नवसैनिकांच्या सशस्त्र संचलनाने लक्ष वेधले; देशसेवेसाठी 386 गनर सज्ज
Featured

नवसैनिकांच्या सशस्त्र संचलनाने लक्ष वेधले; देशसेवेसाठी 386 गनर सज्ज

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिकरोड । प्रतिनिधी

42 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण घेऊन लष्कराच्या तोफखान्यातील 386 तोपची (गनर) तुकडीने शपथ घेतली. नवसैनिकांच्या तुकडीने सशस्र संचलन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी लेफ्टनंट जनरल एस. के. प्रशार, सबएरिया कमांडंट ब्रिगे. जे. एस. गोरीया, आर्टिलरी सेंटर नाशिकरोड कमांडंट आदी उपस्थित होते.

तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या संचलन मैदानावर प्रशिक्षणार्थींचा शपथविधी सोहळा झाला. त्याचे साक्षीदार होण्यासाठी प्रशिक्षण घेतलेल्या गनरचे कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते. यावेळी नवसैनिकांना संबोधित करताना लेफ्टनंट जनरल एस. के. प्रशार म्हणाले, कठोर व खडतर प्रशिक्षण घेऊन देशसेवेसाठी तुम्ही सज्ज झाला आहात. भारतीय सैन्याचे कर्म हेच धर्म असून कर्म म्हणजे देशसेवा आहे.

प्रामाणिकपणाने देशसेवा करण्यासाठी सदैव तत्पर राहणे गरजेचे आहे. गनरने नेहमीच तोफखान्याची शान वाढवली आहे. त्यासाठी स्वत:च्या जिवाची पर्वा केली नाही. काली घाटाची लढाई असो किंवा वेळोवेळी केलेले ऑपरेशन यामध्ये गनरने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पाकिस्तानविरोधात तोपचीने आपली योग्यता सिद्ध करून दाखवली असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी ओव्हर ऑल बेस्ट रिक्रूट म्हणून राहुल चौधरी यांना सन्मानित करण्यात आले.

हे ठरले उत्कृष्ट

खडतर प्रशिक्षण घेणार्‍यांमध्ये बेस्ट इन ड्रिल के. किशोर, बेस्ट इन फिजिकल भागवत जे., बेस्ट टेक्निकल असिस्टंट राहुल चौधरी, बेस्ट ऑपरेटर रेडिओ अनिलकुमार, बेस्ट गनर श्रीमंता मन्ना, बेस्ट ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट एस. शशीकुमार, आटिसीयन विवेक सिंह, टेक्निकल असिस्टंट राहुल चौधरी यांचा गौरव करण्यात आला.

Deshdoot
www.deshdoot.com