पश्चिम महाराष्ट्रात 27 उद्योग, औरंगाबादमध्ये बजाजसह 50 कंपन्या पुन्हा सुरु
Featured

पश्चिम महाराष्ट्रात 27 उद्योग, औरंगाबादमध्ये बजाजसह 50 कंपन्या पुन्हा सुरु

Dhananjay Shinde

सार्वमत

पुणे – लॉकडाऊनच्या काळातील सर्व नियम आणि अटी पाळून काम सुरु करण्यास काही उद्योगांना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील या पाच जिल्ह्यांमधील सत्तावीस मोठे उद्योग पुन्हा सुरु झाले आहेत. पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी ही माहिती दिली आहे. या पाच जिल्ह्यांमधील औषधं आणि अन्न प्रक्रिया करणारे एक हजार चारशे पन्नास उद्योग लॉकडाऊनच्या कालावधीतच टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आले आहेत.

ज्यामधे 53 हजार कामगार काम करत आहेत. आता त्यामध्ये सत्तावीस मोठ्या उद्योगांची भर पडली आहे. दरम्यान पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीतील उद्योग मात्र अजूनही बंदच आहेत. या 27 उद्योगांमुळे एक हजार 900 कामगारांना पुन्हा रोजगार उपलब्ध झाला आहे. या कामगारांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कामाच्या ठिकाणीच करण्याच्या अटीवर हे उद्योग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर औरंगाबादमध्ये बजाजसह 50 कंपन्या सुरु झाल्या आहेत. बजाज कंपनीला दोन शिफ्टमध्ये 850 कर्मचारी ठेवून काम सुरु करण्याची परवानगी एमआयडीसीकडून मिळाली आहे, शहरातील कर्मचारी कंपनीत जाणार नाहीत तर औद्योगिक परिसरात राहणारे कर्मचारीच जातील.

याच कर्मचार्‍यांच्या जीवावर या कंपनी सुरु होणार आहेत. या कर्मचार्‍यांना शहरात येण्यावर सुद्धा बंदी असेल. बाहेरुन कोणालाही कंपनीत प्रवेश मिळणार नाही, याची दक्षता कंपनीला घ्यायची आहे. याशिवाय एका बसमध्ये केवळ 25 कर्मचारीच प्रवास करण्याची परवानगी आहे. यासोबतच कर्मचार्‍यांना मास्क घालणं बंधनकारक आहे आणि याची तपासणी करण्याचं काम पोलिसांकडे देण्यात आलं आहे. एकीकडे मोठे उद्योग जरी सुरु झाले असले तरी लघु उद्योजकांना सरकारच्या अटीमुळे काम सुरु करणं शक्य नाही. कारण या कंपनीमध्ये दहा-बारा कामगार काम करतात. त्यांना आणण्यासाठी बस कुठून आणायची हा प्रश्न आहे. त्याबरोबरच सरकारच्या इतरही अटी लघुउद्योजकांना जाचक आहे, असं मत एका लघु उद्योजकाने व्यक्त केलं.

पश्चिम महाराष्ट्रातील सुरु झालेले उद्योग
पुणे
वालचंद नगर –
* पेन्ना सिमेंट
* बल्लारपूर पेपर्स

सोलापूर
* अल्ट्रा टेक सिमेंट
* जुआरी सिमेंट
* बिर्ला सिमेंट।
* छट्टीनाड सिमेंट

कोल्हापूर
* इंडो काऊंट
* किर्लोस्कर ऑईल इंजिनिअर्स

सांगली
* किर्लोस्कर इंडस्ट्रीज

सातारा
* कमिन्स उद्योग समूहाचे तीन प्रकल्प

Deshdoot
www.deshdoot.com