मातोश्री पार्वतीबाई गोसावी यांच्या ४२व्या वार्षिक स्मृतिदिन समारोह; पहिले पुष्प आज गुंफले गेले
Featured

मातोश्री पार्वतीबाई गोसावी यांच्या ४२व्या वार्षिक स्मृतिदिन समारोह; पहिले पुष्प आज गुंफले गेले

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक :

येथील पुण्यश्लोक शिवपार्वती प्रतिष्ठानच्या वतीने मातोश्री पार्वतीबाई गोसावी यांच्या ४२ व्या वार्षिक स्मृतिदिन समारोह निमित्ताने आयोजित केलेल्या प्रवचन मालेचे पहिले पुष्प आज गुंफले गेले.

नर्मदा परिक्रमा या विषयावर प. पू. स्वामिनी स्थितप्रज्ञा नंद सरस्वती फुल गाव पुणे यांनी नर्मदा परिक्रमेचा अर्थ सांगून या परिक्रमेचे महत्त्व विविध दृष्टांत देवून विशद केले. या प्रसंगी त्यांनी माणसाच्या जीवनात नदीचे महत्त्व फार मोठे असल्याचे सांगितले. स्वामिनी म्हणाल्या या विश्वात हजारो नद्या आहेत पण भारतातील नद्यांना वेगळे महत्त्व आहे. याप्रसंगी त्यांनी वेदांचे महत्त्व विशद करून वेद हे ज्ञानाचा सागर असल्याचे प्रतिपादन केले. हिंदुस्तान ही वेदांची जन्मभूमी असल्याचे सांगितले.

भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ आहे. या संस्कृतीवर पाश्चात्य संस्कृतीचे कीतीही आघात झाले तरी तिचे महत्त्व कमी होणार नाही. आज समाजातील प्रत्येक घटकाला आंतरीक शांततेची गरज भासू लागली आहे. युधिष्ठीर आणि मार्कंडेय ऋषींचा संवाद म्हणजेच नर्मदेचा महिमा आहे हा महिमा सासष्ट हजार सातशे श्लोकांमधून वर्णन केला आहे .

नर्मदेची परिक्रमा करणे ही प्रत्येक साधकाची इच्छा आहे. नर्मदेच्या उगमापासून ते तिच्या स्थानापर्यंत पुन्हा येणे. म्हणजे नर्मदेची परिक्रमा करणे होय परिक्रमा म्हणजे केवळ पर्यटन किंवा फिरणे नाही तर श्रध्दापूर्वक परिक्रमा केली तर नक्कीच नर्मदेचे दर्शन होते. नर्मदा ही नदी नाही तर ती साक्षात देवी आहे. ही शारीरिक साधना नसून अंतरीक साधना आहे. शरीरा बरोबरच मनाची तयारी होणे आवश्यक आहे. याप्रसंगी माताजींनी नर्मदेच्या संदर्भातील अनेक दाखले दिले. माताजींच्या व्याख्यानाने सर्व नाशिककर मंत्रमुग्ध झाले .
कार्यकमाचे सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मीकांत जोशी यांनी केले. या कार्यकमाला डॉ. मो. स. गोसावी, सौ. सुनंदाताई गोसावी, प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे, शैलेश गोसावी, कल्पेश गोसावी, तसेच मोठया संख्येने नाशिकर श्रोते उपस्थित होते.

प्रारंभी प्रतिष्ठानचे प्रधान विश्वस्त सर डॉ़. मो. स. गोसावी व डॉ. सौ. सुनंदाताई गोसावी यांनी माताजींचे पुष्पहार घालून स्वागत केले. डॉ. मो. स. गोसावी यांनी प्रतिष्ठानने आज पर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेतला.

Deshdoot
www.deshdoot.com