विधानपरिषदेचे 10 आमदार निवृत्त
Featured

विधानपरिषदेचे 10 आमदार निवृत्त

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

सार्वमत

मुंबई – विधानपरिषदेतील तब्बल 10 राज्यपाल नामनियुक्त सदस्य शनिवारी(6 जून) निवृत्त झाले आहेत. मुदत संपणार्‍या या आमदारांमध्ये काँग्रेसच्या 4 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 6 आमदारांचा समावेश आहे. तर काँग्रेसच्या आणखी दोन आमदारांची मुदत येत्या 15 जून रोजी संपत आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या 9 जागांसाठी झालेली निवडणूक चांगलीच गाजली असतानाच शनिवारी राज्यपाल नामनियुक्त 10 विधानपरिषदेतील आमदारांची मुदत संपली असून, मुदत संपणार्‍या सदस्यांत प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा समावेश आहे.

या यादीत काँग्रेसचे 5 राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 तर घटक पक्षांच्या एका आमदाराचा समावेश आहे. विधान परिषदेत असणारे राज्यपाल नामनियुक्त सदस्य हुस्नबानू खलिफे, जनार्दन चांदूरकर, आनंदराव पाटील, रामहरी रूपनवर हे काँग्रेसचे 4 तर प्रकाश गजभिये, विद्या चव्हाण, राहुल नार्वेकर, ख्वाजा बेग, रामराव वडकुते, जगन्नाथ शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 आमदार शनिवारी निवृत्त झाले आहेत. तर काँग्रेसचे अनंत गाडगीळ आणि घटक पक्षाचे ( पीपल्स रिपब्लीकन पार्टी ) प्रा.जोगेंद्र कवाडे यांची मुदत येत्या 15 जून रोजी संपत आहे. असे एकूण 12 आमदार निवृत्त होत आहेत. त्यापैकी राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर, रामराव वडकुते यांनी विधानसभा निवडणुकीसाठी राजीनामा दिल्याने या दोन जागा रिक्त होत्या. या दोन रिक्त जागेवर सदस्यांची नियुक्ती करावी अशी शिफारस राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. मात्र राज्यपालांनी या रिक्त जागेवर नियुक्त्या केल्या नव्हत्या.

साहित्य, कला, समाजसेवा आणि सहकार आदी क्षेत्रातील व्यक्तींची राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करावी अशी तरतूद घटनेत आहे. राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीकडून ज्या नावांची शिफारस केली जाईल. ती या निकषावर तपासण्याचे काम राज्यपाल काटेकोरपणे करण्याची शक्यता आहे. तिन्ही पक्षांकडून इच्छुकांची संख्या मोठी असून, सत्तेत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांचे 12 सदस्य राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर पाठवले जाणार आहेत.

महाराष्ट्र विकास आघाडीमधील तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी चार नेत्यांना याद्वारे विधानपरिषदेवर संधी दिली जावू शकते. मंत्रिमंडळाने 12 जणांच्या नावांची शिफारस राज्यपालांकडे केली तरी ते तात्काळ निर्णय घेण्याची शक्यता नसल्याने विधान परिषदेवर राज्यपाल कोट्यातून 12 सदस्यांची नियुक्ती विविध कारणांनी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा मुद्दा राजभवन विरुद्ध राज्य सरकार अशा वादाचाही ठरण्याची शक्यता आहे.राज्यपाल या नियुक्त्यांबाबत काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com