दोन दिवसांत साईज्योती यात्रेत 47 लाखांची उलाढाल
Featured

दोन दिवसांत साईज्योती यात्रेत 47 लाखांची उलाढाल

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह, सुनंदा पवार यांची बचत गटांच्या स्टॉल्सना भेट

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आयोजित नगरमधील साईज्योती या महिला बचत गटाच्या प्रदर्शनात गुरुवार आणि शुक्रवार अशा दोन दिवसांत 47 लाखांची उलाढाल झाली. दोन दिवस या ठिकाणी नगरकरांनी स्वयंस्फूर्तीने भेट देऊन विविध साहित्य खरेदीचा आनंद लुटला व खाऊगल्लीतील खाद्य पदार्थावर ताव मारला. प्रदर्शनला खासदार सदाशिव लोखंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी भेटी दिल्या.
जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदा देखील नगरला जिल्हास्तरीय महिला बचत गटांनी उत्पादित केलेले विविध साहित्य, मसाले, पापड, गावरान कडधान्य, शोभेच्या वस्तू, हातसडीचा तांदूळ यांचे पाच दिवसी विक्री प्रदर्शन सुरू आहे. प्रदर्शनाच्या दुसर्‍या दिवशी 300 हून महिला बचत गटांची 47 लाखांच्या जवळपास उलाढाल झाल्याची माहिती जिल्हा ग्रामविकास यंत्रणेकडून देण्यात आली. या ठिकाणी प्रदर्शनात सहभागी होणार्‍या बचत गटाच्या महिला प्रतिनिधींना दोन वेळचे जेवण देण्यात येत असून त्यांची राहण्याची व्यवस्था मोफत आहे.

प्रदर्शनात पहिल्यादा पारनेर तालुक्यातील हिवरेझरे येथील देवऋषी बचत गटाने तुळशीची रोपे विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. या गटातील महिला सदस्यांनी वर्षभरापासून तुळशीच्या रोपाची निर्मिती करून त्यांची रोप तयार करून विक्रीसाठी आणली आहेत. यासह सोबतच एक किलोच्या पॅकिंगमध्ये गांडूळ खते विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. या गटाचे हे वैशिष्ट सर्वांना भावून घेत आहे. यासह संगमनेर तालुक्यातील आश्‍वी येथील सहेली बचत गटाने गावरान वांग्याचे भरित, झुणका भाकरचा स्टॉल लावला आहे. नगरकरांची या वांग्याच्या भरितवर उड्या पडत असल्याचे गटातील महिलांकडून सांगण्यात आले. यासह या ठिकाणी आयुर्वेदिक विना केमिकल गूळ, लाकडी घाण्यावर तयार केलेले खाद्य तेल, खाऊगल्लीत मासवडी, शिपी आमटी, मुगाचा डोसा, खानदेशी मांडे यावर नगर ताव मारतांना दिसत आहेत.

शुक्रवारी दुपारी जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्यासह आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी प्रदर्शनला भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुनंदाताई वारे, शीतल जगताप उपस्थित होत्या. प्रदर्शनातील प्रत्येक गटातील महिलेशी त्यांनी संवाद साधला. यासह भीमथडी या ठिकाणी प्रदर्शनातील कोणत्या वस्तू विक्रीसाठी नेता येतील आणि कोणत्या बचत गटाला पाठविता येईल, याची यादीच तयार केली. त्यानंतर उपाध्यक्ष घुले यांच्यसह खाऊगल्लीत जाऊन थालीपीठ, तिळाची पोळी, मासवडी, शिपी आमटीचा आस्वाद घेतला.

प्रदर्शनात सोयाबीन चिल्ली, शिंगोरी आमटी, गुलगुले खाद्य पदार्थासह मुलतानी माती ते आयुर्वेदिक साबणापर्यंत अनेक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यासह गाठवडी बोर पाहून या ठिकाणी भेट देणार्‍याच्या तोंडाला पाणी सुटल्या शिवाय राहत नाही. सायंकाळच्यावेळी या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून संयोजकांना रात्री 11 वाजता बळजबरीने प्रदर्शन बंद करावे लागत आहे. मात्र, नगरकरांचा पाय या ठिकाणाहून निघतांना दिसत नाही.

Deshdoot
www.deshdoot.com