडे माफ केले आहे. ११ गाळ्यांचे भाडे या मालकाने माफ केले असून गाळेमालकाच्या निर्णयाचे सटाणा पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

शहरातील विश्वास कॉलनीतील गाळेमालक गणेश विश्वास भामरे यांचे नवीन बाजार पट्टी असलेल्या साठ फुटी रस्त्यावर गाळे आहेत. एकूण ११ गाळे विविध व्यावसायिकांना भाडेतत्वावर दिले आहेत. याठिकाणी वेगवेगळे लहानमोठे व्यावसायिक व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात.

सध्या करोना विषाणूच्या फैलावामुळे अर्थचक्र पूर्णपणे थांबले आहे. एरव्ही बाजार भरायचा म्हणून याठिकाणी नियमित ग्राहकांची वर्दळ राहायची. मात्र, गेल्या महिन्याभरापासून याठिकाणी कोन्हीही आलेले नाही. तसेच अत्यावश्यक सेवेची दुकाने सोडून इतर दुकानांना परवानगीदेखील देण्यात आलेली नाही. म्हणून व्यावसायिक आर्थिक विवंचनेत होते.

यादरम्यान, भामरे यांनी हातावर पोट असलेल्या गाळे धारकांना या महिन्याचे भाडे माफ करत संकटसमयी मदतीचा हात दिला आहे. एप्रिल महिन्याचे भाडे न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून भाडेकरूंना कुठल्याची क्षणी मदत करण्याचे आश्वासनदेखील त्यांनी दिले आहे. भाडे आज नाही तर उद्या मिळेल आपला जीव महत्वाचा आहे घराबाहेर न पडता या न दिसणाऱ्या शत्रूचा सामना करणे हे आपल्यापुढील सर्वात मोठे आव्हान आहे.

देव मामलेदार यशवंत राव महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे गाव आहे. गेल्या अनेक वर्षांपूर्वी जेव्हा बागलाणमध्ये दुष्काळ होता, तेव्हा मामलेदारांनी सरकारी खजिना जनतेत वाटून देत अनेकांचे जीव वाचवले होते हा इतिहास विसरून चालणार नाही. हेही दिवस निघून जातील आपण सगळेजन एकत्रितपणे या संकटाचा सामना करत आहोत त्यामुळे आपण भाडे माफ करून भाडेकरूंना दिलासा दिल्याचे  भामरे यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com