15 दिवसांत पाच लाख मेट्रिक टन गाळप
Featured

15 दिवसांत पाच लाख मेट्रिक टन गाळप

Sarvmat Digital

14 कारखान्यांपैकी नऊ साखर कारखान्यांचे गाळप सुरू
पाच कारखान्यांचे बॉयलर थंडच

अहमदनगर (प्रतिनिधी) – गेल्यावर्षी भीषण दुष्काळामुळे जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र निम्म्याने घटले. जनावरांचा चारा म्हणून उसाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. परिणामी गाळपासाठी ऊस कमी शिल्लक राहिला. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील साखर कारखाने साधारणपणे 60 ते 70 दिवसच चालतील, असा प्राथमिक अंदाज आहे. जिल्ह्यातील 14 पैकी नऊ कारखान्यांनी 15 दिवसांत पाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.

गेल्या हंगामात, अर्थात 2018-19 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस गाळपाचा एक कोटी मेट्रिक टनाचा टप्पा पार केला होता. परंतु, गतवर्षी दुष्काळ असल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी उसाची लागवड कमी केली. कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील 70 हजार 911 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झालेली आहे. परंतु, गेल्या वर्षभरात भीषण दुष्काळ पडला. जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला. हिरवा चारा उपलब्ध नव्हता. उन्हाळ्यात उसाला पुरेल एवढे पाणी नव्हते.

शेतकर्‍यांचाही नाईलाज होता. त्यांनी ऊस जनावरांना चारा म्हणून विकला. त्यामुळे उसाचे क्षेत्र कागदोपत्री दिसत असले तरी प्रत्यक्षात तेवढा ऊस शिल्लक राहिलेला नाही. त्याचा परिणाम यंदाच्या ऊस गाळप हंगामावर होणार आहे. उसाअभावी जिल्ह्यातील नऊ साखर कारखाने बंद राहणार आहेत. उर्वरित 14 साखर कारखान्यांना गाळपासाठी परवानगीही देण्यात आलेली आहे.

यातील 9 साखर कारखान्यांनी 15 दिवसांत शुक्रवारपर्यंत 4 लाख 68 हजार मेट्रीक टन साखरेचे गाळप केलेले असून शनिवारी सायंकाळी हा आकडा पाच लाख मेट्रीक टनाच्या पुढे जाणार असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

गाळप : कोणाचे, किती ?
संजीवनी 26 हजार 152, काळे 27 हजार 100, थोरात 78 हजार 750, ज्ञानेश्वर 59 हजार 380, मुळा 15 हजार 680, अगस्ती 33 हजार 562, क्रांती शुगर 10 हजार 930, अंबालिका 1 लाख 31 हजार, गंगामाई 86 हजार 160 असे आहे. (आकडे मेट्रीक टनमध्ये)

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com