उत्पादकता वाढविण्यासाठी तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली 13 सदस्यांची समिती

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील कृषी विकासात शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहचवण्याबरोबरच त्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी कृषी विभागाच्या सर्व कार्यालयात शेतकरी सन्मान व मागदर्शक कक्ष स्थापन करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. या कक्षातून शेतकर्‍यांच्या अडचणी, तांत्रिक समस्या, योजनांचे लाभार्थी निवड व विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे.

शेतमालाची उत्पादकता व उत्पन्नात सातत्य ठेवण्यासाठी व विविध योजनांच्या अंमलबजावणीत समन्वय साधून काम करण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली 13 सदस्यांची समितीही स्थापन करण्यात येणार आहेत.
या समितीत कृषी विभागाशी संबंधित इतर खात्यांचे प्रतिनिधी, अग्रणी बँक, सहकार उपनिबंधक व किमान तीन प्रगतशील शेतकरी यांचाही समावेश करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या समितीच्या बैठकीस विशेष निमंत्रित म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी व प्रांताधिकारी यांना

उपस्थित रहाणे बंधनकारक आहे. दर तीन महिन्यांनी या समितीची बैठक होईल, त्यात हवामान, पीक परिस्थिती, उत्पादकता लक्षांक, विपणन, खते, बियाणे यांचा पुरवठा, पीक कर्जे, वीज जोडणी प्रकरणे आदी प्रश्‍नांवर चर्चा करण्याचे आदेशात म्हटले आहे.

शेतकरी सन्मान कक्षाच्या प्रमुखपदी अभ्यासू व सौजन्यशील कर्मचार्‍यांची जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. या कर्मचार्‍यांकडून शेतकर्‍यांचे ज्या शाखेकडे काम आहे त्या शाखेतील संबंधितांशी संपर्क साधून आवश्यक ती माहिती शेतकर्‍यांना उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. या कक्षाला भेट देणार्‍या शेतकर्‍यांच्या नोंदी ठेवणे बंधनकारक आहे. या कक्षासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करून त्याठिकाणी येणार्‍या शेतकर्‍यांसाठी पिण्याचे पाणी, शेतीविषयक मासिके, वर्तमानपत्र तसेच अंमलबजावणी सुरू असलेल्या योजनांची परिपत्रके वाचण्यासाठी ठेवावी लागणार आहेत.

समितीची रचना
अध्यक्ष- तहसिलदार, सदस्य सचिव – तालुका कृषी अधिकारी, सदस्य – गटविकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, जलसिंचन विभागाचे उपअभियंता, कृषी विद्यापीठाचे संशोधक, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, मत्स्य, रेशीम, खादी, ग्रामोद्याग विभागाचे प्रतिनिधी, महावितरण अभियंता, अग्रणी बँक प्रतिनिधी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था.बाजार समिती सचिव व तीन प्रगतशील शेतकरी त्यात एक महिला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *